Others News

महाराष्ट्रात रोजगार हमी योजना व राष्ट्रीय फळबाग अभियान यातून फळपिकांची विक्रमी लागवड झाली आणि महराष्ट्राचा फळ उत्पादनाचा टक्का वाढला परंतु आजची स्थिती पहिली तर लहरी हवामान कधी दुष्काळ तर कधी गारपीठ, रोग प्रतिकारक व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींसाठी संशोधनाची गरज असे अनेक फळबाग लागवडीपूर्व प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत तरीही शेतकरी न डगमगता त्या प्रश्नांचा सामना करतो आहे.

Updated on 16 March, 2019 5:10 PM IST


महाराष्ट्रात रोजगार हमी योजना व राष्ट्रीय फळबाग अभियान यातून फळपिकांची विक्रमी लागवड झाली आणि महराष्ट्राचा फळ उत्पादनाचा टक्का वाढला परंतु आजची स्थिती पहिली तर लहरी हवामान कधी दुष्काळ तर कधी गारपीठ, रोग प्रतिकारक व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींसाठी संशोधनाची गरज असे अनेक फळबाग लागवडीपूर्व प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत तरीही शेतकरी न डगमगता त्या प्रश्नांचा सामना करतो आहे.

महाराष्ट्रात कोरडवाहू तसेच बागायती फळ पिकाखालील लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात दिसते आहे, दिवसेंदिवस वाढते तापमान मानवी आरोग्य बरोबर पक्षी, प्राणी व इतर जीव त्याचबरोबर पिकांसाठी धोक्याची घंटा वाजवित आहे. या काळात फळ पिकात बहार नियोजन करणे दूरची गोष्ट फळपिकां खालील क्षेत्र वाचविणे मोठ्या जिकीरीचे झाले आहे यावर उपाय म्हणून ठिबक सिंचनातून पाण्याची कमालीची बचत होते आहे परंतु आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या व शेतकऱ्यास हे शक्य नाही अशा परीस्थितीत कमी भांडवलात आधुनिक ठिबक सिंचनाचे फायदे देणारे सोपे तंत्र मटका सिंचन नक्कीच फायद्याचे ठरेल.

सूर्यप्रकाश हा झाडाच्या वाढीस महत्वाचा घटक आहे परंतु पाणी न मिळणाऱ्या झाडासाठी तेवढाच घातक आहे. ऐन उन्हाळ्यात झाडास पाणी न मिळाल्यामुळे झाडाची वाढ थांबते व त्यातून झाडाची मर होण्याची शक्यता असते. झाडे जेवढे पाणी आपल्या मुळांद्वारे शोषून घेतात त्यापैकी काहीश्या प्रमाणातच पाण्याचा उपयोग झाडांच्या वाढीसाठी होतो व उरलेले पाणी हे पानाद्वारे बाष्पोत्सर्जनाने निघून जाते.  

भविष्यातील भरघोस उत्पादनासाठी उन्हाळ्यात फळझाडांच्या वाढीकडे विशेष लक्ष देणे जरुरीचे आहे. जमिनीतील अन्नद्रव्ये झाडे मुळाद्वारे शोषून घेतात व आपल्या सर्व शाखांकडे पोहचवतात. त्यासाठी सूर्यप्रकाश आणि पाणी हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत व या प्रक्रियेत दुवा म्हणून महत्वाची कामगिरी बजावतात, उन्हाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश मिळतो परंतु पाणी न मिळल्यास या क्रियेत अडथळा निर्माण होतो त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व लागलेली फळे न पोसता गळण्याचे प्रमाण वाढते तसेच त्याची प्रत खालावते परिणामी उत्पन्नात घट येते.

फळझाडांच्या मुळाच्या कक्षा पहिल्या तर दुपारी १२ वाजता जमिनीवर जी सावली पडलेली असते त्याच क्षेत्रामध्ये झाडांच्या मुळ्यांचा प्रसार झालेला असतो तसेच झाडांच्या तंतू मुळांचा विस्तार ही या क्षेत्रात थोडा खोलवर झालेला असतो आणि त्याचं कार्य पाहिलं तर त्या त्या क्षेत्रातील अन्नद्रव्य शोषून झाडास पुरवठा करणे जर या क्षेत्रात मुळांना पाणी मिळाले तरच मुळे आपलं कार्य चोखपणे बजावतात. आणि याच मुळांच्या कक्षेचा विस्तार पाहून आपणास झाडाच्या वाढीप्रमाणे, वयाप्रमाणे मटक्याची संख्या ठरवून त्या ठिकाणी मटके पुरणे फायदेशीर ठरते.

मटका पुरताना त्याखाली शेणखत जरूर घालावे  झाडाची तंतुमुळे खतातील अन्नद्रव्ये शोषून घेतात व मातीच्या तुलनेत पाणी झिरपण्यास मदत होते, मटक्याच्या तळास दोन छिद्रे ठेवावीत या छिद्राद्वारे पाण्याचा निचरा होत असतो जर मटका लगेच रिकामा होत असेल किंवा पाण्याचा निचरा कमी करावयाचा असेल तर त्यात सुती कापड बसवावे यात झिरपण्याची प्रक्रिया जमिनीच्या पप्रकारानुसार बदलेल म्हणजेच काळ्या खोल मातीत पाणी पाझरण्याचा वेग कमी राहील काळ्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असल्यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होते तुलनेत मुरमाड मातीत पाणी जास्त प्रमाणात व खोलवर झिरपते पर्यायाने मटक्यातील पाणी कमी जास्त प्रमाणात वापरले जाते.

 मटका सिंचनाचे फायदे:

  • अल्प खर्च, पाण्याची बचत
  • झाडाची एकसारखी डेरेदार वाढ
  • उन्हाळ्यात पाण्याचा ताण सहन करण्याची ताकद वाढविते
  • कडक उन्हाळ्यात झाडास जीवदान
  • डेरेदार वाढीमुळे फांद्या व तत्यामुळे फळांच्या संख्येत वाढ
  • मुळांचे मजबूत जाळे
  • पर्यावरण पूरक पर्याय इत्यादी.

दुपारी बारा वाजता झाडाची सावली ज्या क्षेत्रात पडते त्या क्षेत्रास प्रभावी मुळांचे क्षेत्र म्हटले जाते यात क्षेत्रातील मुळांना पाणी मिळणे महत्वपूर्ण असते त्यासाठी या क्षेत्रात मटका पुरणे जरुरीचे आहे त्यासाठी झाडाच्या चारही बाजूस मटका बसविणेचा आराखडा आकृतीमध्ये दिला आहे. उन्हाळ्यातील पाण्याचं दुर्भिक्ष आणि यात फळझाडे जगविणे या प्रश्नाचा सामना करावयाचा असेल तर कोरडवाहू फळपिकांस मटका सिंचन वरदान ठरू शकते त्याचबरोबर आपल्या परस बागेतील व घराशेजारील झाडांसाठी आपण घरगुती मटक्याचा वापर करून अशा प्रकारे सिंचन सुविधा करू शकता अगदी पाण्याची उपलब्धता असेल तरीही आपण हि सिंचन प्रणाली वापरली तर झाडाच्या एकसारख्या व डेरेदार वाढीसाठी फायदेशीर ठरू शकते.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ठिबक सिंचन, तुषार सिंचन या आधुनिक सिंचन प्रणाली दुर्गम भागातील व आर्थिकदृष्ट्या  कमजोर असलेल्या शेतकऱ्यास हे शक्य नाही म्हणून उन्हाळ्यात पाणी टंचाई असणाऱ्या भागात अथवा दुर्गम भागात पाणी, श्रम व मजुरी यात बचत करणारे प्रभावी सिंचन तंत्र म्हणून मटका सिंचन वरदान ठरू शकते.

बिभिषण मा. बागल
9923809392

English Summary: Matka Irrigation for Dry Land Fruit Crop
Published on: 04 July 2018, 04:07 IST