हुमनी या बहुभक्षीय किडी बद्दल काही बाबी आपण जाणून घेतल्या आज आपण या किडी बद्दल उर्वरित बाबी जाणून घेऊ.(A) हुमनी या किडीच्या अळी अवस्थेचे मशागतीय पद्धती द्वारे, भौतिक पद्धतीद्वारे व जैविक व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून व्यवस्थापन कसे केले जाऊ शकते?शेतकरी बंधूंनो हुमनी या किडीच्या अळी अवस्थेत व्यवस्थापन करण्यासाठी खालील बाबीचा अंगीकार करावा.(१) पूर्वपीक काढणीनंतर लगेच पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नागरट करावी त्यामुळे उघड्या पडणाऱ्या हुमनी या किडीच्या अळ्या गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.(२) आंतरमशागतीच्या वेळेस हुमनी या किडीच्या अळ्या गोळा करून लोखंडी हुकच्या साह्याने किंवा खुरप्याने माराव्यात.(३) हुमनीग्रस्त शेतातील सुकलेली पिकांची रोपे उंपटावित व मुळा शेजारील अळ्यांचा नाश करावा.(४) हुमणी चे व्यवस्थापन करण्यासाठी या हुमनी अळीचे नैसर्गिक शत्रू उदाहरणार्थ बगळा चिमणी मैना कावळा घार रान डुक्कर मुंगूस कुत्रा याव्यतिरिक्त जिवाणू बॅसिलस पापीलि व व काही सूत्रकृमी हुमनी किडीचे नैसर्गिक शत्रू आहेत तेव्हा यांचे संगोपन किंवा या हुमणीच्या नैसर्गिक शत्रूंना हुमणीच्या
व्यवस्थापनासाठी कसे वापरता येईल याबाबत योग्य नियोजन करून वापर करावा.(५) मागील काही वर्षात ज्या क्षेत्रामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव तीव्र स्वरूपात आढळून आला अशा क्षेत्रांमध्ये हुमनी व्यवस्थापनासाठी जैविक बुरशी मेटारायझियम अँनिस्पोली या बुरशीजन्य कीटकनाशकाचा 10 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात पेरणीपूर्वी शेणखतात मिश्रण करून जमिनीत चांगली ओल असताना सुद्धा वापर केला जाऊ शकतो.(B) हुमनी या किडीचे रासायनिक पद्धत वापरून किंवा रसायने वापरून कसे व्यवस्थापन केले जाऊ शकते.शेतकरी बंधूंनो सर्वसाधारणपणे झाडावर सरासरी 20 किंवा त्यापेक्षा जास्त हुमनी अळीचे भुंगेरे आढळल्यास किंवा एक हुमणी अळी प्रति चौरस मीटर क्षेत्रात आढळून आल्यास वर निर्देशित सर्व एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या घटकाचा सामुदायिक व सांघिक प्रयत्नातून वापर करून जर तीव्र प्रादुर्भाव असेल तर पिकवार लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन हुमनी अळीच्या व्यवस्थापनासाठी रसायने किंवा कीटकनाशके वापरावी. शेतकरी बंधूंनो सर्वसाधारणपणे महत्त्वाच्या पिकासाठी पिक वार हुमणी अळीच्या व्यवस्थापनासाठी खालील प्रमाणे किटकनाशकाचा प्रत्यक्ष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरज असेल तरच एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा घटक म्हणून वापर करावा.
(a) ऊस पिकाकरिता हुमनी अळीच्या व्यवस्थापनासाठी कीटकनाशकाचा वापर : (1) प्रति एक हेक्टर क्षेत्राकरीता म्हणजेच अडीच एकर क्षेत्राकरिता Fipronil 40 % + Imidachlopride 40 % हे संयुक्त कीटकनाशक 500 ग्रॅम 1250 लिटर पाण्यात मिसळून तोटी काढलेल्या पंपाने ऊस लागवडीच्या वेळेस ओळीत सोडावे किंवा ठिबक सिंचनाद्वारे ड्रेनचींग करून ऊस पिकाच्या मुळाजवळ सर्व बाजूंनी हे कीटकनाशक जमिनीत जाईल या पद्धतीने त्याचा वापर करावा.(2) उस पिकात साधारणता जून-जुलै महिन्यात जमिनीमध्ये Fipronil 0.3 GR हे दाणेदार कीटकनाशक प्रति हेक्टर 33 किलो (म्हणजेच साधारणता एकरी बारा ते तेरा किलो) या प्रमाणात जमिनीत टाकावे व पिकाला पाणी द्यावे. रासायनिक कीटकनाशके वापरण्यापूर्वी लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करून प्रत्यक्ष तज्ञाचा सल्ला घेऊनच रासायनिक कीटकनाशके वापरणे केव्हाही हितावह असते.
शेतकरी बंधूंनो या किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रकोप ग्रस्त क्षेत्रात सांघिक व सामुदायिक प्रयत्नातून एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अंगीकार करून सतत काही वर्षे उपाययोजना करणे आवश्यक असते त्यामुळे या किडीच्या व्यवस्थापनासाठी वर निर्देशित एकात्मिक कीड व्यवस्थापन बाबीचा सामुदायिक प्रयत्नातून अंगीकार करा व हुमनी किडीचे चे प्रभावी व्यवस्थापन करा.टीप : (१) हुमणी किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सामुदायिक प्रयत्नांचा अंगीकार करावा.(२) हुमनी किडीच्या व्यवस्थापनासाठी रासायनिक कीटकनाशके वापरण्यापूर्वी अद्यावत लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करावी व अद्यावत लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊनच रसायने वापरावीत.
राजेश डवरे तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड ( करडा) तथा कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
Published on: 28 June 2022, 08:42 IST