केंद्र सरकारच्या पंतप्रधान जनधन योजनेंअंतर्गत नागरिकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. या योजनेची सुरुवात २०१४ मध्ये झाली होती. गरीब लोकांना बँकिंग सिस्टीमशी जोडण्याचा याचा उद्देश आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ या योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला जातो. जर तुम्ही तुमचे जनधन योजनेतील बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक केले, तर तुम्ही बॅलन्स नसतानाही ५००० रुपये काढू शकता. देशभरात आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून ३८ कोटींहून अधिक लोकांची खाती उघडण्यात आली आहेत.
असे मिळतील ५००० रुपये
पंतप्रधान जन धन अकाउंटमध्ये तुम्हाला ५००० रुपयांच्या ऑव्हरड्राफ्टची सुविधा मिळू शकते. जर या सुविधेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला यासाठी पंतप्रधान जन धन योजनेच्या अकाउंटला आधार कार्डाशी लिंक करावे लागले. त्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये शू्न्य बॅलन्स असला तरी ५००० रुपये काढू शकता.
जनधन योजनेचे हे आहेत फायदे
पंतप्रधान जन धन योजनेचे अनेक फायदे आहेत. या अकाउंटला मिनीमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. या खात्यामध्ये जमा केलेल्या रक्कमेवर व्याज, दोन लाख रुपयांपर्यंत अपघात विमा, लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर ३०,००० रुपयांचे विमा संरक्षण मिळते. याशिवाय सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना या अकाउंटमध्ये डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत मिळते.
अशा प्रकारे उघडा पंतप्रधान जन धन खाते
जन धन खाते उघडण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड याशिवाय केंद्र अथवा राज्य सरकारकडून जारी केलेले कोणतेही ओळखपत्र यासाठी आवश्यक असते.
जन धन अकाउंट उघडण्यासाठी केंद्र सरकारच्या pmjdy.gov.in अथवा कोणत्याही बँकेच्या वेबसाइटवरून याचा अर्ज डाउनलोड करता येतो.
- अर्ज पूर्णपणे भरा. यासाठीची आवश्यक ती कागदपत्रे जमा करा.
- ही कागदपत्रे तुम्हाला जवळच्या बँकेच्या शाखेत जमा करावी लागतील.
- कागदपत्रांच्या पडताळणीनंतर तुमचे अकाउंट उघडले जाईल.
Published on: 17 October 2020, 05:33 IST