मुंबई- प्रत्येकजण कमाईची साधने उभी करण्याचा प्रयत्न करतो. नोकरीसोबत संसाराला हातभार लावण्यासाठी कमाईच्या पर्यायाच्या शोधात असतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात पैसे नसल्यामुळे अनेकांचे स्वप्न अधुरेच राहते. कमी भांडवलात अधिक नफा उपलब्ध करून देणारे उद्योगाचे अनेक पर्याय आहेत. अगदी दहा हजार रुपयांच्या आत गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा आपण मिळवू शकतो. जाणून घेऊया कमी गुंतवणुकीत अधिक नफा प्राप्त करून देणाऱ्या उद्योगाच्या संधीविषयी
1. सोशल मीडिया मॅनेजर
सोशल मीडिया सर्वांच्या जगण्याचा महत्वाचा भाग बनला आहे. व्यवसाय असो वा व्यक्ती प्रत्येकाला आपल्या कामाची व्याप्ती वाढविण्यासाठी सोशल मीडियाची मदत घ्यावीच लागते. अलीकडे व्यवसाय किंवा प्रसिद्ध व्यक्तींची सोशल मीडिया सांभाळण्याची जबाबदारी दिली जाते. तांत्रिक ज्ञान व भाषेचे कौशल्य या जोरावर सोशल मीडिया मॅनेजर म्हणून मोठ्या प्रमाणात संधीची उपलब्धता दिसून येते. लॅपटॉप, इंटरनेटची उपलब्धता असल्यास सोशल मीडिया मॅनेज करण्याची फर्म देखील काढू शकतो.
2. स्क्रीप्ट रायटर:
विविध वेबसाईट पासून खासगी आस्थापनांसाठी ‘फ्री-लान्सर’ म्हणून कंटेट रायटरच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत. ‘एसईओ’चे परिपूर्ण ज्ञान, चालू घडामोडींची माहिती, विविध विषयांवर लेखन करण्याची क्षमता या ‘फ्री-लान्सर’ कंटेट रायटरसाठी जमेच्या बाजूच्या आहेत.
3. संवादक्षेत्र:
कोविडकाळात आय.टी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी मोठी शहरे वगळता टियर-2 व टियर-3 शहरांत बीपीओ सुरू केले आहेत. त्यामुळे इंग्रजीसोबत स्थानिक भाषेत प्रभावी संवाद कौशल्य असलेल्या मंडळींना आगामी काळात टेलिकॉलिंगच्या संधी उपलब्ध असतील.
4. करा अनुवाद, कमवा मनमुराद:
स्थानिक भाषेसोबत इंग्रजीवरील प्रभुत्व असलेल्या मंडळींसाठी अनुवादकाचे क्षेत्र खुणावणारे आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी आपल्या वेबसाईट प्रादेशिक भाषेत आणल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात अनुवादकांच्या संधीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. सुशिक्षित गृहिणी तसेच पूर्णवेळ नोकरी करणाऱ्या व्यक्तीही फावल्या वेळेत फ्री-लान्सर म्हणून अनुवादकाचे काम करू शकतात.
5.डिजिटल मार्केटिंग:
लॉकडाउनमुळे सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी मोठ्या जाहिरातीसाठी ‘डिजिटल’ पर्याय अनुसरला आहे. इंटरनेट कनेक्शन आणि डेस्कटॉप संगणक सेट-अप उपलब्ध असल्यास डिजिटल मार्केटिंगचे पुरेपूर ज्ञान असलेल्या मंडळींना या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.
6. ऑनलाईन शिकवणी:
कोरोना कालावधीत शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिकवणी वर्गाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अखंडित इंटरनेट कनेक्शन व सर्वोत्तम गुणवत्तेच्या व्हिडिओमुळे ऑनलाईन वर्ग प्रभावी ठरत आहे. गूगल प्ले स्टोअरवर ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या ॲप्स साठी विषय शिक्षकांची मागणी वाढली आहे.
English Summary: investment in thousand rupees earn lakh rupees
Published on: 05 October 2021, 06:25 IST