राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. त्यावरून राज्यात राजकीय वाद सुरू झाला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला जात आहे. तर महाविकास आघाडीने या निर्णयाचे समर्थन करत स्वागत केले आहे. राज्य सरकारला महाराष्ट्राच मद्य राष्ट्र करायचे आहे का? असा संतप्त सवाल भाजपने केला आहे. यामुळे रोज यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यान एक ट्विट केले आहे. यामुळे चर्चा सुरु झाली आहे.
ट्विट करत केदार शिंदे म्हणाले की, ‘वाईन आणि दारू, यात फरक आहे असे सरकारचे म्हणणे आहे, तर मग लोकं वाईन पिऊन गाडी चालवल्यावर दंड घेण्याचा अधिकार सरकारला राहील का?? असा सवाल केदार यांनी ठाकरे सरकारला उपस्थित केला आहे. सध्या केदार यांच्या ट्विटची मनोरंजन क्षेत्रासह राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर अनेकांनी त्यांना समर्थने देखील केल्याचे दिसून येत आहे. केदार शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असतात, आणि ते सोशल मीडियावरील पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतात. केदार यांनी राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे, यावर मत मांडले आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, वाईन आणि दारू त्याच्यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्षातून, काजूतून वाईन तयार केली जाते. आपल्याकडे जेवढी वाईन तयार होते तेवढी वाईन खपत नाही. आजूबाजूच्या राज्यात त्याची विक्री केली जाते. काही परदेशात एक्सपोर्ट केली जाते. काही देशात पाण्याऐवजी वाइन्स पितात हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु काही जाणीवपूर्वक त्याला मद्यराष्ट्र म्हणत वेगळेच महत्त्व दिले, असे अजित पवार यांनी सांगितले होते. यामुळे वाद वाढला होता.
आता असा निर्णय घेणाऱ्या सरकारविरोधात सर्व संघटनांनी आता लढा उभारला पाहिजे. यासाठी मंत्रिमंडळाशी बोलून हा निर्णय मागे घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. अन्यथा राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. वाईनला परवानगी देण्याचा निर्णय हा संतापजनक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. ‘सरकारने वाइन सुरू करून जुगार लावलेला आहे. मला आर आर आबांची आठवण होते. आज ते असते तर हा वाईनचा निर्णय झाला नसता. तसेच सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी डान्सबार बंदी करण्याचा निर्णय घेतला होता असेही भिडे म्हणाले.
Published on: 30 January 2022, 12:18 IST