Others News

पिक संरक्षण हा पिक उत्पादन वाढीसाठी, आवश्यक असणाऱ्या इतर अनेक घटकापैकी एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. पिक संरक्षणासाठी आपण किटकनाशके, रोगनाशके व तणनाशके यांचा वापर करतो. पण काही वेळा किटकनाशके वापरून ही आपणाला त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. कारण कोणत्याही पिक संरक्षण शिफारशी कृषी विद्यापीठामध्ये सलग दोन अथवा तीन हंगामात घेतलेल्या प्रयोगाअंती निष्कर्षित केलेल्या असतात. बऱ्याचवेळा एखाद्या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने शिफारस केलेल्या किडनाशकाबाबत शेतकरी बांधवाना तसेच किडनाशक विक्रेत्यांना माहिती नसते त्यामुळे चुकीची किडनाशके वापरली जातात व त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्या किडीचे/रोगाचे योग्य नियंत्रण होत नाही.

Updated on 28 November, 2019 3:34 PM IST


पिक संरक्षण हा पिक उत्पादन वाढीसाठी, आवश्यक असणाऱ्या इतर अनेक घटकापैकी एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. पिक संरक्षणासाठी आपण किटकनाशके, रोगनाशके व तणनाशके यांचा वापर करतो. पण काही वेळा किटकनाशके वापरून ही आपणाला त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. कारण कोणत्याही पिक संरक्षण शिफारशी कृषी विद्यापीठामध्ये सलग दोन अथवा तीन हंगामात घेतलेल्या प्रयोगाअंती निष्कर्षित केलेल्या असतात.

बऱ्याचवेळा एखाद्या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने शिफारस केलेल्या किडनाशकाबाबत शेतकरी बांधवाना तसेच किडनाशक विक्रेत्यांना माहिती नसते त्यामुळे चुकीची किडनाशके वापरली जातात व त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्या किडीचे/रोगाचे योग्य नियंत्रण होत नाही. त्यासाठी किटकनाशकांच्या योग्य व परिणामकारक वापरासाठी अनेक बाबीकडे लक्ष द्यावे लागते. पण सामान्यतः आपण त्यांकडे दुर्लक्ष करतो. अशा काही बाबी आपण किटकनाशक वापरताना विचारात घेतल्या पाहीजेत.

शेतीमध्ये वेळोवेळी वापरण्यात येणाऱ्या विषारी किडनाशकांमुळे अनेकांना विषबाधा झाल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात येत असतात अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत म्हणून त्यांचा वापर करतांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन तंत्राचा वापर करतांनाच किडनाशकांचा प्रयोग जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याकरिता आवश्यक झाला आहे. याकरिता औषधीचा सुरक्षित तसेच प्रभावी उपयोग करण्याची प्राथमिक माहिती प्रयोगकर्त्यांना असणे आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात ठेऊन काही सुरक्षिततेच्या उपाय योजनांची माहिती येथे दिली आहे.

औषधांचा प्रयोग करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी

  • शिफारस केलेलेच किटकनाशक विकत घ्यावे. प्रत्येक किटकनाशकांच्या डब्यावर किंवा पुड्यावर त्याचे रासायनिक आणि व्यावसायिक नाव लिहिलेले असते त्याची बारकाईने खात्री करून घ्यावी.
  • एखाद्या औषधांविषयी पूर्ण माहिती घेऊन चांगल्या गुणवत्ता धारक उत्पादाकांद्वारे निर्मित औषधींचीच खरेदी करावी.
  • वाहतूक करतांना किटकनाशकांचा अन्नपदार्थांशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • वाहतुकीसाठी किटकनाशकांचे डबे किंवा पुडे खोक्यात व्यवस्थित बंद करावी. वाहतूक साधनात जड सामानाखाली हे खोके ठेऊ नयेत अन्यथा किटकनाशकांचे पुडे अथवा डबे फुटून गळती होईल.
  • अत्यावश्यक असेल तेव्हाच हानिकारक किडे अथवा रोगांमुळे होणाऱ्या नुकसानाची पूर्ण माहिती करूनच किटकनाशकांचा वापर करावा.
  • मित्राकिडे पिकांवर पुरेश्या संख्येत असतील तर किटकनाशकांचा फवारा काही दिवसांकरिता टाळावा अथवा आवश्यक असेल तर औषधांच्या कमीत कमी मात्रेचा फवारा करावा.
  • औषधी निर्मात्याने औषधासोबत दिलेल्या निर्देशाचे वाचन लक्ष्यपुर्वक करावे.
  • फवारणी अथवा धुरळणीचे काम स्वस्थ आणि प्रशिक्षित व्यक्तीनाच सोपवावे.
  • गर्भवती स्त्रिया तसेच बालकांना दुध पाजनाऱ्या स्त्रियांना औषधाचे द्रावण किंवा मिश्रणाचे कामावर लावू नये.

औषधांचे द्रावण/मिश्रण तयार करते वेळी व वापरतांना घ्यावयाची काळजी

  • फुले, फळे अथवा पालेभाज्यांची तोडणी अथवा खुडणी झाल्यावर फवारणी करावी.
  • फवारणी करण्यापूर्वी मधमाश्यांच्या पेटीच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
  • फवारणी करण्यापूर्वी हात, पाय, तोंड, धुण्याकरिता स्वच्छ पाणी, कपडे आणि टावेलाची व्यवस्था करावी.
  • औषधीची मात्रा आणि पाणी अंदाजे न घेता योग्य साधनाचा वापर करून बरोबर मोजून निर्धारित प्रमाणात घ्यावे.
  • मिश्रण तयार करण्यासाठी वापरावयाचे पाणी स्वच्छ आणि गाळलेले असावे म्हणजे नोझल बंद होणार नाही.
  • द्रव औषधी मोजण्याकरिता कोणत्याही नळीच्या मुखाद्वारे ओढण्याकरिता उपयोग करू नये.
  • मिश्रण टाकीत भरतांना जाळीचा उपयोग करावा.
  • भुकटी किंवा दाणेदार किटकनाशके डब्यातून अथवा पिशवीतून काढण्यासाठी लांब दांडीचा चमचा वापरावा, उघड्या हातांनी ही किटकनाशके काढू नयेत.
  • द्रावण बनवितांना ते शरीराच्या कोणत्याही उघड्या भागावर विशेषतः डोळ्यामध्ये ते जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • द्रावण बनवितांना लहान मुले अथवा अनधिकृत व्यक्तींना जवळ येऊ देऊ नये.
  • औषधीचे द्रावण अथवा मिश्रण मोकळ्या आणि हवेशीर ठिकाणी तयार करावे. बंद खोलीमध्ये हे कार्य केल्यास अतिविषारी औषधांचा बाष्परुपात श्वासाबरोबर शरीरात प्रवेश होऊ शकतो. द्रावण किंवा मिश्रण बनविणाऱ्या व्यक्तीने हवा येणाऱ्या दिशेकडे पाठ करून उभे रहावे.
  • औषधाचे झाकण उघडतांना औषध हवेत उडणार नाही अथवा गळणार नाही याची याची काळजी घ्यावी.
  • औषधीचे द्रावण अथवा मिश्रण तयार करतांना व फवारणीचे वेळी बिडी, सिगारेट, चिलम, तंबाखू, पान इत्यादी खाऊ पिऊ नये.
  • बियाणे प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधाची भुकटी श्वासाद्वारे नाक, गळा व फुफ्फुसांमध्ये जाऊ देऊ नये.
  • दोषपूर्ण फवारा यंत्राचा उपयोग करू नये.
  • औषधीचा फवारा अथवा धुरळणी करणाऱ्या व्यक्तीने सुरक्षात्मक पोशाख, अर्थात डोके, मान यांना झाकणारे कपडे, ओव्हरकोट (एप्रोन) गॅसमास्क, चष्मा, हातमोजे, पायमोजे, जोडे, इत्यादी वापरणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा, डोळे, नाक व मुखाद्वारे शरीरात प्रवेश करणाऱ्या औषधीच्या विषारी प्रभावापासून बचाव होतो.
  • हवेच्या विरोधी दिशेने फवारणी किंवा धुरळणी करु नये.
  • उघड्या अंगावर औषधांचा द्रावाणाचा संपर्क आल्यास ताबडतोब साबणाने अंग धुवावे.
  • नोझल आदींच्या बुजलेल्या छीद्रांना तोंडाने फुंकून स्वच्छ करू नये. यासाठी एखाद्या बारीक तारेचा अथवा टाचणीचा वापर करावा.
  • औषधीचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी दुपारचे जेवण करण्यापूर्वी हात, पाय, तोंड आणि शरीराच्या उघड्या अंगांना साबणाने चांगल्या प्रकारे धुवून काढावे.
  • मासोळ्यांना औषधीच्या विषारी प्रभावापासून वाचविण्याकरिता फवारणी केल्यानंतर पाण्याचे स्त्रोत (तलाव, विहीर इत्यादी) औषधांमुळे दुषित होऊ नये याची काळजी घ्यावी.
  • वापरलेल्या औषधांच्या डब्यांची झाकणे व्यवस्थित लावून त्यामधून गळती होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • कोरड्या तसेच उष्ण हवामानात औषधीची फवारणी केल्यामुळे कधी-कधी पिकांवर विषारी प्रभाव दिसून येतो. अशा स्थितीमध्ये फवारणी अगदी सकाळी किंवा दुपारनंतर करावी. कडक उन्हात करू नये.
  • तणनाशकाकरिता वेगळ्या फवारणी यंत्राचा उपयोग करावा. वेगळे फवारणी यंत्र वापरणे शक्य नसल्यास औषधीचा प्रयोग केलेल्या फवारणी पंपांना २-३ वेळा पाण्याने चांगल्या प्रकारे स्वच्छ करूनच तणनाशकाकरिता तो पंप वापरावा. त्या फवारणी यंत्रात रात्रभर पाणी भरून ठेवावे.
  • पिकांची कापणी करण्याच्या फार पूर्वी औषधीचा वापर बंद करावा.
  • औषधीचा वापर केल्याची तारीख, मात्रा, शेत, क्षेत्रफळ, पिक, आदींची नोंद ठेवावी.

औषधींचा उपयोग केल्यानंतर घ्यावयाची काळजी

  • उपयोगात आणलेल्या फवारणी पंपातील उरलेल्या औषधीचे द्रावण जमिनीमध्ये खड्डा खोदून झाकून टाकावे आणि फवारणी यंत्र, बादली, मोजमापाचे पात्र इत्यादी पाण्याने उत्तम प्रकारे धुऊन योग्य ठिकाणी ठेऊन द्यावे.
  • शरीराच्या सुरक्षेकरिता वापरलेले कपडे धुऊन ताबडतोब वाळवावे. तसेच इतर भांडी आणि फवारणी अथवा धुरळणी यंत्र स्वच्छ धुवावीत.
  • काम संपल्यानंतर हात, पाय तोंड आणि शरीराचे उघडे अंग साबणाने उत्तम प्रकारे धुवून काढावे अथवा स्नान करून दुसरे स्वच्छ कपडे घालावे.
  • औषधीचा वापर केल्यानंतर उरलेली औषधी निर्धारित ठिकाणी ठेऊन कुलूप लावावे.
  • पिकावर औषधीचा वापर केल्यानंतर निर्धारित असुरक्षित अवधी (8-10) दिवस संपेपर्यंत फळे, भाज्या किंवा इतर पिकांचा खाण्याकरिता वापर करू नये. फवारणी करण्यापूर्वीच भाजीपाला वैगरे बाजारामध्ये विक्रीकरिता न्यावा.
  • औषधीचा वापर केलेल्या शेतात निर्धारित असुरक्षित काळात कोणत्याही व्यक्तीला किंवा पशु, आदींना प्रवेश करू देऊ नये. त्या शेतात या बाबत सुचनापट लावावा.
  • फवारणी संपल्यानंतर फवारणीचे यंत्र स्वच्छ पाण्यानी चांगले धुवून साफ करून कोरडे झाल्यावर त्यांना पुढच्या वर्षाकरिता गोडाऊनमध्ये ठेवावे म्हणजे पुढच्या हंगामात त्यांचा चांगला वापर करता येईल.
  • पिशव्या आदि कचऱ्यात न फेकता एकत्रित करून त्यांना पाण्याने धुवून सुरक्षित रीतीने नष्ट करून टाकावे.
  • रिकाम्या डब्यांना जाळत असतांना त्याच्या धुरा जवळ उभे राहू नये.
  • औषधीला सुरक्षितरीत्या पेटी, आलमारी, किंवा सामानाच्या खोलीमध्ये उन्हापासून वाचवून सावलीत ठेवावे.
  • तणनाशकांना यथासंभव किटकनाशकांपासून वेगळे ठेवावे.
  • औषधीना अकारण त्यांच्या मूळ डब्यातून दुसऱ्या डब्यात बदलू नये.
  • औषधीला स्वयंपाक घर, खाद्य-पदार्थ, पशुचारा, इत्यादींच्या जवळ ठेऊ नये.
  • औषधींना लहान मुले, पाळीव जनावरे, मंदबुद्धी अथवा अनधिकृत व्यक्तींपासून दूर ठेवावे.
  • फवारणीसाठी वापरलेल्या भांडी, अवजारे, नदी, तलाव अथवा विहिरीत धुवू नयेत.
  • औषधीच्या रिकाम्या डब्यांना कितीही चांगल्या प्रकारे धुऊन काढले तरीही त्याचा वापर खाद्यान्न किंवा भोजन सामग्री साठविण्यासाठी करू नये.
  • टिकाऊ पदार्थापासून अथवा धातूपासून बनविलेल्या औषधी पात्रांना अथवा डब्यांना पाण्याने स्वच्छ धुऊन कोरडे झाल्यावर पुन्हा दुसऱ्या औषधींना ठेवण्याकरिता वापरू शकता.
  • वेळोवेळी औषधी भरलेल्या डब्यांना छीद्र पडणे, जंग लागणे, फुटणे, तुटणे, आदींचे नेहमी निरीक्षण करीत राहावे. असे आढळल्यास योग्य लेबल लावून दुसऱ्या डब्यात स्थानांतरीत करावे.

 


औषधामुळे विषबाधा झाल्यास

  • किटकनाशकांचा अथवा अन्य किडनाशकांची योग्य काळजी न घेता वापर करण्यामुळे अथवा त्यांच्या अचानक शरीरात प्रवेश झाल्यामुळे विषबाधा होऊ शकते. विषारी औषधांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना संबंधित विषारी औषधांच्या प्रभावाची व लक्षणांची माहिती असणे उपचाराच्या दृष्टीने आवश्यक आहे.
  • किटकनाशकांचा प्रयोग करणाऱ्या व्यक्तीमध्ये जीव मळमळणे, उलटी, ढाळ, जीव घाबरणे, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, श्वासोच्छ्वास करण्यास अडचण, मूर्च्छा, घाम येणे, भूक न लागणे, मांसपेशी अडकणे इत्यादी आढळल्यास किटकनाशकांच्या विषारी प्रभावाची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत रोग्याला ताबडतोब दवाखान्यात न्यावे. डॉक्टर येण्यापूर्वी खालील प्रमाणे प्राथमिक उपचार करावे.
  • रोग्याला आरामपूर्वक पडून राहण्यास सांगावे व मोकळ्या हवेमध्ये श्वास घेऊ द्यावे.
  • हिवाळ्यात रोग्याला थंडीपासून वाचविण्याकरिता त्याच्या अंगावर पांघरून टाकून अंग गरम ठेवावे.
  • यथासंभव रोग्याचे सुरक्षात्मक व प्रदूषित कपडे बदलून टाकावे. रोग्याला लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचविणे आवश्यक आहे.
  • विषारी औषध तोंडावाटे शरीरात गेले असल्यास एक प्याला पाण्यात दोन चमचे मीठ टाकून हे द्रावण रोग्याला पाजल्यानंतर त्याला गळ्यामधे बोटे टाकून उलटी करण्यास लावावे रोग्याने एखादे आम्ल अथवा पेट्रोलियम पदार्थ प्याला असेल तर त्याला भरपूर पाणी प्यायला सांगून नंतरच उलटी करवावी.
  • औषध डोळ्यामध्ये गेले असल्यास डोळे ताबडतोब स्वच्छ पाण्याने पंधरा मिनटे पर्यंत पुनः पुनः पाण्याने सपकारे मारून धुवावे.
  • रोग्याची श्वास गती संथ झाल्यास कृत्रिम श्वासोच्छवास प्रारंभ करावा.
  • शरीरामध्ये अडकण प्रारंभ झाल्यास रोग्याच्या तोंडात रुमालाचा बोळा बनवून ठेवावा अथवा एखाद्या कठीण लाकडाचा तुकडा दातांच्या मध्ये ठेवावा. ज्यामुळे रोग्याची जीभ दातांमध्ये दाबणार नाही.
  • रोग्याला चहा, कॉफी सारखे उष्ण पेय प्यायला द्यावे.
  • ऑर्गेनोफॉस्फेट आणि कार्बोमेट समूहाच्या किटकनाशकांपासून विषबाधा झाल्यास एकावेळी लॅट्रोवीन औषधांचा दोन गोळ्या रोग्याला खाण्याकरिता द्याव्यात.
  • वापरलेल्या किटकनाशकांच्या विषयी डॉक्टरला आवश्यक माहिती द्यावी त्यामुळे अतिप्रभावी उपचार ताबडतोब केल्या जाऊ शकतील. म्हणजे ज्या किटकनाशकामुळे विषबाधा झाली असेल तो डबा, बादली अथवा पुडी त्वरित डॉक्टरांना दाखवावी.

अशा रीतीने विषारी किडनाशके हाताळताना आणि वापरानंतर दक्षता घेतल्यास त्यांमुळे होणारे संभाव्य अनर्थ टाळता येतील.

लेखक:
डॉ. अनिल ठाकरे 
(वरिष्ठ किटकशास्त्रज्ञ व प्रमुख, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती)
9420409960

English Summary: How to safe use of Pesticides
Published on: 28 November 2019, 03:22 IST