Others News

कंपोस्ट म्हणजे सेंद्रीय खत. कंपोस्ट हा इंग्रजी शब्द आहे, त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडतात. कंपोस्ट आणि सेंद्रीय हे वेगवेगळे खत आहेत की काय, असे त्यांना वाटते. काही लोक आजकाल सेंद्रीय खताचे महत्व पटल्यामुळे सेंद्रीय खत विकत घ्यायला लागले आहेत. पण त्याचीही गरज नाही. आपल्याच शेतातला पाला-पाचोळा, गव्हाचे काड, पाचट, तुराट्या, पर्हाट्या, कोणतेही पीक घेतल्यानंतर मागे जे काही उरलेले असेल ते म्हणजे पाने, सेंद्रीय फांद्या, खोड, टरङ्गल, भुस्सा, गवत, कोंबडीची विष्ठा, डुकाराच्या लेंड्या यांना कुजवून जे खत तयार होते त्याला कंपोस्ट खत म्हणतात.

Updated on 01 September, 2021 7:54 PM IST

शेतकर्‍यांकडे बराच सेंद्रीय कचरा असतो. परंतु त्याचा वापर सेंद्रीय खत करण्यासाठी होत नाही. हा कचरा जाळून टाकला जातो. उसाचे पाचट सुद्धा शेतकरी जाळून टाकतात. तसे ते जाळले म्हणजे खोडवा चांगला येतो, पिकातली कीड मारली जाते, खोडवा लवकर उगवून येतो असे अनेक गैरसमज असल्यामुळे शेतकर्‍यांचा उसाचे पाचट जाळण्याकडेच कल असतो. पण पाचटाचा सुद्धा उत्तम खत तयार होत असतो.

वास्तविक पाहता आपण वर्षानुवर्षे आपल्या घराच्या जवळ उकिरडा करत आलेलो आहोतच. प्रत्येक घराजवळ एक उकिरडा असतोच आणि या उकिरड्यामध्ये आपण जे काही तयार करतो तो वास्तविक कंपोस्ट खतच असतो. परंतु त्याचा सेंद्रीय फारसा फायदा होत नाही. कारण ते तयार करताना अनेक दोष राहून जात असतात. ते दोष दूर करून शास्त्रीय पद्धतीने खत तयार केला तर मात्र तो खत गुणकारी ठरतो. ते दोष आपण आधी बघूया.

१) खताच्या खड्ड्याची किंवा उकिरड्याची खोली किती असावी याबाबत आपण दक्ष नसतो. अनेक शेतकरी याचे खताचे खड्डे किंवा उकिरडे कमीत कमी पाच फुठ ते आठ फुट खोल असतात. आपण आता शास्त्रीय पद्धतीने खत तयार करणार आहोत आणि त्यासाठी जीवाणू खताचा वापर करणार आहोत. तसा तो तयार करताना उकिरड्याच्या खोलीला फार महत्व आहे. कारण खोली जितकी जास्त तेवढा खतातल्या पोषक द्रव्यांचा नाश जास्त होत असतो. अनेक वेळा उकिरडे खोदताना असे लक्षात येते की, चार-पाच फुटाच्या खालच्या थरामध्ये खूप गरमी असते. काही वेळा तर उकिरडे खोदणार्‍या मजुरांना सुद्धा तिथे उभे राहता येत नाही. खतातून गरम वाफ येत असतात. त्या वाफा असह्य झाल्यामुळे मजूर काम थांबवून वर येतात आणि या वाफाकमी झाल्या म्हणजे पुन्हा काम सुरू करतात. मग विचार करा, या उष्णतेला मजूर पाच मिनिटेही तिथे थांबत नसतील तर कचर्‍याचे खतात रुपांतर करणारे सूक्ष्म जीवजंतू त्या गरमीमध्ये वर्षभर कसे जगतील ?

तेव्हा खताचा खड्डा साडे तीन ङ्गुटापेक्षा खोल असू नये. हा कंपोस्ट खत तयार करण्याचा पहिला नियम आहे. ज्या लोकांचे खताचे खड्डे खूप खोल असतील त्यांच्या खताच्या खड्ड्यातील पहिल्या साडेतीन फुटापर्यंतच चांगला खत तयार झालेला असतो. त्या खालच्या थरातला खत म्हणजे निव्वळ सडलेला निरुपयोगी कचरा असतो. उकिरड्यामध्ये खत तयार होतो, असा आपला समज असतो. परंतु अशास्त्रीय पद्धतीने उकिरडे भरले जात असल्यामुळे उकिरड्यातले खत हे खत म्हणून उपयोगी पडत नसते. त्यात कचरा कुजवण्याच्या ऐवजी सडण्याचेच काम झालेले असते.

त्यामुळे उकिरडा भरण्याची पारंपरिक पद्धत बदलली पाहिजे. आपण पाडव्याला आपला उकिरडा खोदतो आणि त्यातला जमा झालेला, अर्धवट कुजलेला, काही कुजलेला आणि काही सडलेला असा हा कचरा शेतात नेऊन टाकतो. दुसर्‍या दिवसापासून आपल्या उकिरड्यात घरातला केरकचरा पडायला सुरुवात होते.

पहिल्या दिवशी पडलेला कचरा पुढच्या वर्षी सगळ्यात खालच्या थराला राहतो आणि त्यावर एकेक थर पडत जातो. म्हणजे उकिरड्यातला सर्वात खालचा थर एक वर्षभर बुडाला राहतो आणि त्यानंतरचे थर कमी कमी कालावधीपर्यंत वरच्या वरच्या भागात राहतात. म्हणजे पूर्ण उकिरड्यातला कचरा सारख्याच प्रमाणात कुजत नाही. वरचे थर कमी कुजलेले, मधले थर अर्धवट कुजलेले आणि सर्वात खालचा थर कुजून कुजून अगदी सडण्याच्या स्थितीला आलेले. अशी ही संमिश्र अवस्था असते. हा दोष टाळण्यासाठी दर दोन ते तीन महिन्याला जमा होणारा सेंद्रीय कचरा एकत्रित करून तो एकाच खड्ड्यामध्ये मिसळून टाकून खत तयार केले पाहिजे. उकिरड्या मधला आणखी एक दोष म्हणजे उकिरड्यात आपण शेण तसेच टाकून देतो. त्या शेणामध्ये अळ्या असतात, हुमण्या असतात. त्या अळ्या आणि हुमण्या या सडलेल्या कचर्‍यामध्ये तशाच राहतात आणि आपण त्या उकिरड्यातल्या खतासोबत शेतात नेऊन टाकत असतो. त्या शेतामध्ये गेल्या म्हणजे त्यांची पैदास वाढायला लागते. मग शेतातल्या पिकांना मर रोग लागतो.

मूळकुजव्या, सूत्र कुर्मी असे पिकांच्या मुळाला होणारे रोग तिथे वाढायला लागतात. त्यामुळे पिकांना उपयुक्त असे कीटक आणि जीवाणू म्हणावे तसे वाढत नाहीत आणि पिकांचे नुकसानच होते. मग आपण या रोगांसाठी औषधे वापरायला लागतो. ती बहुतेक रासायनिक असतात. ज्यांच्यामुळे हे रोग काही प्रमाणात आटोक्यात येतात. परंतु त्याच्यासोबत आपला मित्र म्हणजे

गांडूळ याची काही अंडी किंवा लहान लहान पिली असतील तर शेतातली ती पिली सुद्धा मरून जाऊन पिकांचे आणखी नुकसान होते. उकिरड्यामध्ये घुशी आणि उंदीर मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यांचीही पिली आणि खुद्द उंदीर या सडलेल्या कचर्‍यासोबत शेतात जातात. वर्षभर कचरा कुजवणे किंवा कुजवण्याच्या नावावर सडवणे याचे हे सारे परिणाम आहेत. ती टाळून आपल्या शेतातला आणि घरातला केरकचरा व्यवस्थित कुजवून सेंद्रीय खत करण्यासाठी काही थोड्याशा उपाययोजना आणि पूर्वकाळजी घेणे आवश्यक आहे.

मिलिंद जि गोदे 

 

English Summary: how to making organic mannure ?
Published on: 01 September 2021, 07:54 IST