कर्जबाजारीपणा, नापीकपणा, अविश्वासू शेती आणि शेतकरी आत्महत्या या गोष्टींना विदर्भात तोंड द्यावे लागत आहे. मात्र, सध्या विदर्भातील शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. विविध प्रकारची पिके घेत आहेत. त्यातून चांगल्या उत्पादनांची निर्मिती होत असल्याचेही समोर आले आहे. वाशिम येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने नोकरी न शोधता आपल्या शेतात संत्र्याची बाग लावली आहे. या संत्रा बागेचा शेतकऱ्याला मोठा फायदा झाला आहे.
वाशिममधील अडोळी गावातील विलास इधोळे यांच्याकडे वडिलोपार्जित सात एकर जमीन आहे. यातील तीन एकरांवर आठ वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली होती. पारंपारिक पद्धतीने संत्र्याचे ते उत्पन्न घ्यायचे. यातून त्यांना वार्षिक चार लाखापर्यंत उत्पन्न व्हायचे. मात्र, त्यांचा मुलगा वैभव इढोळे याने शेती करायला सुरूवात केल्यापासून त्यांचे चार लाखांचे उत्पन्न नऊ लाखांवर गेले आहे.
विलास यांचा एकुलता एक मुलगा वैभव पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे शिक्षण किंवा नोकरीसाठी गेलेल्या अनेकांना आपले गाव गाठावे लागले. यात विलास इढोळे यांचा मुलगा वैभव इढोळे यालासुद्धा आपल्या गावी परत याव लागले. गावाकडे आलेल्या वैभवने आपल्या वडिलांना शेतीकामात मदत कसण्यास सुरुवात केली.
आपल्या शिक्षणाचा उपयोग करत विकासने इंटरनेटवरून संत्रा पिकाबाबत शास्त्रशुद्ध माहिती गोळा करायला सुरुवात केली. अशातच त्याला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वाशीम आणि पंजाबराव कृषी विज्ञान केंद्र करडा येथील अधिकारी, तंज्ञांचे मार्गदर्शन मिळत गेले.
अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्याने संत्रा शेतीत प्रयोग केले. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने चार लाखांचे उत्पन्न नऊ लाखांवर नेले. यापुढे अधिक मेहनत करून संत्राचे उत्पन्न हे 15 ते 20 लाखापर्यंत नेणार असल्याचे वैभवने सांगितले. दरम्यान, शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या शिक्षणाचा फायदा घेत नोकरी न पाहता शेती सुरू करण्याचा निर्णय घेतला.
नोकरीपेक्षा शेतीतून जास्त उत्पन्न मिळते, असा संदेश त्यांनी दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक फळबागांकडे वळविण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. फळबागांमध्ये वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील फळबागांचे क्षेत्र 4,200 हेक्टरवरून 8,300 हेक्टरपर्यंत वाढले आहे. यातील संत्रा लागवडीखालील क्षेत्र 6,200 हेक्टर आहे.
तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वीपणे शेती करत आहेत. शेती अविश्वसनीय आहे. त्यातून फारसे उत्पन्न मिळत नाही. निसर्गाच्या भरवशावर ते पिकवले जाते, असा समज आजच्या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये आहे. त्यामुळे ते शेती न करता नोकरीसाठी जातात. मात्र, नोकरी न शोधता शेतीतही सोने पिकवता येते, हे वैभवने सिद्ध केले आहे.
महत्वाच्या बातम्या
"अँग्री फेरो सोल्युशन" कमी किमतीत, योग्य आणि उच्च प्रभावी विश्वसनीय सापळे निर्माता..!
Nagpur Orange: यावर्षी नागपूरची संत्री हाताला गावणार नाही; वाढत्या तापमानात अन ब्लॅक फंगसमुळे बागा क्षतीग्रस्त
Published on: 07 May 2022, 05:22 IST