Others News

वाचताना सोपं वाटत असलं तरी याचे होणारे परिणाम अतिशय भयानक आहेत.

Updated on 12 July, 2022 1:25 PM IST

वाचताना सोपं वाटत असलं तरी याचे होणारे परिणाम अतिशय भयानक आहेत. यामध्ये सर्वसामान्य माणसे, पशुपक्षी सर्वांनाच जगणे मुश्कील होईल. जलस्तोत्र आटुन जातील, भूगर्भातील पाणीही कमी होईल व त्याची नांदी ती हळूहळू वृक्ष वठणे , जमिनीमधील आद्रता निघून गेल्याने जमीन अति शुष्क होऊन झुडपे वेली या हळूहळू मरू लागतील व त्यामुळे सर्वच जैवविविधता टप्प्याटप्प्याने नष्ट होऊ शकते.याच्या पुढील चक्रात अति उष्णतेने जे पाणी आटून गेले आहे त्याच्या वाफेने अतिशय भयानक प्रमाणात अति मुसळधार पाऊस होऊन सुपीक जमीन वाहून जाणार व याने जवळपासचे लहान-मोठे बंधारे व मोठी धरणे गाळाने भरणार. त्याचा थेट परिणाम जलसाठा व जलविद्युत प्रकल्प यावरही होईल. जमिनीचा कस निघून गेल्याने हळूहळू अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊ लागेल व पुढील काही वर्षातच महागाई आकाशाला भिडेल. हा पाऊस प्रमाणापेक्षा जास्त असला तरी अतिउष्णतेच्या काळात झाडांचे झालेले नुकसान हा पाऊस भरून काढू शकणार नाही असे दिसते.

याला कारण एकच :- मागच्या व आपल्या पिढीने केलेली भयानक वृक्षतोड ,डोंगरफोड, लँड माफियांना विकलेली जंगले, गायराने, पाणथळ जागा, कांदळ वने, ग्रासलँड म्हणजे गवताळ कुरणे यांचा झालेला अपरिमित नाश.करा अजून मजा करा.विकासाच्या नावाखाली राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांनी अक्कल गहाण ठेवलेली आहे. विकास म्हणजे समृद्धी महामार्ग, कोस्टल महामार्ग , बुलेट ट्रेन संरक्षित वनातून जाणारे हायवे, मेट्रो 2-5 लाख झाडे तोडून होणार्या कोळसा आणि हिर्‍याच्या खाणी, आरे संजय गांधी नॅशनल पार्क पवई लेक जे आधीच रिझर्व फाँरेस्ट आहेत यासारखे व अश्या कितीतरी जंगलांच्या जमिनी यामध्ये सतत होणारे बांधकामे खोदकामे, प्रचंड दाट झाडी असलेल्या डोंगरांना मुद्दाम आग लावून यामध्ये खाण काढणे अथवा कोळसा बनवणे, रापण करून शेती करणे यासारखे घर घालायचे धंदे लोक जोरदार करत आहेत. वर उल्लेखलेल्या सर्व प्रकारांमध्ये पैसे न खाणारा अधिकारी किंवा नेता दाखवा आणि बक्षीस मिळवा. त्यामुळे निसर्ग, जागतिक तापमान वाढ, भविष्यात होणारे अन्नधान्य व पाण्याचे हाल यांच्याशी

कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्याला काहीएक देणे घेणे नाही. हे सगळे फक्त आता या मिनिटाला निसर्ग ओरबाडून व त्याच्या पासून जास्तीत जास्त किती पैसा बनवता येईल याकडेच लक्ष देतात. तुमचा आवडता नेता डोळ्यासमोर आणा आणि त्याने आत्तापर्यंत निसर्ग वाचवण्यासाठी खरोखरच एखादी चळवळ केली आहे का किंवा करत आहे का हे आठवून पहा आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की तो / ती फक्त नालायकच आहे. जाती-धर्म घंटा ,भोंगे, अमेरिका पाकिस्तान रशिया ,हिजाब, घुंगट, मंदिर, मशिद ,धर्मांतर या सगळ्या विषयावर सगळे राजकारणी बोलतात. पण जेव्हा निसर्ग वाचवायचा विषय येतो तेव्हा या गोधडीच्या प्रत्येकाचाच काळा पैसा जमिनीत अडकलेला असल्याने कोणीही तोंड वर करून आपल्या बाजूने येत नाही हे लक्षात ठेवा.कधी एकदा मनमाड चांदवड वगैरे बाजूला जे धान्य साठवायचे सरकारी डेपो आहेत त्याला भेट द्या. आमदार खासदारांच्या दारू बनवायच्या फँक्टर्यांना सडके धान्य लागते म्हणून 2-2 इंचाच्या पाण्याच्या पाइपने हजारो टन अन्नधान्य ओले केले जाते . जे खराब झाले या कारणाखाली एक आणि दोन रुपये किलोने मग दारू बनवायच्या कारखान्यांना विकले जाते. उद्या जर जागतिक तापमान वाढीने भारतावर खरच अन्नधान्य टंचाई कोसळली तर या हरामखोरांनी भिजवलेल्या आणि सडलेल्या धान्याच्या पोळ्या आपण खाऊ शकू का? का मस्तपैकी पिओ रम भुलाव गम म्हणून दोन दोन पॅक मारून उपाशीपोटी झोपणार ? 

अहो अति उष्णतेने आणि नंतर अतिवृष्टीने पिकं मेल्यावर शेतकरीसुद्धा जे काय उरलंसुरलं धान्य आहे ते आपल्या पोटच्या पोरांसाठी घरी ठेवेल, बाजारात विकणार नाही. तर साहेबांनो, तुमच्या घरी जे काही लाखो करोडो रुपये, सोन्या-चांदीच्या विटा, क्रिप्टो करन्सी, एप्पल चे फोन ठेवलेली आहे हे तुम्ही कशा पद्धतीने खाणार आहात? म्हणजे तळून वितळवून अजून याची माहिती कृपया द्यावी ही विनंती.जागतिक तापमान वाढीचे दुष्टचक्र सुरू झालेले आहे, याला थांबवता येणार नाही मात्र सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास हे थोडे लांब ठेवता येऊ शकते व यासाठी सर्वांनी मिळून जास्तीत जास्त झाडे लावून जगवणे व त्याच बरोबर आहे ते एक एक झाड मौल्यवान म्हणून सांभाळणे हेच केले पाहिजे. जर एकट्याने झाडे लावून सांभाळणे होत नसेल तर आजच आपल्या आपल्या भागातील विविध संस्था ज्या मोकळ्या जागांवर व डोंगरांवर वृक्षारोपण करत असतात त्यांची माहिती घेऊन त्यांना सामील व्हा. जेणेकरून एका मोठ्या ग्रुपमध्ये काम झाल्याने झाडे वाचायची शक्यता किती तरी पटीने वाढते.आणि हो आजच तुमच्या आवडत्या नेत्याला कानफटात वाजून विचारा कि ताई/भाऊ तू आणि तुझ्या पक्षाने जागतिक तापमानवाढीविरोधात लढाईसाठी काय अजेंडा बनवला आहे हे पब्लिक

समोर टाक आणि फक्त पोपटपंची नाही तर प्रत्यक्षात काम दिसले पाहिजे. कारण जर असंच चालू राहिलं व जागतिक तापमान वाढीने महागाई अन्नधान्य टंचाई झाली तर पुढील काही वर्षात सरकारी नोकर , राजकीय नेता किंवा त्याचे कुटुंबीय रस्त्याने जाताना दिसल्यास लोक पाठलाग करून पळु पळु मारतील यावर दुमत नाही.खास बातमी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी:- जागतीक तापमानवाढीने बर्फ वितळणे जोरात सुरू असल्याने पुढील काही वर्षातच समुद्र पातळी उंचावल्याने समुद्र किनारी वसलेली बहुतांश शहरे जलमय होणार आहेत. त्यामुळे पुढील दहा बारा वर्षानंतर तुम्ही कुठे जाणार आणि काय करणार हेही आम्हाला कळवावे व सरकारलाही विचारावे ही विनंती.हा लेख लिहून तुम्हाला घाबरवायचं हेतू आहे का तर हो तुम्हाला सर्वांना घाबरवायचाच हेतू आहे.कारण लोकांना सत्य पचत नाही पण जागतिक तापमान वाढीचे सत्य हे घाबरवणारेच आहे. सत्य स्वीकारा कोशातून बाहेर या आणि पर्यावरण वाचवा यासाठी जास्तीत जास्ती धडपड करायला लागा.

 

अंबरीश मोरे. नाशिक.

English Summary: For the first time in India, the ground temperature will reach 62 degrees, which will have dire consequences, making it difficult to survive
Published on: 12 July 2022, 01:25 IST