ईएम (EM) म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रोऑरगॅनिझम्स (Effective Micro-organisms). ही अपघाती तयार झालेली, नैसर्गिक, सजीव जिवाणूंचा समावेश असलेली, परिणामकारक द्रावणे आहेत. ही द्रावणे सेंद्रीय शेतीमधील महत्त्वाचा घटक असून या द्रावणांचा शोध १९८० च्या सुमारास फलोत्पादन तद्न्य डॉ. टेरूओ हिगा यांनी युनिवर्सिटी ऑफ रायुक्युस, ओकिनावा, जपान येथे लावला. सद्यस्थितीत या द्रावणांचा संपूर्ण जगात वापर होत आहे. या द्रावणांमध्ये एकूण ८० जिवाणूंचा समावेश असला तरी यामध्ये प्रामुख्याने लैक्टिक एसिड बैक्टेरिया (Lactobacillus sp.), फोटोसिंथेटिक बैक्टेरिया (Rhodopseudomonas sp.) आणि यीस्ट (Saccharomyces sp.) या जिवांणूंचा समावेश असून ही द्रावणे मानव, प्राणी आणि निसर्गासाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झालेले आहे. या द्रावणांचा वापर शेती, सेंद्रिय खतनिर्मिती, पशुपालन, कुक्कुटपालन, घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापनामध्ये फायदेशीर दिसून आला आहे. तसेच ही द्रावणे कीड आणि रोग समस्या टाळण्यासाठी सुद्धा वापरतात.जागतिक पातळीवर इम्रो (EMRO-EM Research Organization) नावाची संस्था अधिकृत ईएम द्रावण बनविते, तर २००१ सालापासून भारतात मँपल ऑर्गटेक लि., कोलकाता (Maple Orgtech Ltd., Kolkata) ही कंपनी अधिकृतरित्या जपानच्या तंत्रज्ञानाने ईएम द्रावणे तयार करत आहे. ईएम-१ या द्रावणासोबतच या कंपनीचे झाडांचे/पिकाचे किडींपासून रक्षण करण्यासाठी - टर्मिन (Termin),
संप्रेरके - प्राईमो (Primo) व प्लेंटी (Plentee), माती सुधारक - ईएम पॉवर (EM Power) व ईएम रिच (EM Rich) आणि खतानिर्मिती - बोकाशी (Bokashi), इत्यादी कार्यक्षम (एक्टीवेटेड) द्रावणेही बाजारात उपलब्ध आहेत. बोकाशी हे एक भूसा, गव्हाचा कोंड्यापासून बनविलेले कडक स्टार्टर आहे.मूळ ईएम द्रावणामधील सूक्ष्यजीव जिवंत असले तरी ते सुप्त अवस्थेत असतात, त्यांना कार्यरत (एक्टीवेट) करण्यासाठी व आर्थिक बचत करण्यासाठी दुय्यम द्रावणे तयार करतात. ही द्रावणे मूळ द्रावणाइतकेच परिणामकारक असतात. या द्रावणांचा कमी प्रमाणात परंतू नियमित वापर करावा.ईएम-२ द्रावण तयार करण्याची पद्धत :ईएम-२ हे द्रावण तयार करण्यासाठी २० ते २५ लिटर आकारमानाचे १ किंवा २ टोपण असणारे कंटेनर (प्लास्टिक ड्रम/कँन) निवडावे. त्यामध्ये १७ लिटर पाणी घेऊन त्यात १ लिटर ईएम-१ द्रावण व २ किलो गूळ (सेंद्रिय गूळ असेल तर उत्तम) टाकून हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यावे. हवाबंद करून हे कंटेनर एकसमान तापमान असणाऱ्या थंड व अंधाऱ्या जागी ठेवावे. फ्रीजमध्ये ठेऊ नये. कंटेनरला २ टोपण असतील तर कंटेनरमध्ये निर्माण होणारे वायू बाहेर काढणे सोपे होते. परिणामी, अंबाविण्याची क्रिया चांगली होते. दिवसातून १ किंवा २ वेळा कंटेनरचे टोपण उघडून द्रावण ढवळून त्यातील निर्माण झालेले वायू बाहेर सोडून द्यावे. असे न केल्यास आतमध्ये निर्माण होणाऱ्या वायूंमुळे कंटेनर फुटण्याची दाट शक्यता असते. सर्वसाधारणपणे ५ ते ८ दिवसांनंतर द्रावणावरती पांढरा थर जमा झालेला दिसेल आणि द्रावणाचा आंबट-गोड वास येईल,
तेव्हा ईएम-२ हे कार्यक्षम द्रावण तयार झाले असे समजावे.चवीलाही हे द्रावण आंबट-गोड असते. पिवळसर तपकिरी रंगाचे हे द्रावण ३० दिवसांपर्यंत वापरण्यास योग्य असते, त्यानंतर त्यास दुर्गंधी सुटते. हे द्रावण तयार करण्यासाठी शुध्द पाणी वापरावे. कूपनलिकांचे,विहिरींचे पाणी वापरू शकता. अशुद्ध पाणी (क्लोरीन,डीडीटी, ई. मिश्रित) असेल तर ते पाणी कोळश्यातून गाळून घ्यावे.२. ईएम वनस्पतीजन्य अर्क (EMFPE- EM Fermented Plant Extract) तयार करण्याची पद्धत :या अर्कामध्ये जैविक पदार्थ, सेंद्रिय आम्ले, मूलद्रव्ये, इत्यादी घटक असतात. हे अर्क तयार करण्यासाठी ईएम-२ द्रावण तयार करण्याची पद्धत वापरावी. तण; झुडुपांचे (बारीक केलेले) भाग २० ते २५ लिटरच्या कंटेनरमध्ये २ लिटर मळी (३ ते ४ टक्के प्रमाण) किंवा ५०० ग्राम गूळ (सेंद्रिय गूळ असेल तर उत्तम) व १ लिटर ईएम-१ द्रावण घेऊन त्यात १७ लिटर पाणी टाकून हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यावे. औषधी वनस्पती, उग्र तणांचा यामध्ये वापर करावा. उदा. कडूलिंबाची पाने, पपईची पाने, कोरफड, घाणेरी, गवती चहा, लव्हाळी, बेशरम, पुदिना, सब्जा, इत्यादी. वनस्पतींचे भाग बारीक करण्यासाठी पाटा-वरवंटा किंवा मिक्सर वापरावा. सर्वसाधारणपणे ५ ते १० दिवसांनी विरजण्याची क्रिया पूर्ण होऊन हे अर्क तयार होते. हे तयार झालेले २० लिटर अर्क गाळून वापरावे, उरलेला चोथा कंपोस्ट खड्ड्यात किंवा झाडाभोवती चर काढून गाढून टाकावा. या अर्काला आंबट-गोड; तिखट वास असतो, ते ९० दिवसांपर्यंत वापरता येते.
दुर्गंध येत असल्यास हा अर्क वापरू नये. हे अर्क १५-२० मि.लि. प्रती लिटर पाण्यातून जमिनिद्वारे द्यावे किंवा ३०-४० मि.लि. प्रती लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.ईएम प्रतिबंधक द्रावण (ईएम-५) तयार करण्याची पद्धत :या द्रावणाचा वापर विविध किडी तसेच रोग प्रतिबंधक संरक्षक कवच म्हणून करतात. हे द्रावण तयार करण्यासाठी १ लिटरची घट्ट झाकण असलेली बरणी घ्यावी. त्यात १०० ग्राम गूळ (सेंद्रिय गूळ असेल तर उत्तम) घेऊन ५०० ते ६०० मि.लि. कोमट पाणी टाकावे. त्यात १०० मि.लि. विन्हेगर, १०० मि.लि. लिटर ईथील अल्कोहोल (दारू) व १०० मि.लि. ईएम द्रावण टाकून हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यावे. द्रावणाची प्रत अजून उंचावण्यासाठी यात प्रत्येकी २५ ग्राम लसूण, हिरवी मिरची व कोरफड बारीक चिरून टाकतात. बरणीचे झाकण घट्ट बसवून ती बरणी सावलीमध्ये, उबदार जागेत ठेवावी. दिवसातून १ किंवा २ वेळा झाकण उगडून, बरणी हलवून त्यात निर्माण होणारे वायू बाहेर सोडून द्यावेत. ५ ते १० दिवसानंतर या द्रावणाला गोड वास येतो, तेव्हा ते वापरण्यास तयार झाले असे समजावे. हे द्रावण ९० दिवसांपर्यंत वापरता येते. वनस्पतींचे भाग किंवा गोमुत्र, काकवी आणि ईएम १०:१:१ या प्रमाणत घेऊनही हे द्रावण (ईएम-५ द्रावण) तयार करता येते.१ मि.लि. ईएम-५ द्रावण प्रती लिटर पाण्यात जमिनीतून द्यावे किंवा २ मि.लि. प्रती लिटर पाण्यातून द्रावणाची फवारणी करावीईएम-२ द्रावाणाचा वापर :
१. शेतीमधील वापर : अ. फवारणीद्वारे – १००-१२० लिटर पाण्यात २ लिटर ईएम-२ मिसळून फवारणी घ्यावी.सकाळी किंवा पाऊस पडल्यानंतर केलेली फवारणी जास्त परिणामात्मक ठरते. आठवड्यातून एकदा झाड/पीक पूर्ण भिजेल अशी फवारणी करावी.‘लीफ स्कॉर्चींग (Leaf Scorching)’ टाळण्यासाठी सकाळी लवकर किंवा सूर्य मावळल्यानंतर फवारणी करावी. पिकांना किडींपासून संरक्षण देण्यासाठी रोपवाटिकेमध्ये निरोगी व सक्षम रोपे निर्माण करण्यासाठी ईएम-२ द्रावणाची फवारणी घ्यावी.ब.जमिनीद्वारे – १०० लिटर पाण्यात ४ ते ५ लिटर ईएम-२ द्रावण घेऊन आळवणी करावी. ईएमची केल्यानंतर रोपांना/पिकाला/झाडांना मुबलक पाणी द्यावे. बारमाही पिकांस महिन्याच्या अंतराने एकदा असे ३ ते ४ वेळा तर कमी कालावधीच्या पिकांस २० दिवसांनी एकदा असे २ वेळा द्यावे.फळझाडांना आठवड्यातून एकदा ठिबक सिंचनातून व्हेंचुरी किंवा फर्टीलाइझर टेंकद्वारे ईएम-२ द्रावण सोडावे. ईएम द्रावणामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते व औषधे मिसळू नये. ईएम-२ द्रावण व रासायनिक खते एकाच वेळी सोडायची झाल्यास प्रथमतः १५ मिनिटे पाणी सोडावे. नंतर १५ मिनटे खते सोडावीत. खते सोडल्यानंतर परत १५ मिनटे पाणी सोडावे आणि नंतर ईएम-२ द्रावण सोडावे. ईएम-२ द्रावण सोडून झाल्यानंतर परत १५ मिनटे पाणी सोडून ठिबक बंद करावे. झाडांचे वय लक्षात घेऊन आळवणीमध्ये बदल करावा. पिकाला/झाडांना शेणखत/सेंद्रिय खत देण्या अगोदर हे द्रावण सोडले तर मातीतील कर्बाचे प्रमाण उल्लेखनीयरित्या वाढते.खतनिर्मितीमधील वापर – शेतातील तण, पिक अवशेष जमिनीपासून ५ सें.मी. अंतरावर कापून घ्यावे. कापलेले गवत जमिनीवर आच्छादन करून त्यावर आठवड्याला ईएमची फवारणी केल्यास तण, पिकाचे अवशेष कुजून जमिनीस खत तयार होते.
कंपोस्ट बनविताना ढीगावर ईएमची फवारणी केल्यास कंपोस्ट लवकर तयार होते तसेच कंपोस्ट तयार होताना येणारी दुर्गंध येत नाही, तसेच चिलटे, माश्या नियंत्रित होतात.पशुपालन आणि कुक्कुटपालनमधील वापर - साधारणपणे १०० लिटर पाण्यात एक लिटर ईएम-२ हे द्रावण मिसळून पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायाच्या ठिकाणी फवारणी करावी.ईएम द्रावणाचे वापरानुसार प्रकार व दर :सद्यस्थितीमध्ये बाजारात अनेक खाजगी कंपन्यांचे ईएम द्रावणे, पावडर्स उपलब्ध आहेत, परंतू त्यांची कर्यक्षमता अविश्वासनीय असल्याने अधिकृत निर्मिती परवाना असलेल्या कंपनीचेच ईएम द्रावणे विकत घ्यावीत. ईएम द्रावणांच्या किंमती सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे आहेत.अ.क्रं. ईएम प्रकार दर (रुपये/लिटर)१.शेतीसाठी ३२५-३७५ २.पशुपालन, कुकुट्टपालन ४००-४५० ३.सेद्रींय पदार्थ कुजविणेसाठी ३७५-४२५ ४.सांडपाणी व्यवस्थापनासाठी ५००-५५०ईएम द्रावणांचे फायदे :• ईएम द्रावणांच्या वापरामुळे बी उगवण क्षमता वाढते.ईएम द्रावणांच्या वापरामुळे झाडाची अन्न्यद्रव्ये शोषून घेणारी क्षमता वाढते, परिणामी पिकाची चांगली वाढ होते.• ही द्रावण जमिनीमध्ये 'अँटिओक्सिडेंड'चे काम करून पीकवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात.
• रोपवाटिकेमध्ये ईएमचा वापर केल्यामुळे रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते, रोपे तजेलदार होतात.• सर्व फळपिकांमध्ये वापर करता येऊ शकत असला तरी विशेषतः ईएम द्रावणांच्या वापरामुळे केळी पिकाची एकसारखी वाढ होते. मोसंबी, संत्र्याच्या झाडांना फुले लागण्याचे प्रमाण वाढते, फळधारणा चांगली होते. तसेच फळांची गुणवत्ता वाढते. चिकू, पेरू, डाळिंब, द्राक्ष या फळपिकांमध्येही ईएम द्रावणांमुळे उत्पन्न व गुणवत्ता वाढते.• सेंद्रिय घटकांच्या वाढीमुळे पीकांच्या पांढऱ्या मुळ्या वाढतात. विशेषतः ऊस या पिकाची वाढ चांगली होते. मुळांची वाढ, पेरांची संख्या, फुटव्यांची संख्या, तसेच पेऱ्यातील अंतर वाढते. ईएम द्रावणांच्या वापरामुळे तृनधाण्यात ५० टक्क्यांपर्यंत उत्पन्नात वाढ होऊ शकते.• ही द्रावण आम्लधर्मी असल्यामुळे ठिबक सिंचन संचामध्ये अडकणारे क्षार विरघळून जातात. शेवाळ वाढत नाही.• बाजारातील इतर सेंद्रिय तसेच रासायनिक औषधांपेक्षा ईएम द्रावण स्वस्त असल्याने उत्पन्न खर्चात बचत होते.• या द्रावणांचा सामू सर्वसाधारणपणे ३.५ ते ३.८ इतका असतो. जमिनीचा वाढलेला सामू कमी करण्यासाठी या द्रावणाच्या वापर करतात.
• मातीतील जीवाणूंच्या कार्याला मदत करून मातीतील जैविक वातावरण सुधारण्यास मदत करते.जिवाणू खतांचा ईएम सोबत केलेला वापर जास्त परिणामकारक दिसून येतो.• जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये चांगल्या पद्धतीचा परिणाम दिसून येतो.• या द्रावणांच्या वापरामुळे पालापाचोळा लवकर कुजतो तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थही लवकर कुजतात.• गांडूळ खताच्या वाफ्यावर याची फवारणी केली असता लवकर खत तयार होण्यास मदत होते.• काही देशांमध्ये या द्रावणांचा प्रभावशाली वापर दूषित पाणी शुद्धीकरण प्रणालीत करत आहेत.• ही द्रावणे पर्यावरण रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात.• ईएम द्रावणाची शेतीपूरक व्यवसाय करण्याच्या ठिकाणी फवारणी केली असता तेथील दुर्गंधी कमी होते, डास, चिलटे, माश्या कमी होतात.हानिकारक जंतूंनी दूषित परीसंस्था बदलून तिचे रुपांतर उत्पादक परिसंस्थेत करणारी, माफक किमतींमध्ये मिळणारी हि द्रावणे आपल्या देशात दुर्लक्षितच आहेत. त्यांचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे.
मिलिंद जि गोदे
Published on: 12 June 2022, 07:41 IST