थोडं पण महत्वाचं उन्हाळ्याच्या शेवटी प्रतिक्षा असते ती म्हणजे मृग नक्षत्रात येणाऱ्या पाऊसाची तो संततधार असावी नद्या-नाले,ओढे-तलाव भरभरून वाहावेत असे आपल्या वाटतं.आदर्श आणि उपयुक्त पावसाळा यापेक्षा वेगळा असू शकत नाही हे ही तितकेच खरे. परंतु आता काय झाले काय माहित मागील काही वर्षात मान्सूनचा संपुर्ण पॅटर्न बदलला आहे.तुम्ही जाणवले असेल.काही तज्ञ अपवाद आहे. मान्सून जरी जूनमध्ये दाखल झाला तरी, त्याची खरी सुरुवात जुलैमध्ये होते हे आपण याच वर्षात अनुभवलं आहे आणि ऑगस्टमध्येच तो खर्या अर्थाने सक्रिय होताना दिसतो आहे. सप्टेंबरच्या मध्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू व्हायला हवा. पण अनेकदा मान्सून नोव्हेंबपर्यंत सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. शिवाय पावसाचे भौगोलिक वितरण असमान आहे. दोन पावसांमधला खंडित कालावधी वाढला आहे. एकाच वेळी मुसळधार बरसल्यानंतर अनेक दिवस दडी मारून बसणारा पाऊस आता अनुभवायला मिळतोय. याचाच अर्थ पावसाचे प्रमाण आणि स्वरूप बदलत आहे, हे स्पष्ट होते. भारतातील शेती आजही बऱ्याच अंशी
मान्सूनवर अवलंबून असल्याने साहजिकच त्यामुळे शेती क्षेत्रावरील दुष्काळाची छाया गडद होतं आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे बदलत्या पर्जन्यमानाचे स्वरूप लक्षात घेऊन शेती पद्धतीतही बदल करण्याची गरज आज आहे?वाचकहो नैसर्गिक बदलाचे संकेत समजावून घेऊन त्यावर वेळीच उपाय योजल्या गेले नाहीत तर परिणाम अजून दाहक होण्याची भीती आहे.पावसाची दोन रुपे यावर्षीही आपण अनुभवत आहोत. हापुरामुळे गुजरात मध्ये वलसाड सह अन्य काही राज्यात हाहाकार उडाला, तर आमच्या भागात अजूनही शेतकरी वर्ग पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. यंदा सरासरी आणि चांगला मान्सून बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. पण नेहमीप्रमाणे यावर्षीही तो चुकलाच. मृग उलटून गेल्यानंतर पावसाचे आगमन झाले. आषाढ म्हणावा तसा भिजला नाही. पाहुण्यांसारखाच होता. मध्यातच पावसाने मोठी दडी मारली. त्यामुळे शेती पीक करपले. काही ठिकाणचे जलसाठे भरले असले तरी काही ठिकाणी
सुरवातीलाच पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका होता. जल संरक्षणाची मोहीम यंदा मोठ्या प्रमाणात राबविली गेली. अनेक ठिकाणी त्याचा परिणाम दिसून येतोय मात्र. काही ठिकाणी समाधानकारक पाऊसच न झाल्याने भांडे तयार असूनही पाण्याची साठवणूक करता आलेली नाही.मान्सूनचा लहरीपणा आजचा नाही. गेल्या काही वर्षापसून मान्सूनच्या एकूणच पॅटर्न मध्ये बदल होतोय. जागतिक तापमान वाढ, वृक्षतोड, पर्यावरणाचा ह्रास यासारखी अनेक करणे यामागे आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यावर उपाय योजना करणे गरजेचेच. मात्र बिघडलेली परिस्थिती सुधारण्यासाठी बराच वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता गरज आहे ती हा बदल समजून घेऊन स्वीकारण्याची. कारण, निसर्गावर आपली सत्ता चालत नसली तरी आपण निसर्गाशी निश्चितच जुळवून घेऊ शकतो. त्यामुळे बदल समजवून घेऊन त्याला साजेशी शेती पद्धत आता अवलंबविण्याची गरज निर्माण झाली आहे. बदलत्या काळानुंसार, बदलत्या हवामानांनुसार शेती पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असणारी शेती बेभरवश्याची
झाल्याने परंपरागत पद्धतीने शती करुन शेतकर्याचा टिकाव लागणे आता शक्य नाही. त्यामुळे हवामानानुसार शेतीला मान्सूनप्रुफ बनवावे लागेल. यासाठी नवं युवकांनी शेतीला एक आव्हान म्हणुन स्विकारावे, आणि आपल्या ज्ञानाचा वापर शेती विकसित करणासाठी उपयोगी आणावा. आज सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने फार मोठी झेप घेतली स्वप्नवत वाटणार्या अनेक गोष्टी विज्ञानाने सहजशक्य बनविल्या पण शेती व्यवसाय या तंत्रज्ञानापासून काहीसा दुरच राहीला असल्याचे दिसते. त्यासाठी शेती आधुनिक करणारं तंत्रज्ञान विकसीत केल्या गेल पाहिजे. केवळ शेतीतून जास्त उत्पन्न होण्यासाठीच नव्हे तर शेतीचा दर्जा टिकवण्यासाठी तिला सुपीक बनविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पावसाचा अचूक अंदाज जर शेतकऱयांना समजला तर शेतीतील बरेचशे नुकसान टाळत येऊ शकेल. मान्सूनच्या अचूक आगमनावर शेतकऱ्यांना पेरण्या करता येतील. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीठ याचाही अंदाज शेतकर्याना समजला पाहिजे.
त्यासाठी अचूक हवामान अंदाज वर्तवणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.नुसती यंत्रणा उभारून चालणार नाही तर तिची उपलब्धता वेळोवेळी तपासली गेली पाहिजे.अतिवृष्टीचा इशारा असो की वातावरणातील उष्मा,नागरिकांना हवामानविषयक अधिकृत आणि अचूक माहिती मोबाइलवर मिळावी अशी व्यवस्था उपलब्ध करणे गरजेचे आहे. आज हवामानविषयक माहिती देणारे अनेक अॅप्स मोबाईलवर उपलब्ध असले तरी त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह असते. काळची पाऊले ओळखून बदल स्वीकारणे आणि परंपरागत मार्ग सोडून आधुनिकतेची कास धरल्यास लहरी मान्सूनचा सामना आपल्याला करत येईल. हवामान बदलाचे एक मोठे संकट आज आपल्यासमोर उभे ठाकले आहे. त्यामागील कारणांचा शोध घेणे जरुरीचे असून त्यावर वेळीच उपाय योजल्या जायला हवेत. नाहीतर सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही हेही तेवढेच सत्य आहे.
मिलिंद जि गोदे milindgode111@gmail.com
Published on: 11 July 2022, 07:09 IST