सगळ्या आळीमध्ये जोश्या फेमस होता तो त्याच्या चिकटपणासाठी. इतरांवर खर्च सोडा, स्वतःवरसुद्धा खर्च करायचा नाही. ड्रेस कोड म्हणाल तर सदरा आणि लेंगा. टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करायचा. पगार बेताचा होता आणि इतर वेळात घरी मशीनी आणून दुरुस्त करायचा. जोड कमाई म्हणून. समोरच्या चाळीमधून जेवणाचा डबा आणायचा आणि तो एक वेळचा डबा दोन वेळा पुरवून खायचा. कुणाला काही द्यायचा नाही आणि हो, कुणाकडून फारसं कधी घ्यायचा नाही. त्याच्या ह्या स्वभावाने मित्र फारसे जोडले नाहीत पण माझ्याशी कधी कधी बोलायचा. गावाच्या, कोकणच्या गोष्टी सांगायचा. लोकांत मस्करीचा विषय होता जोश्या. तो म्हणे बसचे पैसे वाचावे, म्हणून धोबीतालाव ते बाणगंगा
चालत जायचा आणि त्याचा एकूण स्वभाव पाहता ते खरं असावं ह्याबद्दल शंका घेण्याचं कारण नव्हतं. त्यादिवशी असाच तो मशीन दुरुस्त करताना काहीतरी गुणगुणत होता. त्याला चहा दिला घरचा. तसा तो सांगत होता.. मला कधी कधी चहाची तल्लफ आली तर मी गरम पाणी पितो सरळ. दिवसा एक चहावर सहसा चहा घेत नाही. त्यादिवशी वडा सांबार खावसा वाटलं. पैसे जास्त मोडायला नको आणि बाहेरचे खायचेच म्हणून मग शेंगदाणे घेतले दोन रुपयांचे. दोन रुपये सांगताना त्याचे दोन डोळे भुईमूगच्या शेंगा इतके मोठे झाले. मला हसू आलं. मजा वाटली. आयुष्य मारून काय जगतो हा माणूस आणि आपल्या चिकटपणाचा अभिमान तो काय
बाळागायचा माणसाने. हा वायफळ खर्च वाचवतो ना म्हणून मग माझी महिन्याची SIP पूर्ण होते रे. जोश्याकडून एस् आय् पी ऐकून मी चमकलो. हा माणूस पैसे वाचवून गुंतवणूक करीत असेल असं त्याच्या एकूण स्वभाव, गुण आणि अवताराकडे बघून वाटत नव्हतं. फार फार तर हा माणूस पोस्टात नाहीतर बँकेत पैसे ठेवत असेल. जोश्याला माझ्या चेहेऱ्यावरचा गोंधळ अगदी सुस्पष्ट वाचता आला असावा. मघाच्या चहाला जागून म्हणा... तो सांगता झाला. सगळे मला कंजूष म्हणतात, चिकट म्हणतात किंवा आणि काय काय म्हणतात. मी माझा पगार कधीच खर्च करीत नाही. तो गुंतवतो पूर्णच्या पूर्ण. एस् आय् पी मध्ये आणि माझा जो काही खर्च येतो तो
माझ्या ह्या बाहेरच्या कामावर भागवतो आणि माझा पूर्ण महिन्याचा पगार मी एस् आय् पी करतो. खेडेगावातली जी मुलं असतात त्यांच्या वार्षिक शिक्षणासाठी आणि त्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी (दुपाराची पेज) यासाठी गावी पाठवतो. साधारण सात हजार रुपये एका मुलाचा वार्षिक खर्च येतो. कधी माझ्या गावात तर कधी कोशीतल्या गावात. आजच्या घडीला माझ्या ब्रम्हचाऱ्याची स्वतः ची दोनशे मुलं आहेत शिकणारी. आहेस कुठे..! जोश्या हसत हसत म्हणाला. टाळीसाठी त्याने हात पुढे केला तेव्हा त्याचा काखेत उसवलेला सदरा दिसला. खरं सांगायचे तर अगदी काळीज उसवून गेला. मन विस्कटवून गेला.तो कंजूष माणसाचा सदरा.
केदार अनंत साखरदांडे
Published on: 12 July 2022, 11:58 IST