नवी दिल्ली : अलीकडच्या काळात आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे ओळखपत्र झाले आहे. आधार कार्डशिवाय कोणतेही महत्त्वाचे कागदोपत्री काम पूर्ण होत नाही. बॅंकेत खाते सुरू करण्यापासून ते मोठाल्या व्यवहारांपर्यत अनेक ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. आधार कार्डमध्ये आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर सारखी आवश्यक माहिती असते.
त्यामुळे आधार कार्डमधील तुमची माहिती अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आधार कार्डचे नियंत्रण करणारी युआयडीएआय ही संस्था यासंदर्भात नागरिकांना सूचना देत असते. आधार कार्डमधील माहिती अपडेट करणे असो की नवीन आधार कार्ड बनवणे असो आपल्याला या युआयडीएआयच्याच वेबसाईटवर जावे लागते. मात्र या यूआयडीएआयने अलीकडेच आधार कार्डशी संबंधित दोन सेवा बंद केल्या आहेत. या निर्णयाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे.
आधार कार्डची रीप्रिंट करणे बंद (Aadhaar Card Reprint)
यूआयडीएआयने आधार कार्डची रीप्रिंट करण्याची सेवा थांबविली आहे. आधीच्या सेवेत आधार कार्डची रीप्रिंट करता येत होती. मात्र आता जुन्या आधारकार्डऐवजी यूआयडीएआय नवीन प्लास्टिक किंवा पीव्हीसीचे कार्ड देते आहे. या कार्डाची हाताळणी सोपी आहे. बॅंकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असते त्याचप्रमाणे हे नवे आधार कार्ड असणार आहे. नव्या आधार कार्डचा आकार, रचना आणि प्लास्टिकचे असणे यामुळे नागरिक ते कुठेही सहजरित्या नेऊ शकतात. हल्ली आधार कार्ड खिशात असणे अनेकवेळा आवश्यकठरते. (https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf)
ट्विटरवर आधार हेल्प सेंटरने यासंर्भात ट्विट करून माहिती दिली होती. त्यात हेल्प सेंटरने (Aadhaar Help Centre)म्हटले होते की ऑर्डर आधार रीप्रिंट ही सेवा बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी नागरिक आता आधार पीव्हीसी कार्डची सेवा घेऊ शकतील. नागरिक हे पीव्हीसी कार्ड (PVC Card)ऑनलाईन मागवू शकतात. याशिवाय नागरिकांना जर आवश्यकता असेल तर ते ई-आधारची प्रिंटदेखील घेऊ शकतात आणि ती कागदरुपी प्रिंट सोबत ठेवू शकतात.
अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर (Address Validation Letter)
यूआयडीएआयने आधार कार्डमध्ये नागरिकांचा पत्ता अपडेट करण्याची सुविधा तात्पुरती बंद केली आहे. अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करता येत होता. ज्यांचा पत्ता काही कारणामुळे बदलला किंवा जर कोणी भाड्याच्या घरात राहत असतील तर घर बदलल्यावर पत्ता अपडेट करावा लागतो. ऑनलाईन स्वरुपातदेखील पत्ता अपडेट करता येत होता. मात्र आता यूआयडीएआयने आपल्या वेबसाईटवरून अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरची सुविधा किंवा पर्याय काढून टाकला आहे. ही सुविधा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली असून पुढील आदेशानंतर त्यासंदर्भात कळवण्यात येणार आहे. (https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf)
यूआयडीएआयने बंद केलेल्या या सुविधेमुळे नागरिकांची थोडीशी गैरसोय होणार आहे. सद्य परिस्थितीत ज्यांना लगेचच पत्ता बदलण्याची आवश्यकता आहे अशा नागरिकांची यामुळे मोठीच गैरसोय होणार आहे. कारण सध्या तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलेल्या या सुविधेमुळे नागरिकांना ऑनलाईन स्वरुपात पत्ता अपडेट करता येणार नाही.
Published on: 09 July 2021, 11:53 IST