संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण असणारी आणि रोमांचक अशी पेटत्या कठ्यांची यात्रा जवळजवळ कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर पार पडली. ही यात्रा अकोले तालुक्यातील कौठवाडी या गावात भरते. दोन वर्ष कोरोना काळात अनेक निर्बंधांमुळे भारतीयांना सगळेच सण, यात्रा साधेपणाने साजरे करावे लागले मात्र यंदा प्रत्येक सण उत्सव हे थाटामाटात साजरे करण्यात आले आहे. कौठवाडीत या वर्षी लोकांच्या आकर्षणाचा भाग असलेली कठ्यांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे.
काय आहे कठा यात्रेचा इतिहास:
जाणकरांच्या मते, बिरोबा देवस्थान हे मोगलांच्या काळातील आहे. जेव्हा शिवनेरी किल्ल्यावर हल्ला झाला तेव्हा लोक सैरावैरा पळू लागले. तेव्हा काही लोक हे राजूर तालुक्यातील कौठवाडी येथे आले. आणि येताना आपला दगडरूपी देव घेऊन आले. नंतर सर्व ठीक झाल्यावर ते पुन्हा जाऊ लागले, तेव्हा तो लहानसा दगड काही केल्या हलेना. तेव्हा हा प्रांत जहागिरीखाली होता. तेथील जहागिरदार भोईर आणि भांगरे यांना कसण्यास जमीन देत येथेच स्थायिक होण्यास सांगितले. तेव्हापासून येथे बिरोबाची पूजा करण्यात येते.
बिरोबाला नवस बोललेले भाविक डोक्यावर मडके (कठे) घेऊन मडक्याला छिद्रे पाडून त्यात उकळलेले तेल टाकतात. त्यानंतर नवस फेडण्यासाठी हे पेटते कठे डोक्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालतात. त्यावेळी बिरोबाच्या नावाने घोषणा दिल्या जातात. हे रोमांचकारी दृश्य पाहण्यासाठी राज्यभरातून मोठय़ा संख्येने भाविक या ठिकाणी जमतात.
कोरोनामुळे दोन वर्षांनी ही यात्रा भरल्याने भाविकांची संख्या मोठी होती. गावात श्री बिरोबा देवाचे मंदिर आहे. कठय़ाच्या यात्रेमुळे हे गाव सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे. डोक्यावर पेटते कठे घेतल्यानंतरचे दृश्य रात्रीच्या अंधारात उठून दिसत होते. ही यात्रा पाहण्यासाठी नगर, पुणे, संभाजीनगर, नाशिक, धुळे, कल्याण, विदर्भातून लोकांनी येथे गर्दी केली होती. कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी देवाला 'कठा' लावून नवस बोलला जातो.
तसेच हा नवस पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. यंदा या यात्रेत 91 कठे पेटविले होते. यावेळेस पुजारी भोईर यांना बिरोबाच्या पूजेचा मान मिळाला होता. साकीरवाडी येथून मानाच्या कठीचे आगमन झाले. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पेटलेले कठे आले. 'बिरोबा की जय' म्हणत मंदिराभोवती पाच फेरे मारून भाविकांनी आपले नवस फेडले.
आगळे वेगळे; मुलीची वाजतगाजत वरात काढणारा शेतकरी
मडक्याच्या घागरीला कठा म्हणतात. मडक्याची वरची बाजू कापून त्यात खैर, साग, चंदन अशी विविध प्रकारची लाकडे व समिधा टाकून घागर पूर्ण भरतात. त्यानंतर त्यात गोडे तेल टाकून चांगली भिजवितात. घागरीच्या चोहोबाजूंनी पांढरेशुभ्र कापड गुंडाळून वरच्या टोकाला मंदिरासारखा आकार करतात. हे कठे,घागर बिरोबा मंदिरात ठेवतात.
साकीरवाडी येथून सात वाजता मानाची काठी येते व 'बिरोबा की जय' अशा घोषात ढोल-ताशांच्या गजरात कठे पेटविले जातात आणि मग या यात्रेला सुरुवात होते. मंदिराभोवती उघडय़ा अंगाने, डोक्यावरून संपूर्ण शरीरावर वाहत असलेले तेल, डोक्यावरचा अग्नी हे सारे दृश्य पाहून पाहणाऱयांच्या अंगावर काटा येतो.
महत्वाच्या बातम्या:
कैतुकास्पद ! आयुर्वेद उपचार कॅन्सरसाठी उपयुक्त; पुण्यातील डॉक्टरचा यशस्वी प्रयोग
सोने-मोतीला मिळत आहे सोन्यासारखा भाव! हमीभावापेक्षा चार पट अधिक भाव, जाणून घ्या या वाणाची वैशिष्ट्ये
Published on: 10 May 2022, 11:17 IST