News

रशिया आणि युक्रेन मध्ये जवळपास दीड महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याचा मोठा विपरीत परिणाम बघायला मिळत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत.

Updated on 08 April, 2022 6:03 PM IST

रशिया आणि युक्रेन मध्ये जवळपास दीड महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याचा मोठा विपरीत परिणाम बघायला मिळत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत.

एवढेच नाही याचा फटका शेतकरी बांधवांना देखील बसला आहे युद्धामुळे खत आयातीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याने आगामी खरीप हंगामात खतांचे दर लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. युद्धामुळे अनेक प्रतिकुल परिणाम बघायला मिळत आहेत. असे असले तरी, या युद्धामुळे काही अनुकूल परिणाम देखील हळूहळू उमटू लागले आहेत.

युद्धामुळे रशियातून गव्हाची निर्यात जागतिक बाजारपेठेत होणे शक्य नाही त्यामुळे याचा फायदा भारतीय गव्हाला होत आहे. तज्ञांनी देखील गव्हाच्या दरात मोठी वाढ होणार असा आशावाद व्यक्त केला होता मात्र आता प्रत्यक्षात याची प्रचिती समोर येत आहे ती नंदुरबार जिल्ह्यातून. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाला तब्बल 5 हजार 451 रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी दर मिळाला आहे. जाणकार लोकांच्या मते, गव्हाला एवढा विक्रमी दर याआधी कधीच मिळाला नव्हता.

राज्यात सर्वत्र रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गव्हाची काढणी प्रगतीपथावर असून अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील गहू बाजारात दाखल होऊ लागला आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील हळूहळू गव्हाची आवक बघायला मिळत आहे. या एपीएमसीमध्ये धुळे जिल्ह्यातील छडवेल येथील एका शेतकऱ्याच्या 973 या गव्हाच्या जातीला 5 हजार 451 रुपये प्रतिक्विंटल हा उच्चांकी दर मिळाला आहे. या शेतकऱ्याने जवळपास आठ क्विंटल गहू विक्रीसाठी आणला होता. म्हणजे त्या शेतकऱ्याला जवळपास 42 हजार रुपये गहू विक्रीतून मिळालेत. तज्ञांच्या मते, गव्हाची आवक जर अजून कमी झाली तर गव्हाचे दर विक्रमी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निश्चितच गहू उत्पादक शेतकऱ्यांची चांदी होणार आहे.

नंदुरबार एपीएमसीमध्ये मार्च महिन्यापासून गव्हाची आवक बघायला मिळत होती. रोजाना या एपीएमसीमध्ये चार हजार क्विंटल गव्हाची आवक होत असल्याचे सांगितले जात आहे. आवक जरी खूप कमी नसली तरीदेखील गव्हाला 2200 ते 2600 रुपये प्रति क्विंटल एवढे सरासरी दर मिळत होते. मात्र गुरुवारी धुळे जिल्ह्यातील छेडवेल येथील एका शेतकऱ्याच्या 973 या जातीच्या गव्हाला जवळपास साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी दर मिळाला.

कृषी तज्ञांच्या मते, या वर्षी रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण असल्याने गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे शिवाय पोषक वातावरण असल्याने उत्पादनात देखील वाढ होणे सहाजिक आहे. मात्र असे जरी असले तरी देखील सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाचा मोठा तुटवडा भासणार आहे यामुळे आगामी काळात देखील गव्हाचे दर टिकून राहतील. यामुळे येत्या काही दिवसात गव्हाची आवक जर कमी झाली तर गव्हाचा दरात अजून वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

यंदा रब्बी हंगामात पोषक वातावरण होते मात्र मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसला होता यामुळे गव्हाच्या उत्पादनात 22 टक्‍क्‍यांनी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे मात्र सध्या मिळत असलेला उच्चांकी दर बघता शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. एकंदरीत गहू उत्पादक शेतकऱ्यांनी गव्हाची साठवणूक केली तर कदाचित गव्हाचे दर अजून भडकण्याची शक्यता आहे. कारण की खरिपातील मुख्य पीक कापूस आणि सोयाबीन बाबत देखील शेतकऱ्यांनी हाच हातखंडा उपयोगात आणला होता आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा देखील झाला होता.

English Summary: Wheat received a high rate of five and a half thousand rupees per quintal; Why get such a record rate
Published on: 08 April 2022, 06:03 IST