कित्येकदा शेतीच्या वादातून कुटुंब उध्वस्त होताना आपण पहिले असेल. शेतीचा वाद कधी कोणत्या थराला जाईल सांगता येणार नाही. नांदेड जिल्ह्यातील लोह तालुक्यातील खेडकरवाडी या भागात शेतीच्या वादातून दोघा मुलांनी जन्मदात्या पित्याचा गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. ही घटना ३० जून रोजी घडली आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. हावगी नारायण कल्याणी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हावगी कल्याणी यांनी काही वर्षांपूर्वी आपली पाच एकर शेती विकली होती. आपल्या दोन मुलांचा याबाबत कोणताच सल्ला न घेता त्यांनी ही जमीन परस्पर विकली होती. सचिन कल्याणी (वय २५), हनुमंत कल्याणी (वय ३२) ही त्यांची दोन मुले. या दोघांनी उर्वरित शेती आपल्या नावे करावी अशी मागणी आपल्या वडिलांकडे केली. मात्र या गोष्टीसाठी वडील सहमत नव्हते. सातत्याने या तिघांमध्ये शेतीमुळे भांडणे होत असत.
३० जून रोजी शेतात पेरणीचे काम सुरु असताना तिघांमध्ये पुन्हा एकदा शेतीवरून वाद सुरु झाला. मात्र या वादाने असं काही आक्रमक स्वरूप धारण केलं की ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. सचिन कल्याणी, हनुमंत कल्याणी या दोन्ही मुलांनी रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या पित्याचा दोरीने गळा दाबून हत्या केली.
शेतकऱ्याने वाजत गाजत काढली कांद्याची मिरवणूक; वाचा नेमकं काय आहे प्रकरण
घटनेचा व्हिडीओ पोलिसांच्या ताब्यात
या घटनेची माहिती मिळताच माळाकोळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच संपूर्ण घटनेचा व्हिडीओ हा आरोपीच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्रभाकर वलांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन हावगी, हनुमंत हावगी यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा पोलीस निरीक्षक माणिकराव डोके तपास करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
ऐन हंगामात खताची टंचाई; शेतकऱ्यांची वाढली चिंता
नुकसान भरपाईचे दावे न्यायालयात अडकले; 3 लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित
Published on: 03 July 2022, 05:17 IST