गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस काही ना काही कारणास्तव आगीच्या भक्षस्थानी जात असल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथून देखील फडातला ऊस जाळण्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे 24 शेतकऱ्यांचा 50 एकरावरील उस अग्नीच्या भक्ष्यस्थानी गेला असून आता फडात केवळ राख शिल्लक राहिली आहे.
या अग्निकांडामुळे संबंधित शेतकरी मेटाकुटीला आला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. वळसे येथील माळ, छडू, नारगवंडी परिसरात हा अग्नितांडव बघायला मिळाला. या शिवारात शनिवारी उच्च दाबाच्या विद्युत वहिनीला शॉर्टसर्किट झाल्याने उसाच्या फडात आग लागली असल्याचे प्राथमिक पाहणीनुसार उघड झाले आहे.
अवघ्या काही मिनिटात पन्नास एकरावरील उसाच्या फडात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीने होत्याचं नव्हतं करून ठेवलं यामुळे या शिवारातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून यासाठी त्यांनी नुकसानभरपाईची मागणी देखील केली आहे.
या पन्नास एकरावरील उसाच्या क्षेत्रात थोडा फारच उस शिल्लक राहिल्याचे सांगितले गेले आहे. नाममात्र ऊस शिल्लक राहिलेला असला तरी आगीत सापडलेल्या उसाचे वजन कमी होते याशिवाय कारखानदारांकडून अशा उसाला पसंती मिळत नाही आणि सहाजिकच यामुळे उसाला कमी दर प्राप्त होतो.
या अग्नी तांडवामुळे शिवारातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेता निदान ऊसाच्या दरात तरी कपात केली जाऊ नये अशी आर्त हाक संबंधित शेतकऱ्यांनी कारखानदारांना मारली आहे.
सध्या गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे, मात्र असे असतानाही अजूनही बहुतांशी उस फडातच उभा असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिलो की धडकन तेज झाली आहे. कारखानदार त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करत असून त्यांच्या सोयीने कारखानाच्या जवळ असलेल्या उसाची तोड केली जात असून कारखान्यापासून लांब असलेला ऊस अजूनही फडातच उभा असलेला बघायला मिळत आहे.
आता हंगाम सुरु होऊन जवळपास सतरा महीने उलटली आहेत त्यामुळे फडात उभा असलेला ऊस ऊस राहिला नसून चिपाड बनला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान कमी होते की काय म्हणून रोजाना राज्यात शॉर्टसर्किटमुळे फडातला उस जळण्याच्या घटना समोर येत आहेत.
एकीकडे वेळेवर ऊसतोडणी होत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल होत असून दुसरीकडे शॉर्टसर्किटमुळे घडत असलेल्या अग्नी तांडवामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया आता समोर येऊ लागले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी महावितरणकडे शॉर्टसर्किटच्या घटनेचा कायमचा निकाल लावण्याची मागणी केली असून ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आगीमुळे नुकसान झाले आहे त्यांना त्वरित नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे.
संबंधित बातम्या:
खरं काय! मोदी सरकार कृषी कायदे मागच्या दाराने का होईना लागू करेलच; सीताराम येचुरी यांचा गंभीर आरोप
बियाण्यावर बिजप्रक्रिया का करावी? जाणुन घ्या याविषयी काही महत्वाची माहिती
मक्याचा आडोसा घेऊन 'या' शेतकऱ्याने केलं असं काही विपरीत की पोलिसांनी टाकला छापा आणि……!
Published on: 21 March 2022, 06:09 IST