औरंगाबाद : कालपासून औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. 40 एकरावर हा कृषी महोत्सव भरवला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कृषी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याची माहिती प्रदर्शनात मिळेल. शेतकरी मोठा उद्योजक होऊ शकतो याची देखील माहिती या कृषी प्रदर्शनातून मिळेल. यातून शेतकऱ्यांना लाभ होईल. नक्कीच त्यांच्या आयुष्यात बदल होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी आमचं सरकार काम करत असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले, लाखो शेतकरी याठिकाणी उपस्थित आहेत. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळायला हवी. पौष्टीक तृणधान्याच्या लागवडीची सुरुवात सिल्लोडमधून होत आहे. त्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे या कृषी महोत्सवासाठी धन्यवाद व्यक्त करतो.
भारतीय शेतीचे भविष्य - 'डिजिटल शेती'
या कृषी महोत्सवा विविध पिकाचे, फळ पिकांची तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. तसेच विविध कंपनीचे स्टॉल्स लागणार आहेत. यावेळी राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, मंत्री संदीपान भुमरे यांची उपस्थिती होती.
Published on: 02 January 2023, 01:06 IST