घाऊक बाजारात कांदा, बटाटा, हिरवी मिरची, कारली, ढोबळी मिरची, पावटा या फळभाज्यांच्या दरात घट झाली. मटारच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२९ ऑगस्ट) राज्य तसेच परराज्यातून मिळून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. घाऊक बाजारात आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून १० ते १२ ट्रक लसूण, गुजरात आणि कर्नाटकातून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, आग्रा, इंदूर, गुजरात तसेच स्थानिक भागातून मिळून ७० ते ७५ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती बाजारातील प्रमुख व्यापारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ११०० ते १२०० गोणी, टोमॅटो ६ ते ७ हजार पेटी, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, तांबडा भोपळा ५ ते ६ टेम्पो, पुरंदर,पारनेर,वाई भागातून ४०० ते ५०० गोणी मटार, भुईमूग शेंग एक हजार गोणी, पावटा ४ ते ५ टेम्पो, कांदा ६० ते ७० ट्रक अशी आवक झाली.
कोथिंबीर, मेथी, चाकवत महाग
कोथिंबीर, मेथी, चाकवत, अंबाडी या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. शेपू, कांदापात, करडई, पुदिना, राजगिरा, चवळईच्या दरात घट झाली आहे. पालकाचे दर स्थिर आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या दीड लाख लाख जुडी तसेच मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली. किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथीच्या एका जुडीची विक्री १० ते २० रुपये दराने केली जात आहे.
हेही वाचा : खरीप हंगामातील भाजीपाला पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन
घाऊक फळबाजारात डाळिंब, सीताफळाच्या दरात वाढ झाली आहे. लिंबे, अननस, संत्री, मोसंबी, सफरचंद, खरबूज, पेरू, चिक्कूचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. फळ बाजारात केरळहून ४ ट्रक अननस, कलिंगड २ ते ३ टेम्पो, मोसंबी ७० ते ८० टन, संत्री १० ते १२ टन, डाळिंब ३० ते ४० टन, सफरचंद ३ ते ४ हजार पेटी, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू ८०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी), चिक्कू दोन हजार खोकी अशी आवक झाली.
नारळी पौर्णिमेनंतर मासळीची आवक वाढली
नारळी पौर्णिमेनंतर खोल समुद्रातील मासेमारीस सुरुवात झाली असून खोल समुद्रातील मासळीची आवक वाढली आहे. श्रावणामुळे मासळी, चिकन तसेच मटणाचे दर स्थिर आहेत. रविवारी गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी ८ ते १० टन, खाडीतील मासळी ५०० ते १००० किलो, नदीतील मासळी २ ते ३ टन, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची मिळून १४ ते १५ टन आवक झाली, अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. मटण आणि चिकनला मागणी नसल्याने दर स्थिर आहेत, असे मटण विक्रेते प्रभाकर कांबळे तसेच चिकन विक्रेते रुपेश परदेशी यांनी सांगितले.
Source- loksatta
Published on: 30 August 2021, 10:37 IST