कोरोना संकटामुळे विविध प्रकारच्या शेतमालाच्या निर्यात प्रक्रिया प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले. त्याला आंबा हे फळ देखील अपवाद नव्हते. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे आंबा निर्यात ही संकटांच्या चक्रव्यूहात सापडली होती.
परंतु आता आंब्याची निर्यात वाढावी यासाठी आवश्यक असणारी निर्यात प्रक्रिया सुरु करण्यासाठी कृषी पणन महामंडळाने जोरात तयारी सुरू केली आहे. यामुळे आता दोन वर्षांपासून रखडलेली आंब्याची निर्यात प्रक्रियेला या माध्यमातून गती येणार आहे.
आंबा निर्यातीसाठी कृषी पणन महामंडळाची तयारी
कृषी पणन महामंडळातर्फे निर्यात प्रक्रियेला गती देण्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून या माध्यमातून या वर्षी जवळजवळ अडीच हजार टन आंब्याच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार यांनी दिली. सध्य परिस्थितीत कृषी पणन मंडळाची जवळ जवळ नऊ निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत आहेत. यामध्ये बारामती, नाचणे, जामसंडे, जालना, लातूर, बीड, वाशी इत्यादी केंद्रांचा समावेश आहे.
ज्या देशांना आंबा निर्यात केला जातो त्या त्या देशांच्या मालाच्या बाबतीत काही नियम व अटी असतात. या नुरूप आंब्यावर विकिरण, व्हेपर हीट ट्रीटमेंट, होट वॉटर ट्रीटमेंट इत्यादी प्रक्रिया केल्या जातात.
याबाबतीत सुनिल पवार म्हणाले की, सध्या कृषी पणन मंडळामार्फत उभारण्यात आलेल्या आंबा निर्यात पॅक हाऊस, त्यासोबत विकिरण सुविधांचे एनपीपीओ, अपेडा तसेच अमेरिकेकडून प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे प्रमाणीकरणाचे काम आंबा हंगामापूर्वी पूर्ण केले जाईल.
यावर्षी अडीच हजार टन आंबा निर्यात याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आंब्याची दरवर्षी सुमारे 50 हजार टन इतकी निर्यात होते त्यापैकी एकट्या महाराष्ट्रातून 35 ते 40 हजार टन आंबा निर्यात केला जातो.
Published on: 23 March 2022, 10:56 IST