महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी शपथविधी पूर्ण केली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १ जुलै ला त्यांनी मराठवाड्यातील पर्जन्यमान, पेरण्या तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व विभागांशी संवाद साधला. या भागातील शेतकऱ्यांची पावसाअभावी बिकट अवस्था झाली आहे.
प्रशासकीय पातळीवरूनही चिंता व्यक्त केली जात आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास विभागात कोणती तयारी केली जावी याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. या विभागात आतापर्यंत ४५.७८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. जून महिन्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. गेल्या वर्षी महिन्याभरात १४३ टक्के पाऊस पडला होता तर यंदा महिन्याभरात ९० टक्केही पाऊस पडला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्यांची कामे खोळंबली आहेत. यातून शेतकरी चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी पेरण्यांचे प्रमाण घटल्याने शेतकऱ्यांचे पुढील सगळ्याच कामांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. या सगळ्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे. तसेच जुलै महिन्यात येत्या पंधरा दिवसात दमदार आणि समाधानकारक पाऊस झाला नाही तर मोठ्या प्रमाणात पेरण्या संकटात येतील, असे प्रशासनाने सरकारला सांगितले आहे.
ऐन हंगामात खताची टंचाई; शेतकऱ्यांची वाढली चिंता
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विभागातील मागील तीन वर्षांचा आढावा घेतला. पूरस्थिती तसेच अतिवृष्टी प्रशासकीय पातळीवरील तयारी यांची माहिती जाणून घेतली. या व्यतिरिक्त पूररेषेखाली गेलेली गावे, सध्या जलशयांमध्ये साचलेला साठा याचीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी नक्की कोणते पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पावसाअभावी कामे खोळंबल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. या नैराश्यातून आत्महत्येसारखी पावलं उचलण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मिटणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या:
मुकेश अंबानी आहेत आंब्याचे मोठे निर्यातदार; शेतकऱ्यांनाही होतोय फायदा
शेतीचा वाद बरा नव्हे; मुलांनीच केली जन्मदात्या पित्याची हत्या
Published on: 04 July 2022, 10:19 IST