लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार दरबारी अनेक योजना कार्यान्वित केल्या जातात. अशाच योजने पैकी एक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. हि योजना ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे तसेच या योजनेमार्फत जलसंधारणाची कामे करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
असे असले तरी काळाच्या ओघात या योजनेकडे प्रशासकीय यंत्रणेसमवेतच लोकप्रतिनिधींचे मोठे दुर्लक्ष झाल्याचे बघायला मिळत आहे यामुळे अनेक ठिकाणी ही योजना जवळपास कागदावरच मर्यादित राहिली आहे. मात्र भंडारा जिल्हा याला अपवाद ठरला असून या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात भंडारा जिल्ह्याने इतर जिल्ह्यांना धोबीपछाड दिली आहे. ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी हा जिल्हा राज्यात शीर्षस्थानी येतो.
भंडारा जिल्हा प्रशासनाने या योजनेची मोठी जनजागृती केली असून यामुळे जिल्ह्यातील लोकांना रोजगार मिळाला असून जलसंधारणाची कामे देखील जोरावर सुरू आहेत. जिल्ह्यात मनरेगा मार्फत एक हजाराहून अधिक कामे झाली आहेत तर यामुळे तब्बल 85 हजाराहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. प्रत्येकाला रोजगार मिळावा या अनुषंगाने तालुकास्तरावर यंत्रणा जोरदार कार्य करीत आहे.
भंडारा जिल्ह्यात मनरेगा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यामुळे सरकारचा उद्देश साध्य होत असून गाव पातळीवर मोठा विकास बघायला मिळत आहे शिवाय गरजूच्या हाताला काम देखील मिळत आहे. विशेष म्हणजे याबाबत आता नागरिक देखील जागृत झाले असल्याने ही योजना प्रभावीपणे राबवता येणे आता शक्य झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास पावणेतीन लाख कुटुंबाची नोंदणी या योजनेत केली असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
एका वर्षात दोन लाख 31 हजार मजुरांना जिल्ह्यात रोजगार दिल्याचे सांगितले जातं आहे. सध्या जिल्ह्यातील 85 हजार 509 मजूर मनरेगाअंतर्गत कामावर रुजू आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार भंडारा जिल्हा मनरेगा योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणी साठी राज्यात अव्वलस्थानी विराजमान आहे.
रोजगार हमी योजनेचा उद्देश हा खरंच नाविन्यपूर्ण आहे मात्र यासाठी दिली जाणारी मजुरांना मजुरी खूपच कमी आहे. गतवर्षी रोजगार हमी योजनेसाठी काम करणाऱ्या मजुरांना 238 रुपये रोजंदारी दिली जात होती त्यामध्ये आता दहा रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एकंदरीत रोजगार हमी योजनेमुळे जिल्ह्यातील मजुरांना हाताला काम तर मिळाले मात्र रोजंदारी कमी असल्याने त्यांचे पोट भरेल की नाही याबाबत मोठी शंका आहे.
संबंधित बातम्या:-
खरं काय! मोदी सरकार कृषी कायदे मागच्या दाराने का होईना लागू करेलच; सीताराम येचुरी यांचा गंभीर आरोप
बियाण्यावर बिजप्रक्रिया का करावी? जाणुन घ्या याविषयी काही महत्वाची माहिती
मक्याचा आडोसा घेऊन 'या' शेतकऱ्याने केलं असं काही विपरीत की पोलिसांनी टाकला छापा आणि……!
Published on: 23 March 2022, 12:41 IST