सध्या वन्य प्राण्यांचा लोकवस्तीत येण्याचा वावर वाढला आहे. पिकांची नासाडी तर होतच आहे मात्र वन्य प्राण्यांमुळे पाळीव प्राणीदेखील धोक्यात आले आहेत. अशीच एक घटना घडली आहे माण तालुक्यातील कुरणेवाडी परिसरात. येथे राहणाऱ्या दगडू आबाजी मिसाळ यांचे लांडग्यामुळे तब्बल दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय आपल्या मुक्या जनावरांनाही त्यांनी गमावले आहे.
दगडू आबाजी मिसाळ या मेंढपाळाच्या सहा शेळ्या आणि तीन बोकडं असे मिळून नऊ शेळ्यांचा लांडग्याने फडशा पाडला आहे. त्यातील दोन शेळ्यांची प्रकृती गंभीर आहे. हातावर पोट असणाऱ्या मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले त्यामुळे कुरणेवाडीसह वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
ही घटना घडली आहे बुधवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास. चार पाच लांडग्यांनी शेळ्यांच्या वाडग्याभोवती लावलेल्या लोखंडी जाळीखालून खड्डा उकरून काढला आणि शेळ्यांवर हल्ला चढवला. या लांडग्यांनी सहा शेळ्या जाग्यावरच फस्त केल्या तर तीन बोकडं घेऊन काही लांडगे पसार झाले. दोन शेळ्यांचे पोटाचे लचके तोडल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेने मात्र मेंढपाळ धास्तावले आहेत. घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी गणेश म्हेत्रे यांच्यासह वरकुटे-मलवडी येथील पशुवैद्यकीय पशुधन पर्यवेक्षक नितीन कार्तिक स्वामी यांनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच पोटावर हात असणाऱ्या मेंढपाळास दीड लाख रुपयांची नुकसानभरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी कुरणेवाडीचे सरपंच उमेश आटपाडकर यांनी केली आहे.
वन्य प्राण्यांचा लोकवस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी तर होतच आहे मात्र शेतात काम करत असताना वन्य प्राण्यांकडून प्राणघातक हल्ले देखील होत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातही अशीच घटना घडली आहे. रानडुकरांनी दोन शेतकऱ्यांवर हल्ले करून त्यांना जखमी केले आहे. ही घटना २६ जून रोजी घडली. विजोरा येथील शेतकरी अरुण अशोक मोटे हे सकाळी नेहमीप्रमाणे दूध काढण्यासाठी शेतातील गोठ्यावर गेले होते.
अखेर शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश; शेत जमिनीवरील देवस्थानची नावे रद्द,कर्ज घेणं होणार सोपं
याचवेळी गोठ्याला लागून असलेल्या उसामध्ये बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला करून चावा घेतला यात ते गंभीर जखमी झाले. आणि त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास वासुदेव मेटे हे उसामध्ये तणनाशकांची फवारणी करत असताना याचवेळी रानडुकराने त्यांच्यावर हल्ला करून मांडीला चावा घेतला. या दोन घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण; 13 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा
सोन्यासारखे पीक पिकवण्यासाठी शेतकऱ्यांवर सोनं गहाण ठेवण्याची आली वेळ
Published on: 30 June 2022, 05:08 IST