कोळसा टंचाईमुळे वीज तुटवडा होत असल्याचे सांगत सरकारने लोडशेडिंग सुरु केले आहे. तर विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार धडपड करताना पहायला मिळत आहे. मात्र, अशातच भाजप आमदार आशिष शेलार यांनी लोडशेडिंगच्या प्रकरणात सध्या टंचाई आणि टक्केवारी असा प्रकार चालू असल्याचा आरोप केला आहे. ते पुणे येथे माध्यमांशी बोलत होते.
सरकारनेच वीज टंचाई निर्माण करायची आणि निमार्ण वीज खासगी कंपन्यांकडून चढ्या दराने विकत घेऊन भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. त्यात विजेच्या सुरक्षा अनामत रक्कमेचे दर वाढवल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली असून सुरक्षा अनामत रक्कम रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ऊर्जामंत्री राऊत म्हणाल्याप्रमाणे ज्या भागामध्ये वीज भरणा किंवा पुनर्प्राप्ती (recovery) कमी आहे, त्याठिकाणी आम्ही लोडशेडिंग करू. मग असे असेल, तर सरकारच्याच खात्यात हजारो कोटींची थकबाकी आहे. तो नियम सरकारी खात्यांना लावल्यास सरकारच्या वेगवेगळ्या विभागात किती काळ वीज बंद राहील याची माहिती सरकारने जनतेला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
स्वतः सरकारने वीज बील भरले नसेल तर तुम्ही शेतकऱ्यांच्या थकबाकी जमा का करता? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. वीजकंपन्याच्या बेशिस्तपणा आणि नियोजन शून्य कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय कोळश्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती न देण्याची रचना सरकारने केल्याचा आरोप त्यांनी केला. वीज नियामक मंडळाकडे खासगी कोळसा कंपन्यांसहीत इतरांच्या तक्रारी आल्यानंतर मंडळाने अभ्यासक नेमण्यासाठी सांगितले होते.
असे असताना मात्र त्याकडे लक्ष न दिल्याने सध्या महाराष्ट्रावर ही परिस्थिती ओढावली आहे. राज्यात वीज टंचाई निर्माण करायची, हाहाकार माजवायचा आणि खासगी कंपन्यांकडून वीज घेऊन त्यात टक्केवारी घ्यायची असा प्रकार सध्या महाराष्ट्रात चालू असल्याचा थेट आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता ना गावठी ना देशी, आता फुलांपासून थेट विदेशी, राज्य सरकारचा निर्णय..
लोडशेडिंगबाबत अजित पवारांची मोठी घोषणा! लोडशेडिंगवर तोडगा निघण्याची शक्यता...
शेतकऱ्यांनो शेतीसोबत करा 'हे' व्यवसाय, मिळेल लाखोंमध्ये नफा..
Published on: 22 April 2022, 05:13 IST