News

कालवा सल्लागार समितीने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाने शेतकरी सुखावला आहे. नीरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Updated on 29 March, 2022 2:48 PM IST

'पाणी' शेतीचा अविभाज्य घटक आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून राज्यातील अनेक जिल्ह्यांचे डोळे पावसाळा आणि मोठमोठ्या जलाशयांच्या आवर्तनाकडे लागलेले असतात. मात्र, कालवा सल्लागार समितीने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाने शेतकरी सुखावला आहे. नीरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढू लागला आहे.

मार्च महिन्याच्या दरम्यान तापमानाने जवळपास चाळीशी गाठली असल्याने यंदा उन्हाळ्यात शेतातील पिकांना पाणी कमी पडणार अशी चाहूल लागली होती. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बारामती, इंदापूर, फलटण, खंडाळा, पंढरपूर, माळशिरस या परिसरातील शेतकऱ्यांची येत्या काही दिवसांमधील पाण्याची गरज पूर्ण होणार आहे.

मागील वर्षी चांगला पाउस झाल्याने पुणे जिल्ह्यातील नीरा देवधर, भाटघर, वीर, गुंजवणी या धरणात पुरेसा पाणी साठा आहे. त्यामुळे यंदा पाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. नीरा दोन्ही कालव्यातून सध्या पाणी सुरु आहे. शिवाय याला जोडूनच आणखी एक आवर्तन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाल्याने ३० जून पर्यंत शेतीसाठी सलग दोन आवर्तने मिळणार आहेत. त्यामुळे उन्हाळी पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

नीरा उजवा कालव्यातून पंढरपूर, माळशिरस तालुक्याच्या लाभक्षेत्रासाठी मंजूर कोट्याप्रमाणे पाणी दिले जाणार आहे. शिवाय यंदा पावसास विलंब झाला तर ३० जूनच्या नंतरही पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्याचे आदेश कालवा सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

यावेळी सोलापूर जिल्हा पालकमंत्री आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार राम सातपुते, समाधान आवताडे, अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील शेळके, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आता यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो विक्रमी दराने झालीय सुरुवात, आता रमजानमध्ये कलिंगडातून करा लाखोंची कमाई
शेतकऱ्यांनो सावध रहा!! आता अधिकारीच विकतात शेतकऱ्यांच्या जमिनी, असा झाला कारनामा उघड..
PM Kisan Scheme; 11व्या हप्त्याचे 2000 रुपये हवे आहेत? मग बातमी वाचून करा हे काम, नाहीतर पैसे येणार नाहीत

English Summary: Good news for farmers; Ajit Pawar's big decision regarding summer water ..
Published on: 29 March 2022, 02:48 IST