देशातील जीडीपी ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन दरबारी अनेक योजना राबवले जात असतात. कोरोना काळात जेव्हा सर्व उद्योग धंदे ठप्प झाले होते त्यावेळी शेती क्षेत्राने देशाची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी मोठे सहकार्य केले होते. यामुळे शेतीची उपयोगिता सरकारला चांगलीच ठाऊक आहे.
शेतीची उपयोगिता लक्षात घेऊनच स्वातंत्र्यानंतर शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक योजना अमलात आणल्या गेल्या आहेत. केंद्रातील मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये प्रमुख आहे पीएम किसान सम्मान निधि योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात दिले जातात. दोन हजार रुपयाचा एक हप्ता असे तीन हप्ते या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना दिले जातात.
याव्यतिरिक्त देखील देशात एक महत्त्वपूर्ण शेतकरी हिताची योजना सुरू आहे. ती योजना आहे पीएम किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 36 हजार रुपये दिले जातात. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही योजना एक पेन्शन योजना आहे. आणि या योजनेचा लाभ वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.
काय आहे पीएम किसान मानधन योजना
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, पीएम किसान मानधन योजनेसाठी शेतकऱ्यांना दरवर्षी काही नाममात्र रक्कम जमा करावी लागते. 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार काही रक्कम शासन दरबारी जमा करावी लागते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपये प्रीमियम म्हणून भरावे लागते.
तुम्हाला किती रक्कम जमा करावी लागेल
पीएम किसान मानधन योजना या योजनेनुसार, ज्या शेतकऱ्याचे वय 18 ते 29 वर्षे आहे, त्यांना दरमहा 55 ते 109 रुपये प्रीमियम म्हणुन द्यावे लागतील. त्याचबरोबर 30 ते 39 वयोगटातील शेतकऱ्यांना दरमहा 110 ते 199 रुपये जमा करावे लागतात. या योजनेत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना वय वर्ष 60 पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच दरवर्षी 36 हजार रुपयांची रक्कम पेन्शन म्हणुन दिली जाते. निश्चितच या योजनेचा शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.
Published on: 23 April 2022, 03:56 IST