सातारा : कोणत्याही पिकाला त्याच्या त्याच्या गरजेनुसार आवश्यक असणाऱ्या घटकांची जसे की खते, पाणी यांची पूर्तता वेळेत होणे अनिवार्य आहे. असे झाल्यास पीक भरघोस आणि दर्जावान येते. पीक पेरणीचा तसेच काढणीचा एक विशेष कालावधी ठरलेला असतो. या कालावधीदरम्यानच पिकांची लागवड होणे अपेक्षित असते. मात्र यंदा पाण्याची कमतरता, उच्च तापमान आणि अनियमित विद्युत पुरवठा यामुळे आले लागवडही लांबणीवर पडलेली आहे.
अशा परिस्थितीत आले पिकाची लागवड आता फक्त पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. लागवड लांबली असल्यामुळे आता त्याचा थेट परिणाम हा लागवड क्षेत्रावर होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. तसेच यंदा 30 ते 40 टक्क्यांनी क्षेत्रात घट होणार आहे. उत्पादनाच्या दृष्टीने हे भरवश्याचे पीक मानले जाते पण यंदा लागवडीपूर्वीच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र या भागात उसानंतर आले हेच सगळ्यात मोठे नगदी पीक घेतले जाते. मात्र,आल्याचे दर गेले 3 ते 4 वर्षापासून कमी आहे. त्यात आता उद्भवलेल्या परस्थितीमुळे लागवड क्षेत्रातही घट झाली आहे. सध्या बाजारात आल्याला 10 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे. कोरोनानंतर आल्याला चांगला भाव मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. त्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु आल्याचा भाव हा 7 हजार ते 8 हजार दरम्यानच राहिला.
त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीचा उद्देश साध्य करणे शक्य झाले नाही. शिवाय पीक लांबणीवर गेल्यामुळे उत्पादनातच घट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, सातारा, वाई, माण, खटाव तसेच फलटण तालुक्यात आल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शिवाय आले पिकाला हवे तसे पोषक वातावरण मिळाल्यामुळे पिकही बहरात येते.
महत्वाचं म्हणजे आले पिकामध्ये शेतकऱ्यांना आंतरपिकही घेता येत असल्याने दिवसेंदिवस आल्याचे क्षेत्र वाढत होते. दरवर्षी या पिकाची लागवड अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाते. यंदा मात्र, वाढलेले तापमान, पाण्याची कमतरता आणि अनियमित विद्युत पुरवठा यामुळे शेतकऱ्यांना वेळेत लागवड करता आली नाही. त्यामुळे आता पावसाळा सुरु झाल्यावरच आले या पिकाची लागवड केली जाणार आहे.
आले पीक कमी कालावधीत अधिकचे उत्पादन देणारे पीक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये आले पिकाची लागवड केली जात आहे. शेतकऱ्यांची आर्थिक नड भागविणारे पीक म्हणून आल्याकडे पाहिले जाते. सातारा जिल्ह्यात जवळपास 2 हजार 500 हेक्टरावर लागवड केली जात आहे. यंदा मात्र, उत्पादनात त्याचबरोबर क्षेत्रात घट झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी : गव्हाच्या सरकारी खरेदीत घट; तुटवडा निर्माण होण्याची शक्यता
लाल भेंडी बनवेल शेतकऱ्यांना मालामाल
हनुमान चालिसानंतर आता शेतकरी चालीसा, तुमचे भोंगे बंद करा असे म्हणत शेतकऱ्यांनी ...
Published on: 05 May 2022, 03:05 IST