हवामान विभागाने राज्यात पुढील ४ दिवस पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला. यात कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारांसह जोरदार पाऊस पडला.रत्नागिरी तालुक्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. पालीसह खाडीकिनारी भागात हलका पाऊस झाला.चिपळूणसह गुहागर आणि संगमेश्वर तालुक्यातदेखील जोरदार पाऊस पडला. लांजा तालुक्यातील काही गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावली होती शिवाय भांबेड येथे गाराही पडल्या.
अचानक झालेल्या या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली. गुहागर-विजापूर या मार्गावर ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने तेथील मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय अवकाळी पावसाने पिकांचे बरेच नुकसान केले आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडलेत. शिवाय या अवकाळी पावसाचे परिणाम ऐन हंगामातील फळझाडे आंबा काजू या पिकांवर होणार आहेत. आधीच हापूस आंब्याच्या दरात घट होत असताना त्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.
शिवाय बुरशी व फळमाशीच्या प्रादुर्भावालाही बागायतदारांना सामोरे जावे लागणार आहे. विजांच्या गडगटासह अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. या आपत्कालीन संकटांमुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. वादळीवाऱ्यामुळे काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळली त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या वादळात, अवकाळी पावसात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
वादळी वाऱ्यासह पडलेल्या या अवकाळी पावसामुळे चिपळूण कराड मार्गावर रस्त्याच्या मधोमध झाडे पडल्याने तेथील वाहतूकही काही तासांसाठी ठप्प झाली.गावातील काही घरांवरील कौले, पत्रे उडून तुटले आहेत तसेच गुरांच्या गोठ्यांचेही बरेच नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे हाती आलेल्या आंब्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आंबे वाऱ्याने खाली तुटून पडले आहेत. काही दिवस सातारा, पुणे या जिल्ह्यात गारपिटीची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर पुढील चार दिवस राहण्याची शक्यता आहे. तसेच झाल्यास फळबागांचे बरेच नुकसान होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. पिकांवर वादळी वारे, पाऊस, गारपीट यांचा मारा बसल्यामुळे त्याचा दर्जा कमी होणार आणि यातून शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
सोनं लवकरच दराचा रेकॉर्ड गाठण्याची भीती? शुक्रवारी सोनं महागले.
Summer Special : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी प्या नारळपाणी.
पाणी व्यवस्थापन काळाची गरज नाही का? एकदा वाचाच.
Published on: 23 April 2022, 01:02 IST