News

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३३७ वा पालखी सोहळा सोमवारी (दि. २०) ज्येष्ठ वद्य सप्तमीला श्री क्षेत्र देहूगाव येथून निघणार आहे.

Updated on 11 May, 2022 9:52 AM IST

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पायी वारी सोहळा वारकऱ्यांना अनुभवता आलेला नाही. मात्र, यंदा वैष्णवधर्मीयांना पालखी सोहळा अनुभवता येणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३३७ वा पालखी सोहळा सोमवारी (दि. २०) ज्येष्ठ वद्य सप्तमीला श्री क्षेत्र देहूगाव येथून निघणार आहे असल्याची माहिती श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांनी दिली.

२३ जून रोजी पुण्यात पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे, सोहळा ९ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. यंदा पालखी सोहळा १३ जुलैला परतीच्या प्रवासाला सुरुवात करून 24 जुलैला देहूच्या मुख्य मंदिरात सांगता होणार आहे. तुकोबारायांचा पालखी सोहळा पायीच होत आहे. पालखी मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने काही वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. संस्थानने रविवारी (ता. ८) पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला.  

पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. संस्थेच्या वतीने काम सुरू करण्यात आले आहे. परंपरेप्रमाणे यंदाही पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना पुण्यातील नाना पेठेतील श्री निवदुंगा विठ्ठल मंदिरात दोन मुक्काम असणार आहेत. तर इंदापूर येथे पालखी तळावर दोन दिवस मुक्काम होणार आहे. प्रत्येक ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले तर इंदापूरनंतर सराटी येथील अकलूज माने विद्यालयाजवळ गोल रिंगण होणार आहे. माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोडले येथे धावा तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी येथे पादुका आरती येथे उभे रिंगण होईल, असेही हभप मोरे यांनी सांगितले.

असा आहे पालखी सोहळ्याचा मार्ग व नियोजन
२० जून -- देहूतील मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान,
पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहूगाव येथील इनामदार साहेब वाड्यात
२१ जून -- आकुर्डी विठ्ठल मंदिर
२२ व २३ जून -- श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठ,पुणे
२४ जून -- लोणी काळभोर
२५ जून -- वरवंड
२७ जून -- उंडवडी
२८ जून -- बारामती शारदा विद्यालय
२९ जून -- सणसर (पालखी तळ)

३० जून -- दुपारचे बेलवडी गोल रिंगण, नंतर आंथुर्णे (पालखी सोहळा)
१ जुलै -- निमगाव केतकी (पालखी तळ)
२ जुलै -- इंदापूर येथे गोल रिंगण, दोन दिवस मुक्काम
४ जुलै -- सराटी ५ जुलै अकलूज (माने विद्यालय येथे गोल रिंगण)
६ जुलै -- माळीनगर येथे उभे रिंगण बोरगाव
७ जुलै -- तोंडले बोंडले येथे धावा, पिराची कुरोली मुक्काम
८ जुलै -- बाजीराव विहीर येथे उभे रिंगण, वाखरी येथे मुक्काम
९ जुलै -- पादुका आरती येथे उभे रिंगण झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान,
रात्री पंढरपूर येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावणार आहे.
१० जुलै -- नगर प्रदक्षिणा करून पालखी १३ जुलै दुपारी एक वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे.
१३ जुलै -- दुपारी परतीच्या प्रवासाला सुरुवात

महत्वाच्या बातम्या
'या' सरकारी योजनेत 2 लाख गुंतवणूक करून मिळवा 4 लाख; वाचा याविषयी 
देशातील पहिला अनोखा प्रयोग! अन्न कचऱ्यापासून निर्माण झालेल्या विजेवर होणार इलेक्ट्रिक वाहने चार्ज

English Summary: Departure of Sant Tukaram Maharaj Palkhi from 20th June
Published on: 11 May 2022, 09:52 IST