सध्या राज्यात सर्वत्र उन्हाळ्याचे रुद्र रूप बघायला मिळत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना आता पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र विहिरीला पाणी असून देखील महावितरणाच्या वीज तोडणी अभियानामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना पाणी देता येत नसून यामुळे रब्बी हंगामातील पिके अक्षरशा जळून खाक होण्याच्या मार्गावर आहेत.
एवढेच नाही यामुळे शेतकऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या मुक्या जनारांना देखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाहीये. आधीच खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे आणि आता महावितरणची ही कारवाई शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणत आहे.
खरीप हंगामा प्रमाणे रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांचे वाटोळे अटळ असल्याच्या भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. शेतकरी राजा गेल्या अनेक वर्षांपासून आसमानी आणि सुलतानी संकटांशी दोन हात करीत आहे. मात्र या रब्बी हंगामात पिकांसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकरी बांधवांना खरिपाची वसुली होणार अशी आशा होती.
परंतु शेतकऱ्यांची ही आशा महावितरणने फोल ठरवली असून पाणी असून पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर करपून जात आहेत. वावरात आपल्या डोळ्यादेखत होणारे नुकसान निमगाव व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना सहन होत नव्हते.
म्हणून निमगाव व आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी निमगाव उपकेंद्रावर आपल्या गोठ्यातील जनावरांसकट दाखल झालेत. शेतकऱ्यांच्या मते, आमची सोन्यासारखी पीके आमच्या डोळ्यादेखत करपली तरी काय हरकत नाही मात्र, या मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी कस उपलब्ध करायचं आणि त्यांचा जीव कसा वाचवायचा हा मोठा प्रश्न आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या गोठ्यातील जनावरे सोबतीला घेऊन निमगाव उपकेंद्र गाठले आणि आपल्या दावणीतले जनावरे थेट निमगाव उपकेंद्राच्या गेटला बांधून निमगाव उपकेंद्राचे गोठ्यामध्ये परिवर्तन केले.
शेतकरी बांधवांनी या वेळी अधिकाऱ्यांचा घेराव करून जेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर सोन्यासारखे पीक करपते तेव्हा काय होते आणि वीज तोडणी झाल्यावर काय परिस्थिती उभी राहते याचा जणू काही पाढाच अधिकाऱ्यांना वाचवून दाखवला.
निमगाव व आजूबाजूच्या परिसरात रब्बी हंगामातील पिकांना सोडा जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी नाही जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने निमगाव परिसरातील शेतकरी आपल्या दावणीतील जनावरे सोबत घेऊन निमगाव उपकेंद्रावर दाखल झाले.
महावितरणचे अधिकारी निदान या मुक्या जनावरांचा विचार करून काही तास विद्युत पुरवठा सुरू ठेवतील अशी भोळी भाबडी आशा बाळगून शेतकरी बांधव जनावरे आपल्या सोबतीला घेऊन आले होते. शेतकरी बांधवांनी मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी काही तास विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी यावेळी केली.
यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून वरिष्ठांच्या आदेशानेच वीजपुरवठा खंडित केला गेला असल्याची बतावणी करण्यात आली. याशिवाय जनावरांना आवश्यक पिण्याच्या पाण्यासाठी काही काळ विद्युत पुरवठा चालू केला जाईल असे आश्वासन देखील या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. वरिष्ठांच्या सूचना मिळताच शेती पंपाच्या विद्युत पुरवठा सुरळीत सुरू होईल अशी बतावणी देखील या अधिकाऱ्यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या:-
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश! वीज तोडणी त्वरीत थांबवण्याची ठाकरे सरकारची घोषणा, तोडलेली वीजही जोडणार
कृषी पंप थकबाकी:कृषी पंपाच्या क्षमतेनुसार वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना टार्गेट
Published on: 15 March 2022, 05:56 IST