कापसाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी संपूर्ण हंगामात कापसाला ऐतिहासिक असा विक्रमी दर मिळाला आहे. केंद्रातील मोदी सरकारने देखील कापसाच्या दराबाबत आतापर्यंत ढवळाढवळ केली नव्हती. मात्र आता कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना मोदी सरकारने कापसाच्या आयात शुल्कात माफी दिली आहे.
येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत कापसाच्या आयात शुल्काबाबत सदर निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आत्तापर्यंत विक्रमी दरात विक्री होणाऱ्या कापसाचे भवितव्य कसे असेल? कापसाला कसा दर मिळेल? याबाबत कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमावस्थेत आहे.
अशा परिस्थितीत कृषी तज्ञांनी मात्र, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे तसेच अजूनही जास्तीत जास्त कापसाची साठवणूक करून ठेवण्याचा अनमोल सल्ला दिला आहे. केंद्रातील मोदी सरकारने कापसाच्या आयात शुल्कात माफी दिली असली तरी देखील कापसाला 11 हजार 500 रुपये प्रति क्विंटल ते 11 हजार 700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.
कापसाला का मिळाला विक्रमी दर:- मोदी सरकारने कापसाच्या आयात शुल्काबाबत मोठा निर्णय घेतला आणि आयात शुल्क माफ केले. तरीदेखील कापसाला विक्रमी दर मिळत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पादनात कधी नव्हे ती घट झाली आहे. याशिवाय खरीप हंगामात अनेक शेतकरी बांधवांनी कापूस लागवडीकडे पाठ फिरवली असल्याने कापसाच्या उत्पादनात घट होणे सहाजिकच होते.
आता आयात शुल्क माफ करून देखील कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होईल असे चित्र काही बघायला मिळत नाही कारण की ज्या पद्धतीने स्थानिक बाजारपेठेत अर्थात देशांतर्गत बाजारपेठेत कापसाची आवक मंदावली आहे त्याच पद्धतीने जागतिक बाजारपेठेत देखील कापसाची आवक मंदावली आहे कारण की जागतिक स्तरावर देखील कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे आणि कापसाच्या मागणीत अजूनही मोठी वाढ होत आहे यामुळे आगामी काळात देखील कापसाच्या दरात तेजी बघायला मिळणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी स्पष्ट केले आहे. सध्या परभणी जिल्ह्यात कापसाला 11 हजार 500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अकरा हजार 700 रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे कापसाला दर मिळत होता त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याजवळ असलेला सर्व कापूस या आधीच विक्री करून टाकला आहे. आता व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकत कापसाची साठवणूक करण्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
गत खरीप हंगामात मराठवाड्यात कापसाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली होती. असे असले तरी विदर्भात मात्र कापसाचे क्षेत्र किंचित का होईना वाढले होते. कापसाच्या क्षेत्रात झालेली घट आणि खरीप हंगामात बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे कापसाच्या उत्पादनात घट ही ठरलेली होती.
यामुळे साहजिकच कापसाच्या दरात वाढ होणार असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज होता. मात्र कापसाला शेतकऱ्यांच्या अंदाजापेक्षा अधिकचा दर मिळाल्याने शेतकरी बांधव सुखावले आहेत. कापसाच्या वाढत्या दरासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा साठवणुकीचा धाडसी निर्णय देखील कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
Published on: 17 April 2022, 02:41 IST