रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बारसू परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापले आहे. या परिसरातील महिला, ग्रामस्थ, तसेच शेतकरी वर्गाने आक्रमक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पडणारच अशी ठाम भूमिका हाती घेतली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात आल्यावरही आंदोलक माती परीक्षण होऊ न देण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी देखील त्यांच्यावर लाठीमार केला. एवढंच नाही तर पोलिसांनी रणरणत्या उन्हात अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्नदेखील केला. शिवाय यादरम्यान काही आंदोलनकर्त्यांना उष्माघाताचा त्रासही होऊ लागला आहे.
खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात
बारसू रिफायनरी आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खासदार विनायक राऊत आंदोलकांची भेट घेण्यासाठी बारसूच्या सड्यावर गेले होते. आणि तिथं त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते अशोक वालम यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आजही रिफायनरी विरोधात आंदोलन सुरु असून या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नकोच, शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम
मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांना विनंती करत बैठक घेऊन प्रश्न सोडवू अशी विनंती केली आहे. शेतकऱ्यांनी चर्चेसाठी यावं, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, आम्हाला जबरदस्ती करायची नसल्याचं सरकारकडून मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे.
मात्र या प्रदूषणकारी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी पूर्णपणे नकार दर्शवला आहे. मंत्री उद्या सामंत यांची विनंती धुडकावून लावत प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नकोच, म्हणत शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. प्रतीक पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून व्हिडीओ शेयर केला आहे.
अधिक बातम्या :
तुम्ही ब्रोकोली लागवड करण्याच्या विचारात आहात का? ; मग एकदा परभणीच्या शेतकऱ्याची यशोगाथा नक्की वाचा
शेतकऱ्यानं करून दाखवलं! अनंतराव पारवेंची शेवगा शेतीत यशस्वी झेप
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुण्यात पावसाला सुरुवात, दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी...
Published on: 28 April 2023, 05:00 IST