मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी आदर्श शेतीचं उत्तम उदाहरण घेऊन आलो आहोत. सध्या आपले शेतकरी बंधू शेतात वेगवेगळ्या पिकांची लागवड करून इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्शच निर्माण करत आहेत. परभणीच्या युवा शेतकऱ्याने देखील शेतीत अशीच कामगिरी केली आहे. ब्रॉकोली लागवडीतून परभणीच्या या शेतकऱ्याने चांगला असा नफा कमावला आहे.
ब्रॉकोली ही वास्तविक परदेशातून आली पण भारतीयांच्या किचन मध्येही घर करून गेली. खरंच.. ब्रोकोली ही जरी विदेशी पिक असलं तरी त्याची शेती भारतीयांसाठी एक वरदान ठरू शकते. कारण भारतीयांच्या आहारात आता ब्रॉकोलीचा वापर वाढतच चालला आहे आणि हो बरं का ह्याच प्रमुख कारण म्हणजे ब्रॉकोलीमध्ये असणारे जीवनसत्वे. ही विदेशी भाजी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचे म्हटलं जातं. आणि तुम्ही देखील ब्रोकोली लागवड करण्याचा विचार करत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे.
ब्रोकोलीची यशस्वी लागवड
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालूक्यातील पांगरा येथील युवा शेतकऱ्याने देखील ब्रोकोलीची यशस्वी अशी लागवड केलीये. त्यामुळे प्रयोगशील शेतकरी कमलेश माधवराव ढोणे यांची बरीच चर्चा होताना दिसतीये.
खरंतर शेतकरी कमलेश यांच्याकडे अत्यल्प जमीन आहे. यंदा त्यांनी आपल्या शेतीत बेण्यासाठी म्हणून केवळ ७ गुंठे जमीनीत ऊसाची लागवड केली. आणि चार फुट रुंदी असणाऱ्या ऊसाच्या सरीत मध्यभागी ब्रोकोली फुलभाजीची लागवड केली. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून ब्रोकोली फुल भाजीचे रोपे मागवली होती.
पिकाचं पूर्वनिययोजन आणि योग्य व्यवस्थापनामुळे अडिच महिन्यानंतर ऊसात अंतर पीक म्हणून ब्रोकोलीस चांगली हिरवी गर्द फुले उमलली आहेत. आता त्यांना प्रति फुल ५०० ते ६०० ग्रॅम वजनाचे उत्पादन मिळाले असून नांदेड ला जाऊन याची ते ६० ते ७० रुपये किलोने विक्री करतायेत. ७ गुंठ्यात ६ क्विंटल ब्रोकोलीचे उत्पादन झाले असून खर्च जाता त्यांना २० ते २५ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे.
अशा प्रकारे ऊसात अंतर पीक म्हणून ब्रोकोलीचा प्रयोग यशस्वी केल्याने शेतकरी कमलेश ढोणे याचे कृषीजगतातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी निशीगंधा फुल शेती देखील यशस्वीरीत्या राबवून चांगले उत्पादन घेतले होते. तुमच्यासाठी ही माहिती आणली होती आनंद ढोणे पाटील यांनी.
अधिक बातम्या:
'राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सर्वगुण संपन्न आहेत तर मग शेतकरी आत्महत्या बंद का होत नाहीत'? ;किसानपुत्रानं लिहिलं रक्तानं पत्र
शेतकऱ्याचा नादच खुळा! पुदिना लागवडीतून कमावला लाखोंचा नफा
नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योगातून शेतकरी दाम्पत्याची भरारी
Published on: 28 April 2023, 02:02 IST