शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोअरची अट घातल्यास बँकांवर एफआयआर दाखल केली जाईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
१. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोअरची अट घातल्यास बँकांवर एफआयआर दाखल केली जाईल. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, पीक कर्ज देताना सिबिल स्कोअरची अट लागू होणार नाही, असा निर्णय राज्यस्तरीय बँकिंग समितीने घेतला असल्याचं ते म्हणाले.
पुढे ते असंही म्हणाले की काही बँकांनी विनाकारण शेतकऱ्यांना त्रास दिला तर अशा संस्थांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याशिवाय सरकारकडे पर्याय राहणार नाही. मध्यंतरी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिबिल स्कोअरची अट रद्द व्हावी याकरिता बैलगाडी मोर्चाही काढला होता. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सिबिल स्कोअरच्या अटीमुळे ९०% शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकत नाही. आता ही अट रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
नाफेड अंतर्गत पूर्णा खरेदी विक्री संघाकडून हमीदराने चौदा हजार क्विंटल हरबरा खरेदी, शेतकऱ्यांना दिलासा
२. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील आडगाव शिवारात असलेल्या पांगरा रोडवरील समर्थ मार्केटमध्ये शासनाच्या नाफेड योजनेअंतर्गत पूर्णा खरेदी विक्री संघाला शासकीय हमीदर प्रतिक्विंटल ५,३३५ रुपयाने नोंदणीकृत शेतक-यांचा हरबरा खरेदी करण्याची मान्यता मिळाली आहे. एकूण २,४३८ हरबरा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. आतापर्यंत येथील खरेदी विक्री संघा अंतर्गत नाफेड करीता ९३६ शेतक-यांचा १४१४१.५० क्विंटल हरबरा खरेदी करण्यात आलाय.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकरी हतबल,पाण्याने भिजलेला शेतीमाल वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड
३. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अक्षरशः शेतीमाल हा पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात गेली आहे. तरीही शेतकरी आपला शेतीमाल वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रसाद वानखेडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर काही दृश्ये शेयर केली आहेत. शेतकरी सध्या अडचणीत सापडला असून सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २५ जोडप्यांचा भव्यदिव्य विवाह सोहळा घडवून आणला
४. आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या मुलाच्या विवाहाबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २५ जोडप्यांचा भव्यदिव्य विवाह सोहळा घडवून आणला. या उपक्रमाचं सध्या राज्यभरातून कौतुक केलं जातंय. या विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थिती लावली होती.
परंपरांना फाटा देत स्वत:च्या आनंदात इतरांना सुद्धा सहभागी करुन घेण्याचा अभिमन्यूचा प्रयत्न निश्चितच वाखाणण्यासारखा आणि इतरांसाठी अनुकरणीय असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच आमदार अभिमन्यू पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनही केलं आहे.
शेतकरी बांधवानी विविध कृषी पुरस्कारसाठी 30 जून 2023 पर्यंत अर्ज करावेत, कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांचं आवाहन
५. आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी
राज्य शासन कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी कृषि विभागामार्फत २०२१ व २०२२ या वर्षांसाठीचे विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी गट, संस्था, व्यक्तींनी आपले प्रस्ताव हे नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे ३० जुन २०२३ पर्यंत सादर करावेत. असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे.
आता विद्यार्थ्यांना मिळणार कृषी तज्ञांचे मार्गदर्शन,कृषी जागरण च्या मीडिया हाऊसमध्ये 'विंग्स टू करिअर' चे अनावरण
६. कृषी तज्ञांनी 'विंग्स टू करिअर' या कृषी-केंद्रित करिअर प्लॅटफॉर्म अनावरण केलं आहे. कृषी जागरण मीडिया हाऊस मध्ये या प्लॅटफॉर्मच अनावरण करण्यात आलं आहे. विद्यार्थी आणि कृषी-उद्योग तज्ञ यांच्यात अनेक कृषी-करिअर-संबंधित प्रश्नांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने हा व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे.
या अनावरण सोहळ्यात कृषी जागरणचे मुख्य संपादक एम सी डॉमिनिक आणि कृषी तज्ज्ञ यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच इतर प्रमुख सदस्य आणि कृषी जागरणचा पत्रकार वर्ग देखील उपस्थित होता. कृषी-करिअर-संबंधित प्रश्नांचे निराकरण करायचं असेल तर काही दिलेल्या लिंक वरून फॉर्म भरा आणि कृषी तज्ञांचे मार्गदर्शन मिळवा.
(https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScnIdzQqIDLZcMSfgV-qpOY5eG7tPA2SKByvox7nAqvmSyIJQ/viewform )
अधिक बातम्या:
नाफेड अंतर्गत पूर्णा खरेदी विक्री संघाकडून हमीदराने चौदा हजार क्विंटल हरबरा खरेदी
शेतकऱ्यांनो बजारात आलीत बनावट खते, अशा प्रकारे ओळख खरी खते..
तंबाखू लागवड आणि त्याचे व्यवस्थापन
Published on: 11 May 2023, 12:58 IST