सोमवार २ मे रोजी राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या १९८ शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे पुरस्कार वितरण होईल. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हस्ते पुरस्कार देण्यात येतील कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील.
सोहळ्यात २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कृषी विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन-उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कारामध्ये रोख रकमेसोबत स्मृतीचिन्ह, व सपत्नीक व पतीसह सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या युटूब वरून होणार असून याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, रोजगार हमी, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित असतील.
महत्वाच्या बातम्या
मंत्रिमंडळ निर्णय! भारतातील पहिला महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प निर्माण करण्याचा निर्णय
ICICI, HDFC आणि SBI बँकेने आपल्या ग्राहकांना दिली गुड न्युज, जाणून घ्या काय आहे खास?
Published on: 29 April 2022, 10:57 IST