भाजीपाला पीक असो आता फळपीक त्यांच्या आर्थिक गणित हे फुल आणि फळधारणेवरअवलंबून असते. परंतु बर्याच कारणांमुळे योग्य प्रकारे फुल व फळधारणा पिकांना होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते आणि झालेला खर्चही वाया जातो. त्यामुळे या लेखात आपण योग्यप्रकारे फळधारणा होण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात याबद्दल माहिती घेऊ.
फळधारणा योग्य प्रकारे होण्यासाठी उपाय योजना
- फळाचा आणि शाकीय वाढीचा योग्य समतोल राखावा.
- फळझाडांमध्ये शाखीय वाढ नियंत्रणात आणण्यासाठी बुटके खुंट रोप वापरावे
- दोन डोळ्यातील अंतर कमी असणारी कलम काडी कलमासाठी वापरावी.
- फळधारणा वळून देतांना दोन फांद्या मधील अंतर जास्त राहील अशा प्रकारे छाटणी करावी.
- वनस्पतींच्या वाढ विरोधकांचा तज्ञांच्या सहाय्याने वापर करून शाखीय वाढ व फळांचा योग्य समतोल राखावा.
फुलांची संख्या वाढवण्यासाठी उपाय योजना
फुलांची संख्या वाढविण्यासाठी वाढ संप्रेरकांचा वापर केला जातो. संप्रेरकांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक व लेबल क्लेम प्रमाणे करावा.
फुलकळीची गुणवत्ता व संख्या
चांगल्या प्रकारे फुलकळी निघण्यासाठी फळ झाडाच्या फांद्या वाकून घ्याव्यात. लवकर फळ काढणी करावी. यामुळे फांद्यांमध्ये शिल्लक असलेल्या अन्न साठ्याचा उपयोग नवीन डोळे तयार होण्यासाठी होईल. फुलकळी ची संख्या चालू वर्षाच्या हंगामामध्ये मर्यादित ठेवावी. त्यामुळे फळधारणा व बहारा मध्ये सातत्य ठेवता येते.
झाडांवरील फळांचा भार कमी करणे
व्यापारी दृष्टिकोनातून मोठ्या आकाराच्या, आकर्षक फळांना अधिक मागणी असते त्यामुळे एका झाडावर अधिक फळे घेतल्यास ती कमी पोसल्यामुळे लहान राहतात. विरळणी करून फळांची संख्या कमी ठेवल्यास फळांची गुणवत्ता चांगली मिळू शकते. तसेच पुढील वर्षी फळधारणा चांगली होण्यास मदत होते.
पाणी व्यवस्थापन
फळबाग फुलोरा मध्ये किंवा सेटिंग मध्ये असताना जमिनीतील ओलावा संतुलित प्रमाणामध्ये असावा. त्यामुळे झाडांच्या सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे होऊन फळधारणा चांगली होते.जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी किंवा अधिक झाल्यास फळगळ होण्याची शक्यता वाढते.
अन्नद्रव्य
फळबागेला योग्य व समतोल प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. बागेमध्ये खतांची शिफारशीत मात्रा बहर येण्या पूर्वी द्यावी. उदाहरण द्यायचे झाले तर द्राक्ष व संत्रा या फळ पिकांमध्ये फुलोऱ्यात येण्यापूर्वी जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते. नत्रयुक्त खते फळबागेसाठी शेंड्याकडील नवीन डोळा तयार झाल्यानंतर द्यावे. त्यामुळे फुलांमधील गर्भ कोष चांगल्या प्रकारे तयार होतो. परिणामी अशा फळझाडांमध्ये फळधारणा चांगली होते. रासायनिक खतांचा वापर असंतुलित पणे केल्यास फुलांच्या निर्मितीमध्ये बाधा येऊ शकते. (संदर्भस्त्रोत-कृषीवर्ल्ड)
Published on: 14 November 2021, 10:20 IST