गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रीय पदार्थ खातो. त्याला शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्टा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो. त्यालाच आपण गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट असे म्हणतो. या संपूर्ण क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्केच भाग ठेवतो. बाकीच्या 90 टक्के बाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळ खत वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे अन्नद्रव्य, संप्रेरके, उपयुक्त जिवाणू असून वनस्पतीची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते.या लेखात आपण गांडूळ खता विषयी काही महत्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत.
अ-गांडूळांच्या संवर्धनासाठी कोणती काळजी घ्यावी?
- एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त दोन हजार गांडूळे असावीत.
- बेडूक,उंदीर,घूस, मुंग्या,गोम या शत्रुंपासून गांडूळाचे संरक्षण करावे.
- संवर्धन खोलीतील,खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान 20 अंश ते 30 अंश सेंटिग्रेड च्या दरम्यान ठेवावे. गादीवाफ्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
- गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा 40 ते 45 टक्के ठेवावा.
- गांडूळे हाताळतांना किंवा गांडूळ खत वेगळे करताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.इजा झालेली गांडूळे वेगळी करावीत.इतर गांडूळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.
आ- उच्च प्रतीचे गांडूळ खत मिळण्यासाठी महत्वाच्या बाबी
1-शेणखत, घोड्याची लीद, लेंडीखत, हरभऱ्याचा भुसा,गव्हाचा भुसा,भाजीपाल्याचे अवशेष,सर्व प्रकारची हिरवी पाने व शेतातील इतर वाया गेलेली पदार्थ हे गांडूळ खताचे महत्त्वाचे खाद्य होय.
2- स्वयंपाक घरातील वाया गेलेले भाजीपाल्याचेअवशेष, वाळलेला पालापाचोळा व शेणखत समप्रमाणात मिसळले असता गांडुळांची संख्या वाढवून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
3- हरभऱ्याचा किंवा गव्हाचा भुसा शेना मध्ये 3:10 या प्रमाणात मिसळले असतं उत्तम गांडूळ खत तयार होते.
4- गोबर गॅस स्लरी, प्रेसमड,शेण यांचा वापर केल्यास उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
इ- गांडूळ खत वापरताना घ्यावयाची काळजी
- गांडूळ खताचा वाप केल्यानंतर रासायनिक खते, कीटकनाशके किंवा तणनाशके जमिनीवर वापरु नयेत.
- गांडूळ शेतीत पिकांच्या मुळांभोवती चांगला ओलावा असणे गरजेचे आहे. तसेच वर्षातून नऊ महिने टिकवणे आवश्यक आहे.गांडूळ आच्छादनरुपी सेंद्रीय पदार्थांचा वापर अन्न म्हणून करत असल्यामुळे त्या सेंद्रीय आच्छादनाचा पुरवठा वरचेवर करणे आवश्यक आहे.
- प्रमाणात ओलावा आणि आच्छादनाचा पुरवठा झाला नाही तर गांडूळांच्या कार्यक्षमतेते घट येते.
Published on: 11 October 2021, 09:56 IST