पपई फळ पिकावर रिंग स्पॉट व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव बहुतांशी होतो हा रोग अत्यंत नुकसानकारक असून त्याच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.जर पपई फळ पिकाचा विचार केला तर केळी नंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे हे फळपीक आहे.परंतु रिंग स्पॉट व्हायरस या विषाणूजन्य रोगामुळे पपई पिकाखालील क्षेत्र घटत आहे. या रोगाची प्रारंभिक लक्षणे ओळखूनच वेळीच नियंत्रण करावे लागते.
रिंग स्पॉट व्हायरस ची लक्षणे
1-रिंग स्पॉट विषाणूचा संसर्ग झालेले झाड पंधरा दिवसानंतर लक्षणे दाखविण्यास सुरुवात करते.
2-सुरुवातीला पाने फिकट हिरवी व पिवळसर होतात. पानाच्या शिरा हिरव्या दिसू लागतात. पानाच्या वरील बाजूस शिरा मुरडतात.
3-रोगाचा प्रादुर्भाव वाढत जाईल तसा पानाचा आकार कमी होत जातो. पानांची टोकेधाग्या प्रमाणे किंवा बुटांच्या लेस प्रमाणे दिसतात.
4- झाडे बुटकी राहतात. शेंड्याची पाने जास्त तीव्र स्वरूपात लक्षणे दाखवतात.
- पाने जाड आणि खडबडीत होतात. रोगग्रस्त पानांचा स्पर्श लुसलुशीत वाटत नाही.
6- पानांचा आकार लहान झाल्याने अन्नद्रव्य तयार होण्याची क्रिया मंदावते.
7- खोडाच्या शेंड्याकडील कोवळा भाग व कोवळ्या पानांच्या देठावर गर्द हिरव्या रंगाचे चट्टे दिसतात.
8- पूर्णपणे विकसित झालेल्या हिरव्या फळावर अनेक वर्तुळाकार,समकेंद्री, पाणीदार डाग दिसतात.
9- रोगग्रस्त झाडांची फळे लहान व वेडीवाकडी दिसतात.
10- रोगग्रस्त झाडावरील फळांच्या संख्येत लक्षणीय घट होते.
या रोगावरील उपाययोजना
- सुरुवातीच्या अवस्थेतच रोगग्रस्त झाड मुळासकट उपटून व जाळून टाकावे. त्यामुळे शेतामध्ये विषाणूचा होणारा प्रसार वेळेस रोखण्यास मदत होईल.
- मावा ही कीड या रोगाच्या विषाणूंचे वाहक आहे.त्यामुळे मावा किडीच्या नियंत्रणासाठी शेतात एकरी वीस पिवळे चिकट सापळे लावावेत.
- फळबागेच्या कुंपणावर मावा किडीस अडथळासाठी मका आणि ज्वारी ही पिके लावावीत.
- पपईच्या बागेत आंतरपीक म्हणून किंवा बागेजवळ काकडी वर्गीय पिकांची लागवड करू नये.
- नत्राच्या अतिवापराने रोगाची तीव्रता वाढते. त्यामुळे नत्राचे संतुलित प्रमाणात मात्रा द्यावी.
- पालाश युक्त खतांमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते व रोगाची तीव्रता कमी होते. त्यामुळे पालाशयुक्त खतांचा शिफारशीनुसार संतुलित वापर करावा.
- मावा किडीचा प्रादुर्भाव दिसताच त्याच्या नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
Published on: 03 November 2021, 07:48 IST