Horticulture

या वर्षी आंबा फळपिकास उशीराने मोहर आलेला आहे. या मोहरावर विविध प्रकारच्या किडी व रोग दिसून येत आहे. तुडतुडे ही कीड व भुरी, करपा या रोगामुळे आंबा उत्पादनात 70 ते 80 टक्क्यांपर्यंत घट होते. त्यांची नुकसान करण्याची पध्दत ओळखून त्वरित कीडनाशके व बुरशीनाशकांच्या फवारणी कराव्यात.

Updated on 14 April, 2020 7:34 AM IST


या वर्षी आंबा फळपिकास उशीराने मोहर आलेला आहे. या मोहरावर विविध प्रकारच्या किडी व रोग दिसून येत आहे. तुडतुडे ही कीड व भुरी, करपा या रोगामुळे आंबा उत्पादनात 70 ते 80 टक्क्यांपर्यंत घट होते. त्यांची नुकसान करण्याची पध्दत ओळखून त्वरित कीडनाशके व बुरशीनाशकांच्या फवारणी कराव्यात.

तुडतुडे

पाचरीच्या आकाराचे तुडतडे अत्यंत चपळ असतात. कीडांची पिले व प्रौढ कोवळया पानातील, तसेच मोहरातील रसशोषण करतात. यामुळे प्रादुर्भावग्रस्त मोहर सुकुन जातो. तसेच ही कीड शरीरातून चिकट पदार्थ सोडते. त्याच्यावर काळी बुरशी वाढून संपूर्ण झाड काळे पडल्यासारखे दिसते. पानांवर काळसर बुरशीच्या आच्छादनामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते.

भुरी

रोगामुळे मोहर व अपरिपक्व छोट्या फळांची राळ होते. भुरी रोगाचा प्रादुर्भाव मोहरातील फुलात होतो. मोहरावर पांढरी बुरशी येते व मोहर गळू लागतो. पानाच्या कोवळ्या फुटीवरही रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे पानाच्या दोन्ही बाजुंना छोटे अनियमित राखाडी रंगाचे ठिपके दिसून येतात. बुरशीचा प्रादुर्भाव जानेवारी महिन्यात दिसून येतो. वर्षातील इतर वेळेस ती सुप्तावस्थेत असते.

करपा

हा बुरशीजन्य रोग आंबा पिकाच्या सर्व अवस्थेत आढळतो. आर्द्र वातावरणात बुरशीची जलद वाढ होते. रोगाचा प्रादुर्भाव जुन्या पानापेक्षा नवीन पानांवर जास्त होतो. पानांवर अनियमित वेडेवाकडे फिकट विटकरी किंवा गडद विटकरी ठिपके पडतात. रोगमध्ये फांद्यावर काळे ठिपके पडतात. मोहरामध्ये फुलाच्या देठावर व उमललेल्या फुलावर काळसर विटकरी काळे डाग पडतात. परिणामी मोहर करपून गळून जातो. छोटया फळांवर व फळांच्या देटावर प्रादुर्भाव झाल्यामुळे फळगळ होते. फळांवर बुरशीची वाढ होऊन फळे डागळलेली दिसतात.

उपाययोजना

  • पहिली फवारणी: प्रतिलिटर पाण्यात डायमिथोएट (30 टक्के) 1 मि.लि. आधिक हेक्झाकानँझोल (5 ई.सी.) 5 मि.लि. किंवा कार्बेन्डाझिम 1 मि.लि.
  • दुसरी फवारणी: मोहोरावरील दाण्याच्या आकाराची फळे असतांना मोहर, फांद्या व शेडयांवर पुढीलप्रमाणे फवारणी करावी. अॅसिटामिप्रीड (20 टक्के) 4 ग्रॅम अधिक हेक्झाकोनॅझोल (5 ई.सी.) 0.5 मि.लि. किंवा ट्रायडीमेफॉन (25 डब्ल्सूसी) 1 ग्रँम किंवा थायोफिनेट मिथाईल (70 डब्ल्यूसी) 0.7 ग्रॅम.
  • तिसरी फवारणी: लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (5 टक्के प्रवाही) 5 मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 टक्के प्रवाही) 1 मि.लि.

सुचना:

  • गरजेनुसार तिसरी व चौथी फवारणी दहा ते बारा दिवसांच्या अंतराने वरीलप्रमाणेच करावी. फक्त त्या वेळी कीटकनाशक व बुरशीनाशक आलटून-पालटून घ्यावे.
  • वातावरण ढगाळ झाल्यास फवारणीतील अंतर कमी करावे.
  • साधारणत: चार ते पाच फवारणी केल्यास मोहराचे चांगल्याप्रकारे संरक्षण होऊन चांगली फळधारणा होते.

लेखक:
डॉ. संजय पाटील
(प्रमख, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर)
०२४८२ २६१७६६

English Summary: Protection of kesar mango flower panicle
Published on: 13 April 2020, 07:15 IST