Horticulture

भारतामध्ये आंबा, केळीच्या नंतर लिंबुवर्गीय फळांच्या उत्पादनाचा तिसरा क्रमांक लागतो. देशातील या फळपिकांखालील क्षेत्र 0.483 मिलीयन हेक्टर असून 4.251 मिलीयन टन एवढे वार्षिक उत्पन्न आहे. लिंबूवर्गीय उत्पादनात जगात भारताचा सहावा क्रमांक लागत असून 4.8% वाटा भारताचा आहे. या फळपिकांखालील क्षेत्रात वार्षिक 9.3% या दराने वाढत असले तरी उत्पादनात मात्र त्याप्रमाणात वाढ झालेली नाही. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारताचे लिंबूवर्गीय उत्पादन फारच कमी म्हणजे ते फक्त 8.8 टन/हे. आहे. तेच प्रगत राष्ट्रात 25 ते 30 टन/हे. आहे.

Updated on 01 February, 2019 8:36 AM IST


भारतामध्ये आंबा, केळीच्या नंतर लिंबुवर्गीय फळांच्या उत्पादनाचा तिसरा क्रमांक लागतो. देशातील या फळपिकांखालील क्षेत्र 0.483 मिलीयन हेक्टर असून 4.251 मिलीयन टन एवढे वार्षिक उत्पन्न आहे. लिंबूवर्गीय उत्पादनात जगात भारताचा सहावा क्रमांक लागत असून 4.8% वाटा भारताचा आहे. या फळपिकांखालील क्षेत्रात वार्षिक 9.3% या दराने वाढत असले तरी उत्पादनात मात्र त्याप्रमाणात वाढ झालेली नाही. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारताचे लिंबूवर्गीय उत्पादन फारच कमी म्हणजे ते फक्त 8.8 टन/हे. आहे. तेच प्रगत राष्ट्रात 25 ते 30 टन/हे. आहे.

विदर्भात लिंबूवर्गीय फलोत्पादनाचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी 80 लक्षाहून जास्त रोपे येथील 325-350 शासकीय व खाजगी रोपवाटीकेत तयार करून विकली जातात. रोपवाटिकेचे चांगले व्यवस्थापन हे स्वस्थ व उत्पादनक्षम लिंबूवर्गीय फलोउद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सातत्याने उत्तम फळाचे भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणाचे जेवढे महत्त्व आहे. तेवढेच मातृवृक्षाला कीड व रोगापासून सुरक्षित ठेवणेही महत्त्वाचे आहे. विषाणूग्रस्त रोगट मातृवृक्षामुळे रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होईल. त्याचप्रमाणे फायटोपथोरा नामक बुरशीला सहज बळी पडणारा खुंट जर वापरला तर बुडकुज, मुळकुज, डिंक्या इत्यादी रोगांची लागण तर होईलच शिवाय झाडाची वाढ सुद्धा मंदावेल, कालांतराने ऐन उमेदीच्या काळात बागेचा ऱ्हास होईल. यामुळेच अधिकांश झाडे मरतील, पाने पोखरणारी अळी ही अत्यंत नुकसानदायक कीड असून लहान रोपट्यांवर या किडीचा प्रदुर्भाव अधिक गंभीर होतो. झाडाची वाढ एकदम खुंटते. त्यासाठी या किडीवर लक्ष ठेवून वेळच्यावेळी योग्य किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करून किडीस आटोक्यात ठेवले पाहिजे. 

राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन केंद्र, नागपूर येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रोपवाटिका व्यवस्थापनेसाठी करून लिंबाची रोगविरहित रोपे तयार करण्याचे लक्ष्य निर्दीष्ठीत असा हा एकमेव कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अल्प उत्पादनात, बागाच्या उत्पादनक्षम आयुर्मयादित लक्षणीय घट व शेवटी बागांच्या ऱ्हास होणे इत्यादीस एकमेव कारण म्हणजे रोगविरहीत सुदृढ रोपे उपलब्ध न होणे हे होय. या प्रकल्पाअंतर्गत बुरशी व विषाणुयुक्त रोगांपासून मुक्त अशी तयार केलेली ही रोपटी शासकीय व खाजगी पन्हेरीत मातृवृक्ष म्हणून वापरली जावीत हा हेतू आहे. यामुळे बागेच्या होणाऱ्या ऱ्हासावर मात केली जावू शकेल.

रोगमुक्त रोपे तयार करण्यासाठी वापरात आणलेल्या तंत्राची माहिती पुढीलप्रमाणे:

कंटेनराईन्ड (बंदीस्त) रोपवाटिका पद्धती: 

पारंपारिक पन्हेरीत एकदा का फायटोफ्थोरासारख्या मातीजन्य बुरशीचा शिरकावा झाला की तीचा नायनाट करणे अशक्यप्राय होते. हे टाळण्यासाठी बंदीस्त रोपवाटिका पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. अशा पन्हेरीसाठी शेड नेट हाऊस (50% सावली), निर्जंतुक केलेले प्लॅस्टिक ट्रे, युव्ही स्टॅबीलाईज्ड काळ्या पॉलिथीन पिशव्या (100 मायक्रॉन), सौर उर्जेद्वारे पॉटींग मिक्चरचे (मातीचे आदी) निर्जंतुकीकरणासाठी युव्ही स्टॅबीलाईज्ड पारदर्शक पॉलिथीन, पॉटींग मिक्चरचे धुरळीकरण व रोपवाटीकेसाठी लागणारी वेगळी अवजारे इत्यादींची आवश्यकता असते. 

  • पॉटींग मिक्सर: एक भाग सुपीक माती, 2 भाग निर्जंतुक केलेली वाळू यांचे मिश्रण प्राथमिक रोपवाटिकेत प्लॅस्टिक ट्रेमध्ये बीजारोपण करण्यासाठी टाकतात, असेच निर्जंतुक केलेले वाळू-मातीचे मिश्रण द्वितीय रोपवाटिकेत प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरण्यासाठी वापरावे लागते.
     
  • सौर निर्जंतुकीकरण: उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यात जेव्हा 45 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाते तेव्हा विशेषरित्या तयार केलेल्या सिमेंटच्या ओट्यावर वाळू-मातीच्या पॉटींग मिक्चरचा दीड फुट जाडीचा थर करून पसरावे. या पॉटींग मिक्चरवर पाणी शिंपडून त्यास चांगले ओले करावे. त्यानंतर त्यास 100 मायक्रॉन जाडीच्या पारदर्शक अल्ट्राव्हायोलेट लाईट द्वारा उपचारीत पॉलीथीनच्या चादरीने झाकून घ्यावे. पॉलीथीनच्या सर्व कडा ओल्या मातीने बंद कराव्यात. जेणेकरून बाष्पीभवनाद्वारे होणारी वाफ बाहेर निसटणार नाही. त्यामुळे आतील तापमान 54 डी.से. पर्यंत वाढते. परिणामत: 4 ते 6 आठवड्यापर्यंत चालणाऱ्या या क्रियेस सौर उर्जेद्वारे पॉटींग मिक्चरने निर्जंतुकीकरण केले जाते.

  • विषारी धुरळणी: सौर उर्जेद्वारे निर्जंतुक केलेल्या पॉटींग मिक्चरचे पुन्हा बासामिड (डॅझोमेंट) नामक रोगनाशकाचे दाणे मिसळून त्यास निर्जंतुक केले जाते. या दाण्यांतून मिथाइल आयसोसायनाईड हा विषारी वायू निघतो. त्याद्वारे फायटोफ्थोरा, पिथीयम, रायझोक्टोनिया आणि फुझॅरीयमसारख्या मातीजन्य बुरशी रोगांचा नायनाट होतो. अशाप्रकारे सौर ऊर्जा व बासामिडचा वापर करून निर्जंतुक केलेले पॉटींग मिक्चर प्लॅस्टिक ट्रे व पॉलिथीन पिशव्यात भरण्यात येते. प्राथमिक रोपवाटीकेत खुंटाचे रोपटे तयार करण्यासाठी 60x40x12 सें.मी. आकाराचे निर्जंतुक केलेले प्लॅस्टिक ट्रे वापरण्यात येतात. हे ट्रे जमिनीमधून कुठल्याही मातीजन्य रोगांची लागण होवू नये हा यामागील हेतू रोपवाटिकेत जमिनीवर दगडी पावडर बारीक बाजरीचा 2 ते 4 इंच जाडीचा थर टाकवा. त्यामुळे जमिनीवर पाणी पडले तरी वर उडणार नाही व त्याद्वारे कुठलेही मातीजन्य रोगाणू पसरू शकणार नाहीत. याशिवाय चुना व मोरचूद मिश्रणही नियमितपणे फवारावे. 

  • फळातून बिया काढणे : शिफारस केलेल्या खुटांची व चांगल्या जातीच्या लिंबाची परीपक्व फळे गोळा करावीत. अशा फळातून काढलेल्या टपोऱ्या बिया निर्जंतुकीकरणानंतर पेरणीसाठी उपयोगात आणाव्या. शिवाय खबरदारी म्हणून बियांची लवकर व जास्तीत-जास्त उगवण होण्यासाठी जर्मिनेटर (25 मिली/लि. पाणी) ची आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मँकोझेब अधिक मेटलअँक्सील संयुक्त बुरशीनाशक आणि कार्बेंडॅझिम या बुरशीनाशकांद्वारे बियाण्यांची प्रक्रिया करून नंतरच ट्रे मध्ये पेरणी करावी. बिया काढण्यासाठी झाडाखाली पडलेली फळे वापरू नये. कारण अशा फळातील बियातून फायटोफथोरा पसरण्याचा धोका असतो. 

  • बीजारोपण व उगवणी : फायटोफथोरा बुरशीला मध्यम प्रमाणात प्रतिरोधक असलेल्या रंगपूर लाईस व रफ लेमन खुटांच्या बिया 1.5 सें.मी. खोलवर रोपाव्यात. असे करताना 2.5-3.0 सें.मी. बियांमध्ये व 5-6 सें.मी. दोन ओळींमध्ये अंतर ठेवावे. बीजारोपण केलेल्या स्टरीलाईज्ड ट्रे 50% छायादार असलेला शेडनेटखाली ठेवावे. बीजारोपणानंतर 20 ते 25 दिवसात खुंटाच्या जातीनुसार उगवणी सुरू होते. दोन्ही प्रकारच्या खुंटात सुमारे 85 ते 90% उगवण होते. 


द्वितीय रोपवाटिका:
 

उत्कृष्ट वाढीची व योग्य उंचीची खुंटाची प्राथमिक रोपवाटीकेतील न्युसेलर रोपटी (प्रत्यक्ष पाहणीच्या आधारावर) निवडावी. पॉलीबॅगमध्ये रोपण करण्यासाठी अशी रोपटी उपटतांना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. खूप उंच किंवा खूप ठेंगणी रोपे तसेच वाकलेली, मुरडलेली, हुकसदृश्यमुळे असलेली रोपे प्राथमिक रोपवाटीका स्तरावरच निरस्त करावीत. फायटोफथोरा व अन्य मातीजन्य रोगाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोपवाटीकेचे नियमितपणे निरीक्षण करणे आवश्यक असते. 

अशी निवडक सुदृढ, रोगविरहीत रोपांची पावसाळ्यांची सुरुवात झाल्यावर जुलै-ऑगस्ट महिन्यात शक्यतोवर सायंकाळी किंवा रिमझीम पाऊस असताना लागवड करावी. 

व्हायरस (विषाणू) व वायरस सदृश्य रोगांचे निदान: 

लिंबूवर्गीय फळझाडांवर 15 हून अधिक व्हायरस (विषाणू) व व्हायरससदृश्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. ही संभावना टाळण्यासाठी निवड केलेल्या उत्कृष्ट मातृवृक्षाचे नमुने गोळा करून सिट्रस ट्रिस्टेजा वायरस, सिट्रीस एक्झोकॉरटीस, व्हायराईड, ग्रिनीन बॅक्टेरीयम इ. रोगाणूविषयक जैविक/सेरॉलॉजीकल तपासणीद्वारे निवडलेले मातृवृक्ष वरील रोगाणूपासून मुक्त असल्याची पक्की खात्री केली जाते.

  • सेरॉलॉजीकल तपासणी: मोनोक्लोनल (सीटीव्ही) आणि पॉलीक्लोनल (सीटीव्ही, रिंगस्पॉट, मोझॅक) अॅन्टीबॉडीजचा वापर करून डीएएस-इलिसामध्ये सेरॉलॉजीकल इन्डेक्सींग केली गेली. 
  • जैविक तपासणी (बायो-डायग्रोसीस): इंडीकेटर झाडांचा (लिंबू ट्रिस्टेजासाठी, स्वीट ऑरिंज ग्रिनींग आणि मोझॅक व्हायरस (विषाणू) साठी, इट्रांगड सिट्रान एक्सोकॉरटीसाठी आणि स्वीट ऑरेंज चिनोपोडीयम क्विनोआई (रिंगस्पॉटसाठी) उपयोग करून किड अवरोधक आवरणाखाली जैविक इंडेक्सींग सुद्धा करण्यात येते. अशाप्रकारे निवडलेल्या उत्कृष्ट मातृवृक्षातील व्हायरसहीत झाडेच पुढील प्रजोत्पादनासाठी वापरण्यात येतात. 

रोप संरक्षण उपाययोजना:

  • फायटोकथोरा रोगासाठी पाहणी: लिंबूवर्गीय रोपवाटीकेत फायटोफथोरामुळे होणाऱ्या रोगांचा गंभीर उपद्रव होतो व रोपवाटीच्या कुठल्याही अवस्थेत संक्रमित माती, पाणी तसेच रोपवाटीकेतील औजाराद्वारे सुद्धा या रोगाणूंचा प्रादुर्भाव व प्रसार होवू शकतो. म्हणून फायटोफथोरा व अन्य रोगांच्या संसर्गासंबंधी नियमित पाहणी करावीत. संसर्ग झाला आहे असे आढळून येताच संसर्गीय रोपटी समूळ उपटून नष्ट करावीत. हेतू हाच की, फायटोफथोरा व तत्सम रोगापासून रोपवाटीका पूर्णत: मुक्त राहील. खबरदारीचा उपाय म्हणून रिडोमिल एमझेड 72 किंवा हार्मोनी या सेंद्रिय बुरशीनाशकाची फवारणी एका महिन्याचे अंतराने फायटोफथोराचा संसर्ग टाळण्यासाठी करावी. नर्सरीतील औजारे सोडियम हायपोक्लोराईट द्रावणात प्रत्येकवेळी बुडवून नियमितपणे निर्जंतुक करावीत, तसेच रोपवाटीकेच्या प्रवेशद्वारता कामगारांचे व आगंतुकांची पादत्राणे निर्जंतुक करण्यासाठी व त्याद्वारे होणाऱ्या संभाव्य रोग संसर्गापासून बचावासाठी चुना व मोरचूदाने मिश्रण पसरवून ठेवावे. 

  • रोपवाटीकेतील अन्य रोग : विदर्भातील वातावरणात रोपवाटिकेतील रोपवाढीच्या काळात पानटोक जळणे, तांबेरा (लिफ स्पॉट) तसेच कोलेटोट्रायकम ग्लिओस्पोराईडस मुळे होणारा करपा (ब्लाईट) अशा अन्य रोगांना रोपे बळी पडण्याची शकयता असते. यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून दर महिन्याला कार्बेन्डॅझीम (1 ग्रॅम प्रति लिटर पाणी) ची फवारणी करावी. रोपवाटीकेत जमिनीवर व प्रवेशद्वारात ताम्रयुक्त बुरशीनाशकांची फवारणी नियमितपणे करावी. देशाच्या अन्य भागात पानावर सिट्रस स्कॅब, पावडरी मिल्ड्यू, आल्टरनॅरीया, लिफ स्पॉट इ. रोगांची समस्या दिसून येते. रोपे तसेच डोळा बांधणी केलेल्या कलमांची चांगली वाढ व्हावी म्हणून अशा रोगांचे नियंत्रण रोपवाटिकेतच करणे अत्यावश्यक ठरते.

  • किडी: द्वितीय नर्सरीत कांडीचे व्यवस्थापन आवश्यक असते. त्यासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकांची नियमितपणे फवारणी करावी. केलेल्या कीटकनाशकांची नियमितपणे फवारणी करावी. पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 1.25 मिली फेनवलरेट 1 मि.ली. (45 दिवसातून एका) आणि इमिडॅक्लोप्रिड 0.5 मिली/लि. पाणी याप्रमाणे आलटून पालटून तर एफीड आणि पाने खाणाऱ्या अळीसाठी क्लिनॉलफॉस 1 मिली/लि. पाणी या दराने फवारणी करावी. वरील किटकनाशकाच्या फवारणी चक्रात कडू नीम ऑईल (1%) व स्प्लेंडर सेंद्रिय किटकनाशकाचा समावेश (फवारणी) केल्यास किडींचे प्रभावकारी नियंत्रण होते. 

रोगरहित लिंबूवर्गीय फळवाटीका तयार करताना घ्यावयाची काळजी: 

  • पन्हेरी ही लिंबूवर्गीय बगीच्यापासून दूर असावी.
  • रोपवाटिका तयार करण्यासाठी वा रोपे लावण्यासाठी प्लॅस्टिक ट्रे/पॉलिथीन पिशव्यांचा वापर करावा.
  • प्राथमिक आणि द्वितीय रोपवाटिकेत फक्त निर्जंतुक केलेल्या पॉटींग मिक्चरचाच वापर करावा.
  • निरोगी फळातून घेतलेल्या ताज्या स्वस्थ फळांच्याच बियांचा नेहमी वापर करावा व चांगल्या अंकुरणासाठी शेडनेट खाली प्लॅस्टिक निर्जंतुक ट्रे मध्ये लागवड करावी.
  • बियांचे ट्रे व प्लॅस्टिक कंटेनर जमिनीपासून 1.5 ते 2.0 फूट उंचीवर ठेवावेत. तसेच जमिनीतून रोगाची लागण होवू नये म्हणून जमिनीवर बाजरी व दगडी पावडरचा थर द्यावा.
  • ज्या रोपट्याची मुळे वाकलेली किंवा मुरडलेली आहेत ती रोपटी नाकारावीत आणि ज्या रोपट्याचे सोटमूळ मोठे आहे, त्याला खालून कापावे, जेणेकरून ते जमिनीत सरळ जाईल.
  • रोपट्याची लागवड पावसाळ्यात ढगाळ वातावरणात करावी व त्यासाठी पॉलिथीनच्या पिशव्याचा वापर करावा. यामुळे रोपे जगण्याचे प्रमाण अधिक राहील. द्वितीय नर्सरीतील पॉलीबॅगमध्ये रोपे लावताना 2.75 मँकोझेब अधिक मेटलअॅक्सील संयुक्त बुरशीनाशक प्रति लिटर पाणी या दराने उपचारीत करावीत.
  • अल्कोहोल किंवा सोडियम हायपोक्लोराईटने आणावा आणि त्याचे पाते प्रत्येकवेळी निर्जंतुकाने धुवुन टाकावे.
  • निवड केलेली मातृवृक्षे रोग संसर्ग होवू नये म्हणून सतत निरीक्षणात असावीत.
  • किडींचा बंदोबस्त करण्यासाठी शिफारसी केलेली रोप संरक्षण उपाययोजना अंमलात आणावी. त्याचप्रमाणे खबरदारी म्हणून रोग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात आणि रोगट काढून नष्ट करावीत.
  • रोपवाटिकेतील कामगार आणि रोपवाटिकेत उपयोगात येणारी औजारे वेगळी ठेवावीत आणि रोगविरहीत रोपवाटिकेत आगंतुकाचा प्रवेश प्रतिबंधीत असावा.

श्री. शक्तीकुमार आनंदराव तायडे, (पीएच. डी.विद्यार्थीश्री. नितीन राजाराम दलाल (सहाय्यक प्राध्यापक)
उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापी, राहुरी. 
७३८७७२५९२६

English Summary: Production of Healthy Lemon Seedling
Published on: 28 January 2019, 05:33 IST