द्राक्ष हे भारत देशातील महत्त्वाचे फळपीक समजली जाते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष त्यांच्या विशिष्ट चवीमुळे जगभरात लोकप्रिय आहेत. भारतातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात केली जाते. द्राक्षाचा उपयोग प्रामुख्याने खाण्यासाठी, बेदाणे निर्मिती साठी व मध्ये तयार करण्यासाठी करतात. इतर पिकांच्या तुलनेत आर्थिक दृष्ट्या द्राक्ष पीक फायदेशीर समजले जाते.
द्राक्ष पिकाचे अभिवृद्धी कलम करून केली जाते. साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात जागेवर कलम केले जातात. कलम करतेवेळी खुंट व कलम काडीची जाडी, त्यातील अन्नसाठा, बागेतील परिस्थिती, कीड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी बाबींमुळे कलमांची वाढ कमी अधिक होते. तसेच द्राक्ष पिकाच्या पानांचे आयुष्य साधारणतः जातीपरत्वे 160 ते 165 दिवसाचे असते. त्यानंतर ही पाने पिवळी होऊन गळून पडतात. म्हणजेच द्राक्ष बागेत जर वेलीचा पूर्ण सांगाडा तयार करावयाचा झाल्यास रिकट घेऊनच हे शक्य आहे. त्यासाठी नवीन द्राक्ष बागेत रिकट ही महत्त्वाची कार्यवाही पूर्ण करावी लागते. रिकट हा शक्यतो वर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात घेतला जातो. यावेळी वातावरणातील किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या पुढे असते. अशावेळी वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीस वेग येतो. रिकट घेण्यापूर्वी पूर्वतयारीच्या दृष्टीने द्राक्ष बागेतील काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. त्याबद्दल या लेखात आपण माहिती घेऊ.
रोगनियंत्रण:
बागेत कलम केल्यानंतर पावसाचे प्रमाण जास्त असले किंवा नंतरच्या काळात वातावरण अधूनमधून ढगाळ असले तर ही परिस्थिती बागेत विविध रोगांचा प्रादुर्भाव साठी अनुकूल असते. त्यामुळे बागेत केवडा,भुरी, करपा या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच बुरशीचे जिवाणू पाने, काडी याठिकाणी सुप्तावस्थेत असतील. रिकट घेतल्यानंतर अनुकूल वातावरण मिळाल्यास या सर्व रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे री-कट अगोदर शिफारशींमध्ये बुरशीनाशकांचा वापर करावा.
काडीची परिपक्वता महत्वाची
बागेत रिकट घेताना कलम जोडाच्या वर किमान सात ते आठ डोळे प्रत्येक गाडीवर परिपक्व असणे आवश्यक आहे. परंतु काही वेळेस प्रतिकूल वातावरणामुळे, रोगांच्या प्रादुर्भावामुळे काही बागेत काडीच्या परिपक्वतेकडे अडचणी येतात. अशा बागेत पालाशयुक्त खतांचा फवारणीद्वारे, जमिनीतून वापर उपयुक्त ठरतो.
अन्नद्रव्य व्यवस्थापन:
साधारण री-कट घेण्याच्या पंधरा दिवसा अगोदर दोन कलमांच्या मध्ये तीन ते चार इंच खोल अशी चारी द्यावी. या चारी मध्ये जवळपास दहा किलो कुजलेले शेणखत टाकून त्यावर दीडशे ते दोनशे ग्रॅम सुपर फॉस्फेट, प्रति एकरी 25 ते 30 किलो डीएपी आनी माती परीक्षणाच्या आधारे शिफारशीत सुक्ष्म अन्नद्रव्य मिसळून हे चारी मातीच्या थराने झाकून द्यावी. यामुळे दोन वेलीच्या मध्यात बोद तयार होईल. या बोदामध्ये हवा खेळती राहिल्यामुळे नवीन मुळी लवकर तयार होईल व ही मुळी कार्यक्षम अशी असेल.
पानगळ करणे:
रिकट घेण्याच्या आठ ते दहा दिवस अगोदर कलम जोडाच्या वरची सात ते आठ पाने हाताने अथवा इथेफोन चा वापर करून गाळून घ्यावीत. यामुळे ज्या ठिकाणी रिकट घ्यायचा आहे. त्या भागातील डोळे तापतील आणि फुगतील आशा डोळ्यांमधून फूट लवकर व एकसारखे निघण्यास मदत होते.
बागेत रिकट ची योग्य वेळ
रिकट नंतर बाग फुटण्याकरिता वातावरणात विशिष्ट तापमान व आर्द्रता असने आवश्यक असते. ठराविक तापमानामध्ये वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली होत असतात. बागेतील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस पुढे असल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली योग्यप्रकारे होत असतात. तेव्हा रिकट साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेणे योग्य राहते. अशाप्रकारे रिकट ची पूर्ण पूर्वतयारी झाल्यानंतर योग्य वातावरणात कलम जोडाच्या वर काडीच्या परिपक्वतेनुसार तीन ते चार डोळे ठेवून रीकट घ्यावा.
रिकट नंतरचे व्यवस्थापन
- हायड्रोजन सायनामाईड चा वापर: री-कट घेतलेल्या बागेत एकसारखी व लवकर डोळे फुटण्याच्या दृष्टीने हायड्रोजन सायनामाईड चा वापर करणे गरजेचे आहे. काडीची जाडी, डोळ्यांची परिस्थिती व वातावरणातील तापमान या गोष्टींचा विचार करून तज्ञांचा सल्ला घेऊन हायड्रोजन सायनामाईड ची मात्रा द्यावी. साधारणपणे 35 ते 40 मिली हायड्रोजन सायनामाईड प्रति एक लिटर पाण्यात ठेवून योग्यप्रकारे पेस्ट लावावी.
- कलम काड्यांची बांधणी: रिकट झाल्यानंतर गरजेनुसार कलम काड्या बांबूला सुतळीच्या साह्याने व्यवस्थित बांधून घ्याव्यात. तसेच खुंटाला असलेल्या फुटी काढून टाका.
- कीड व रोग व्यवस्थापन: रिकट नंतर आठ ते दहा दिवसांनी डोळे फुगण्यास सुरवात होईल. या वस्तीत उडद्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ही कीड फुगलेल्या डोळा पोखरून त्यामधून निघणारी फूट संपवते. त्यामुळे या किडीचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी लेमडा सायक्लॉथरीन पाच मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड चार मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
अशाप्रकारे रिकट पूर्वतयारी करून नंतर व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास वेलींची एकसारखी वाढ होऊन पूर्ण बागेत ओलांडे, मालकाडी हे एकाच वेळी तयार होऊन पहिल्याच वर्षी चांगले उत्पादन मिळू शकते.
लेखक:
प्रा. योगेश भगुरे
( कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)
Published on: 26 July 2021, 07:00 IST