कलिंगड हे फळ कुकुरबीटासी कुटुंबातील आहे. फळाचा रंग विवध जातींमध्ये वेगवेगळा असतो. तो केरोटेनोईडच्या प्रमाणावर अवलंबून असतो. कलिंगडाच्या गराचा रंग पांढरा, नारंगी, तांबूस पिवळट, फिकट गुलाबी पिवळा, कॅनरी पिवळा आणि लाल असतो. लाइकोपीन हे लाल-गराच्या कलिंगडाचे प्रमुख रंगद्रव्य आहे.
कलिंगड सामान्यत: रीफ्रेश करणारे फळ मानले जाते तसेच मिष्टान्न फळ, कोशिंबीर, न्याहारी म्हणून किंवा स्नॅक म्हणून नियमित सेवन केले जाते. ताज्या कलिंगडाचे पीएच मूल्य ५.२-५.६ असते. कलिंगडामध्ये साखर असते जी त्याच्या गोडपणास कारणीभूत ठरते (२.७ ग्रॅम फ्रुक्टोज, ०.६ ग्रॅम ग्लूकोज आणि २.८ ग्रॅम सुक्रोज प्रति १०० ग्रॅम फळ). कलिंगडात विपुल प्रमाणात पोषक घटक असतात जे बिया, गर व वरील जाड आवरणात आढळतात.
कापणीनंतर घ्यावयाची काळजी
- लागवडीच्या अवस्थेपासून बाजारपेठेची परिपक्वता गाठण्यासाठी कलिंगडाला अनुक्रमे ६५, ७५ आणि ९५ दिवस लागतात. तर कलिंगड कापणीचा परिपक्वता निर्देशांक हा गराचा रंग (७५% लाल) आणि एकूण विद्रव्य घटक १०% ह्यावर अवलंबून असतो.
- काढणीपश्चात हाताळणीच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात कलिंगड खराब होऊन शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. कलिंगडाच्या रसाची बिघाड हि कॅन्डिडा स्यूडोट्रोपलिसिस, कॅन्डीडा ट्रोपिकलिस, सॅचरोमायसेस सेरेविसिया, ट्रायकोस्पोरन, सेरटिया प्रजाती आणि स्टेफिलोकोकस सॅप्रोफिटिकस ह्या सूक्ष्मजीवांमुळे होते. कलिंगड हे फळ शीत कक्षात १०-१५ डिग्री सेल्सिअस तापमान व सापेक्ष आर्द्रता ९०% पर्यंत ठेऊन १४-२१ दिवस जतन केले जाऊ शकते.
- कलिंगड धुणे आवश्यक नसते परंतु जेव्हा जास्त प्रमाणात माती लागलेली असते तेव्हा अशा परिस्थितीत स्वच्छ पाणी वापरले पाहिजे. कलिंगडाचे वर्गीकरण कलिंगडाच्या शारीरिक स्वरुपावर आधारित असते. काढणीपश्चात हाताळणी दरम्यान, फळांची ओरखडे टाळली पाहिजे आणि रोगाचा प्रसार टाळण्यासाठी रोगग्रस्त फळे इतर चांगल्या फळांतून काढून टाकावे.
- कलिंगडावर सामान्य बुरशीजन्य आजार हा फ्यूशेरियम, ब्लॅक रॉट, स्टेम एंड रॉट आणि अँथ्रॅकोनोझ यामुळे होऊन ज्याचा परिणाम काढणीपश्चात आयुष्यात होतो. मऊ रॉट हा सर्वात सामान्य जीवाणूजन्य रोग आहे ज्यामुळे वरील आवरणाचा क्षय होते. कलिंगडावर परिणाम करणारे पोस्टहारवेस्ट डिसऑर्डर यांत्रिक जखम, शीतकरण इजा आणि इथिलीन नुकसान हे आहेत.
- फळ आणि भाज्यांचे शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी असेप्टिक पॅकेजिंग, क्रायोजेनिक फ्रीझिंग, डीप फ्रीझिंग, श्रिंक रॅपिंग आणि नियंत्रित वातावरणात साठवण यासारख्या आधुनिक तंत्रांवर भर देण्यात यावा. कलिंगडाच्या कापलेल्या फोडीचे आयुष्य हे २ दिवस असते. तथापि हे ओझोन ट्रीटमेंट आणि पॉलिथिलीन पॅकेजिंगमध्ये ४ डिग्री सेल्सियस तापमानावर ७ दिवस पर्यंत वाढविल्या जाते. ओझोन ट्रीटमेंट सूक्ष्मजीव भार कमी करते.
- कापणीनंतर कलिंगडामध्ये अंतर्गत साखर वाढ किंवा रंगाचा विकास होत नाही, यामुळे कलिंगडाची पूर्ण वाढ झाल्यावरच काढणी केली पाहिजे. कलिंगडावर आढळून येणारी सामान्य विकृती म्हणजे यांत्रिक जखम होय ज्याचे मुख्य कारण योग्य पोस्टहार्वेस्ट हाताळणीची कमतरता, १० डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानात साठवणुकीमुळे शीतकरण इजा, इथिलीन संपर्कात येण्यामुळे इथिलीनचे नुकसान आणि आतील पोकळपणा.
- सूक्ष्मजीव कलिंगडाच्या बाह्य पृष्ठभागावर आढळतात त्यात मुख्य स्यूडोमोनस, ई. कोलाई आणि एन्टरोबॅक्टर यांचा समावेश असतो. हेच सूक्ष्मजीव ताजे कापलेल्या कलिंगडाच्या पृष्ठभागावर आढळतात आणि यामुळे कलिंगड काप लवकर खराब होते. रंग बदल, चव तसेच घट्टपणा कमी होणे हे सूक्ष्मजीवाच्या क्रियामुळे होते.
लेखक:
डॉ. नितीन गोविंदप्रभू सुरडकर
(एम.टेक., नेट, पीएचडी)
सहाय्यक प्राध्यापक, एमआयटी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद.
९७६७९१८६०९
डॉ. ए. बी. रोडगे
(एम.एस. कॅनडा, एम.टेक.,पीएचडी)
प्राचार्य, एमआयटी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद.
Published on: 17 May 2020, 09:52 IST