महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक महत्वाचे नगदी पीक बनलेले आहे.राज्यात सध्या सोलापूर,नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा,उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांमध्ये डाळिंबाची तोडणीला सुरवात झाली आहे. कोरोनाच्या युद्ध काळात फळांना बाजारपेठेमध्ये असलेली मागणी आणि निर्यातीस असलेला प्रचंड वाव यांचा सारासार विचार करून डाळिंब फळपिकांची काढणी, प्रतवारी व साठवणूक हे योग्यप्रकारे करावे लागते. जेणेकरुन बाजारपेठेत आपल्या मालाला चांगला भाव मिळून शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत होईल.
फळ काढणी तंत्रज्ञान :-
डाळिंब फळांची पक्वता ओळखून योग्य त्यावेळी काढणी करणे गरजेचे असते.
अशी ओळखा फळांची पक्वता :-
- फळ धारणेपासून फळ तयार होण्यास जाती परत्वे १३५ ते १७० दिवस लागतात.
- पक्व फळांच्या शेंड्याकडील पाकळ्या कडक होऊन पुर्णपणे वाळतात.
- उन्हाळ्यात फळांच्या सालीचा रंग पक्वतेच्या वेळी गर्द पिवळा होतो. तर पावसाळ्यात तो गर्द तांबडा होतो.
- पक्वतेच्या वेळी फळांच्या गोलसरपणा कमी होऊन फळांच्या बाजुंवर चपटेपणा येतो.
- पक्व झालेल्या फळांची साल नखाने टोकण्याइतकी मऊ होते.
- पक्व झालेल्या फळांच्या दाण्यांचा रंग गडद तांबडा होतो. त्यावेळी फळ मऊ लुसलुशीत व चवीला गोड असतो.
- पक्व फळे अनुभवांवरुन सुध्दा काढण्यास तयार झाली आहेत किंवा नाहीत, हे ओळखता येते.
फळांची प्रतवारी :-
डाळिंब फळांच्या प्रतवारीचे प्रकार :-
- सुपर साईज :- आकर्षक लालभडक रंगाची आकाराने सर्वात मोठी आणि वजनाने ७५० ग्रॅम पेक्षा जास्त असलेली व डाग नसलेली फळे या प्रकारात येतात.
- किंग साईज:- डाग नसलेली, आकर्षक रंगाची, मोठी व वजनास ५०० ते ७५० ग्रॅमपर्यत असलेली फळे या प्रकारात मोडतात.
- क्वीन साईज:- डाळिंब फळांच्या प्रतवारीचा हा तिसरा प्रकार असून यामध्ये ४०० ते ५०० ग्रॅमपर्यत वजनाची मोठी आकर्षक रंगाची पंरतु डाग नसलेली फळे निवडली जातात.
- प्रिन्स :- प्रतवरीच्या चौथ्या प्रकारास प्रिन्स (राजकुमार) असे म्हटले जाते. या प्रतवारीची फळे डागविरहीत आकर्षक रंगाची तसेच पक्व झालेली व ३०० ते ४०० ग्रॅमपर्यत वजनाची असतात.
फळांचे पॅकिंग :- फळांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनामध्ये पॅकिंगला अतिशय महत्वाचे स्थान आहे. पॅकिंगमुळे अनेकदा फळांना चांगला बाजारभाव मिळण्यासही फायदा होऊ शकतो. पॅकिंगचे फायदे पुढीलप्रमाणे आहे.
- योग्य पॅकिंगमुळे फळांची वाहतूक करणे सुलभ जाते व वाहतुकीत फळांचे होणारे नुकसान टाळता येते.
- पॅकिंगमुळे फळांची हाताळणी योग्यप्रकारे करता येते.
- आकर्षक पॅकिंगमुळे ग्राहक आकर्षित होऊन फळांचा खप वाढण्यास मदत होते.
- फळांच्या पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी पुठयांना कोरुगेटेड फायबर बोर्ड बॉक्सेस असे म्हणतात. पॅकिंगसाठी पेट्यांची साईज फळांच्या प्रतीनुसार घ्यावी.
- सुपर साईज व किंग साईज फळासाठी : ३२.५ सेंमी. (१३ इंच) लांब, २२.५ सेंमी.(९ इंच) रुंद आणि १० सेंमी. रुंद आणि १० सेंमी. सेंमी. (४ इंच) उंच, या पेट्या वापराव्यात.
- क्वीन साईज फळासाठी : ३७.५ सेंमी. लांब, २७.५ सेंमी. आणि १० सेंमी. उंचीच्या पेट्यांचा वापर करावा.
- बारा ए व बारा बी आकाराच्या फळासाठी : ३५ सेंमी. (१४ इंच) लांब, २५ सेंमी. (१० इंच) रुंद आणि १० सेंमी. (४ इंच) उंचीच्या पेट्या वापराव्यात. एका पेटीत सुपर साईजची चार किंवा पाच फळे, किंग साईजची सहा फळे क्वीन साईजची नऊ फळे तर प्रिन्स साईज व बारा ए व बारा बी या प्रतीची बार फळे भरली जाऊ शकतात.
- अशी भरा पेटीमध्ये फळे :
- पेट्यांची निवड व फळांची प्रतवारी झाल्यानंतर पेट्या भरताना प्रथम पेटीच्या तळाशी कागदाचे तुकडे ठेवून त्यावर प्रतवारी केलेली फळे ठेवावीत. त्यांनतर त्यावर लाल रंगाचा आकर्षक कागद लावून त्या झाकाव्यात. या पेट्या व्यवस्थित राहाव्यात म्हणून पेटी बंद केल्यावर पुन्हा चिकटपट्टीने पेट्या चिटकावाव्यात. अशा त-हेने भरलेल्या १०-१२ पेट्या एकावर एक रचून यांचा एक गठ्ठा तयार करावा. यालाच पॅलेट्स असे म्हणतात. या क्रियेस पॅलेटायझेशन असे म्हणतात, यामुळे वाहतुकीदरम्यान हे फळे फेकून देण्याचे किंवा निष्काळजीपणे हाताळण्याचे प्रकार टाळले जाऊ शकतात.
वाहतूक व्यवस्था :-
फळांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनामध्ये सुलभ रितीने वाहतूक करणे अत्यंत महत्वाचे असते. फळांची काढणी झाल्यांनतर फळे लवकरात लवकर बाजारात पाठविणेही जरुरीचे आहे. फळांची वाहतूक वातनुकुलीत व शीतगृहाची सोय असणाऱ्या ट्रक व रेल्वे वॅगन्समधून केल्यास नासाडीमुळे होणारे नुकसान टाळता येईल.
फळांची साठवण :-
शीतगृहात ८ अंश सेल्सिअस तापमान आणि ९०% आर्द्रता ठेवली असता फळे ३ महिन्यापर्यंत उत्तम त-हेने साठवून ठेवता येतात. तसेच शीतकक्षात २२ अंश सेल्सिअस ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ८०% आर्द्रता ठेवली असता फळे ४८ दिवस उत्तम त-हेने साठवून ठेवता येतात. दरम्यान आपण डाळिंबवर प्रक्रिया करुन नवीन पदार्थ बनवू शकतो. यातून आपल्याला अधिकचा आर्थिक लाभ मिळू शकते.
- प्रक्रिया उद्योग
- डाळिंब रस :-
डाळिंबातील दाणे काढण्यापूर्वी फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. दाणे काढण्यासाठी डाळिंबाच्या देठाकडील व फुलाकडील कापून चार भाग करून त्यातील दाणे, साल व पापुद्रे वेगळे करुन घेतात. दाणे सोलणी मशिनच्या साह्याने सोलल्यास डाळिंबाचे ८५ ते ९०% दाणे चांगल्या स्थितीत मिळतात. दाणे काढल्यानंतर दाब यंत्रात अल्प दाबाने त्यांचा रस काढला जाऊ शकतो.
डाळिंबाच्या फळांमध्ये सरासरी ६० ते ७० % दाणे निघतात. पूर्ण पिकलेल्या डाळिंबाच्या दाण्यापासून ७५ ते ८५% रस निघतो. डाळिंबाच्या रसामध्ये ७८% पाणी, २% स्निग्ध पदार्थ, १५% साखर, १% खनिज आणि ०.३ ते ०.४% आम्लतेचे प्रमाण जातीनुसार असते. रस ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानास १५ मिनिटे तापवून थंड करावा. रात्रभर भांड्यात ठेवून तो न हलविता वरचा रस सायफन पध्दतीने काढून रस बाटलीमध्ये भरावा.
रस भरण्यापूर्वी स्वच्छ केलेल्या बाटल्या ३० मिनिटे गरम उकळत्या पाण्यात निर्जतूक कराव्यात. त्यानंतर बाटल्यांमध्ये भरुन क्राऊन कॉकिंग मशिनच्या साह्याने बूच (टोपण) बसवून बंद करा. सोडियम बेन्झोएट या संरक्षकाचा ६०० मिलिग्रॅम प्रति किलो रसायनाचा वापर करून रस टिकविता येतो.
डाळिंब सिरप :-
डाळिंबाच्या रसात १३% ब्रिक्स व ०.८% आम्लता गृहीत धरुन डाळिंब सिरप तयार करण्यासाठी २५% डाळिंब रस, ६५% साखर व १.५% सायट्रिक अॅसिड व सुत्रानुसार घटक पदार्थाने प्रमाण वापरावेत.
साहित्य :- डाळिंबाचा रस १ किलो, साखर २ किलो ४७० ग्राम,पाणी ४.७८. लिटर , सायट्रिक असिड ५२ ग्राम सोडीअम बेन्झोयेट २.६ ग्राम घ्यावे.
प्रक्रिया:
एका पातेल्यात पाणी वजन करून घ्यावे. त्यात सायट्रिक अॅसिड टाकून पूर्ण विरघळून घ्यावे व नंतर त्यात डाळिंब रस टाकावा व साखर टाकून चमच्याने हलवून शक्य तेवढी साखर विरघळून घ्यावी. पातेले मदाग्नी शेगडीवर ठेवून साखर पूर्ण विरघळेपर्यत गरम करून घ्यावी. साखर पूर्ण विरघळेपर्यत सिरप स्टीलच्या मोठ्या चमच्याने किंवा पळीने सतत हलवत रहावे. सिरपमध्ये साखर पूर्ण विरघळल्यांनतर पातेले शेगडीवरून खाली उतरून घ्यावे. दोन ग्लासमध्ये थोडे थोडे सिरप घेऊन एकामध्ये सोडियम बेन्झोएट व दुसऱ्यामध्ये जरूरी प्रमाणे तांबडा खाद्य रंग विरघळून सिरपमध्ये टाकून एकजीव करावे. निर्जतूक केलेल्या बाटल्यांमध्ये सिरप भरून त्यांना ताबडतोब झाकण (बुच) बसवून त्या हवाबंद कराव्यात. सिरपची साठवण थंड व कोरड्या ठिकाणी करावी.
-
अनारदाणा :-
अनारदाणा प्रामख्याने रशियन जातीच्या आंबट डाळिंबापसून करतात.पिकलेल्या डाळिंबाचे दाणे सूर्याच्या उष्णतेने वाळवून त्यापासून अनारदाना बनवितात.कमी आंबट जातीपसून (गणेश मृदुला) सुध्दा चांगल्या प्रकारचा अनारदाना करता येऊ शकतो.याकरिता प्रथम डाळिंबाची फळे निवडून ती स्वच्छ धुऊन साल काढून, दाणे वेगळे करावीत. नंतर डाळिंबाच्या दाण्यात ५% सायट्रिक आम्ल मिसळून ते सूर्यप्रकाशात ३ ते ४ दिवस किंवा कॅबिनेट ड्रायरमध्ये ५५ ते ६०० सें. तापमानाला १४ ते १६ तास सुकवून अनारदाना तयार होतो. तयार झालेला अनारदाना प्लॅस्टिक पिशव्यात भरून त्याची साठवण किंवा विक्री करावी.
अनारदाण्याची साधारणतः २० टक्क्यापर्यंत उत्पादन म्हणजे १० किलो डाळिंबापासून २ किलो अनारदाना मिळू शकतो . उत्पादन खर्च साधारणतः १३० रुपये प्रति किलो एवढा येतो. अर्थात हे अर्थशास्त्र छोट्या प्रमाणावर केलेल्या संशोधनावर आधारित आहे. मोठ्या प्रमाणावर अनारदान्याचे उत्पादन केल्यास उत्पादन खर्च निश्चितच कमी येईल. यात शंका नाही. कृषि विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत कृषि व कृषिपूरक व्यवसायवृद्धीसाठी व युवकांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम अविरत घेतले जात आहेत. सदरील कार्यक्रमामध्ये कृषि उत्पादनाचे मूल्यवर्धनावर विशेष भर देऊन युवकांना प्रोत्साहन दिले जात आहे.
लेखक -
१) प्रा. अक्षय र. गणेशपुरे (काढणी पाश्च्यात व्यवस्थापन विभाग)
२) प्रा. निखिल दि. भोपळे (फळबाग उत्पादन विभाग)
स्व. विर गणपतराव इंगळे उध्यानविध्या महाविद्घ्यालय, जळगाव जा. जिल्हा बुलढाणा.
इ.मेल. akshayganeshpure5504@gmail.com
Published on: 18 September 2020, 02:47 IST