Horticulture

फळांना आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रगत देशांच्या तुलनेत भारतात आजही आहारात फळांचे प्रमाण अतिशय कमी आहे. फळांचा राजा आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. हिंदीतील त्याचे आम हे नावाच दर्शविते की भारतात हे फळ सर्वत्र उपलब्ध होते. सर्वत्र लागवड केली जाते व सर्व स्तरातून प्रथम प्राधान्य दिले जाते. पुरातन काळापासून भारतात आंब्याची लागवड केली जात असून 400 वर्षापूर्वी पासून आंब्याचे व्यापारी तत्वावर लागवडीचे पुरावे आढळतात.

Updated on 02 June, 2021 9:30 AM IST

फळांना (fruits)आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रगत देशांच्या तुलनेत भारतात आजही आहारात फळांचे प्रमाण अतिशय कमी आहे. फळांचा राजा आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. हिंदीतील त्याचे आम हे नावाच दर्शविते की भारतात हे फळ सर्वत्र उपलब्ध होते. सर्वत्र लागवड केली जाते व सर्व स्तरातून प्रथम प्राधान्य दिले जाते. पुरातन काळापासून भारतात आंब्याची लागवड केली जात असून 400 वर्षापूर्वी पासून आंब्याचे व्यापारी तत्वावर लागवडीचे पुरावे आढळतात. परिपक्व फळांचा आकर्षक रंग, मधूर चव आणि उत्कृष्ट पौष्टीकता ह्या गुणांमुळे आंबा हे फळ जगातील अत्युच्य फळ समुहामध्ये वरच्या स्थानावर विराजमान झाले आहे.

आंबा ह्या पिकाखालील क्षेत्र व त्यापासून मिळणारे उत्पादन यांचा विचार केला तर भारताचा जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो. जगात 110 पेक्षा जास्त देशांमध्ये आंब्याचे उत्पादन घेण्यात येते. भारतामध्ये अतिथंडीचा, अतिउष्णतेचा, वाळवंटी प्रदेश सोडल्यास ह्या पिकाची सर्वत्र लागवड दिसून येते. आंब्याचे अधिक उत्पादन घेणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा ह्या राज्यांचा क्रमांक लागतो. सध्या भारतामध्ये 1,297 हून अधिक आंब्याच्या जातींची लागवड झाल्याचे निदर्शनास आले आहे. व्यापारी तत्वावर हापूस, केसर, तोतापूरी, दशेरी, लंगडा या जाती उपलब्ध होत होत्या. परंतू आता या जातींबरोबरच इतरही जातींना मागणी वाढू लागली आहे. आंबा हे फळ बाजारात 90 ते 100 दिवस उपलब्ध असते. परंतू भारतात व परदेशातही आंब्याला वर्षभर मागणी आहे.

आंब्यापासून नियमित दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी, विशेष करून किड व रोग व्यवस्थापन व फळगळ कमी करण्यासाठीच्या शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर उपाययोजना शोधण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठामध्ये सातत्याने संशोधन सुरू आहे. विद्यापिठाने या विषयावर प्रसारीत केलेल्या विविध शिफारशींची माहिती खालीलप्रमाणे आहे.

नविन कलम लागवडीची काळजी :

  • कलमे चार वर्षाचर होईपर्यंत त्यावर मोहोर आल्यास काढून टाकावे.
  • ऑक्टोबर महिन्यात कलमांच्या उघड्या बुंध्यावर बोर्डोपेस्ट लावावी. कलम केलेल्या बुंध्याच्या खालच्या भागावर वेळोवेळी येणारी नवीन पालवी लगेच खुडून टाकावी.
  • आंबा हे पावसाच्या पाण्यावर येणारे पिक आहे. परंतु कलमे लावल्यावर पहिली दोन ते तीन वर्षे पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे कलमांची मर कमी होते आणि कलमे पुढे चांगली वाढतात.
  • कलम लावल्यावर पहिल्या वर्षी हिवाळ्यात आठवड्यातून एक वेळ आणि उन्हाळ्यात दोन वेळा पाणी द्यावे. दुसर्‍या वर्षी हिवाळ्यात पंधरा दिवसांतून एक वेळ व उन्हाळ्यात आठवड्यास एक वेळ पाणी द्यावे. तिसर्‍या वर्षी हिवाळ्यात महिन्यातून एक वेळ आणि उन्हाळ्यात महिन्यातून दोन वेळा पाणी द्यावे.
  • पाणी देण्यासाठी कलमांच्या बुंध्याभोवती आळे करावे आणि प्रत्येक वेळी दोन बादल्या (30 लीटर) पाणी द्यावे.

आंबा मोहोराची काळजी:

आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते. क्वचित प्रसंगी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी मोहोर येतो. तुडतुडे, कोळी, मिजमाशी, पिठ्या ठेकूण इ. किडी तसेच करपा, भुरी इ. रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आवश्यक आहे. मोहोर फुटल्यानंतर जर फवारणी केली तर किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते.

मोहोराचे संरक्षण करण्यासाठी पुढील तक्त्यामध्ये दाखविल्याप्रमाणे किटकनाशकांचा वापर करावा.

किडी :

  • मिजमाशी:
    काळपट रंगाची लहान माशी पालवीच्या दांड्यावर तसेच मोहोराच्या दांड्यावर अंडी घालते. अंड्यामधून एक ते दोन दिवसांनी अळी बाहेर पडते व पालवीच्या तसेच मोहोराच्या आतील पेशी खाते. त्या ठिकाणी गाठी निर्माण होतात. नंतर गाठी काळ्या पडतात. त्यामुळे पालवी तसेच मोहोर देखील वाळतो. तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी सुचविलेल्या उपाय योजनेमुळे मिजमाशीचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो. तसेच किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच डेल्टा मेथ्रीन 2.2 टक्के प्रवाही (9 मि.ली./10 लीटर पाण्यात) फवारावे.

  • पिठ्या ठेकूण:
    अलिकडच्या काळामध्ये पिठ्या ढेकूणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. या किडीची छोटी पिल्ले तसेच पुर्ण वाढलेले ढेकूण मोहोरावर तसेच फळांवर मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. संपूर्ण फळ कापूस लावल्याप्रमाणे पांढरे दिसते. या किडीचा प्रादुर्भाव तापमान वाढावयास लागल्यानंतर एप्रिल-मे मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. या किडीची पिल्ले झाडावर चढू नयेत म्हणून खोडावर जमिनीपासून 1 फूट अंतरावर प्रथम चिखलाने प्लास्टिकची 30 से.मी. ची पट्टी बुंध्याभोवती व्यवस्थित बसवावी.

  • फळमाशी:
    फळमाशी आंब्याच्या फळांच्या सालीत अंडी घालते. दोन-तीन दिवसांत अंडी उबवतात आणि अळ्या गर खातात. फळमाशी फळांच्या सालीच्या आतील भागावर उपजीविका करीत असल्यामुळे तिचे नियंत्रण करणे अवघड जाते. तथापी झाडावरील किडग्रस्त फळे आणि जमिनीवर पडलेली फळे एकत्र गोळा करून त्यांचे अळ्यांसहित नाश करावा. तसेच प्रति हेक्टरी 4 फेरोमेन ट्रॅप (कामगंध सापळे) समान अंतरावर लावावे म्हणजे नर फळमाशांचे नियंत्रण झाल्याने पुढील पिढी तयार होत नाही. ह्या प्रकारे फळमाशी किटकांचे नियंत्रण विना रासायनिक औषधे फवारणीशिवाय करता येते.

रोग :

  • भुरी रोग: भुरी ह्या आंब्याच्या मोहोरावरील एक महत्वाचा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव मोहोरावर सर्वसाधारणपणे एकाच वेळी दिसून येतो. या रोगामुळे मोहोराचा संपुर्ण देठ, फुले आणि लहान फळे यावर बुरशी दिसू लागते. रोगग्रस्त फुले आणि लहान फळे गळून जातात. याचा फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. या रोगाचा प्रसार वार्‍यामुळे होतो. आंब्यास मोहोर येण्याच्या वेळी ढगाळ आणि दमट हवामान असल्यास रोग मोठ्या प्रमाणावर वाढतो. तुडतुडे व भुरी रोग या दोघांच्या नियंत्रणासाठी औषधे फवारणीच्या तक्त्यात दाखविल्याप्रमाणे उपाययोजना करावी.

  • करपा:
    या रोगामुळे पानावर करपल्या सारखे डाग पडतात तसेच मोहोरावरती अनिष्ठ परिणाम होतो. फळांवर काळे डाग पडतात आणि त्यांची वाढ खुंटल्यासारखी होते. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बागेत स्वच्छता राखावी. रोगट फांद्या कापून काढाव्यात आणि गळून पडलेल्या रोगट पानांचा नाश करावा तसेच झाडावर 0.25 टक्के कॉपर ऑक्सिक्लोराईड (25 ग्रॅम/10 लीटर पाण्यात) किंवा 1 टक्का बोर्डो मिश्रणाचा (1:1:100) फवारणी करावी.

     हेही वाचा :पेरूचे प्रक्रियायुक्त पदार्थ

फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय:

  • तिसर्‍या ते सहाव्या फवारणीच्या वेळी 2 टक्के युरियाची फवारणी केल्यास फळगळ कमी होवून फळाचा आकार वाढतो.
  • फळधारणा वाढविण्यासाठी आणि फळगळ कमी करण्यासाठी एन.ए.ए. 20 पीपीएम या संजीवकाच्या दोन फवारण्या मोहोर फुलल्यावर तसेच फळधारणा होताना कराव्यात.
  • फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर शक्य असल्यास प्रत्येक झाडांना अंदाचे 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या दिल्यास फळगळ कमी होवून फळांचा आकार वाढतो. फळधारणेपासून 75 ते 80 दिवसांनतर पाणी देवू नये.
  • फळांना आकर्षक रंग येण्यासाठी तसेच उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (13:0:45) या विद्राव्य खताच्या 1 टक्का तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी (10 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्रति लिटर पाण्यात) फळे वाटाणा, गोटी आणि अंडाकृती आकाराची असताना करावी.
  • पुन्हा पुन्हा येणारा मोहोर टाळण्यासाठी पहिला पुरेसा मोहोर आल्यावर जिब्रेलिक आम्लाच्या 50 पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी करावी. पहिल्या फवारणी नंतर 15 दिवसांची पुन्हा फवारणी करावी.

     हेही वाचा :संत्रा पिकावरील डिंक्या ,पायकुज व मुळकुज रोगाचे व्यवस्थापन

छाटणीची आवश्यकता:

  • हिरवीगार दाट पालवी आलेल्या झाडांना भरपूर फळे लागतीलच असे नाही, किंबहुना अशा झाडांना मोहोर कमी येतो. रोगी आणि किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
  • हे सर्व टाळण्यासाठी झाडांमध्ये सुर्यप्रकाश बुंध्यापर्यंत येणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी झाडांच्या मध्य फांदीची छाटणी करावी.
  • तसेच झाडावरील रोगग्रस्त फांद्या, सुकलेल्या फांद्या, बांडगुळ नियमितपणे काढून टाकाव्यात.
  • अशा पद्धतीने सुर्यप्रकाशाचे व्यवस्थापन केल्यास तसेच हवा झाडांमध्ये खेळती राहिल्यास उत्पादकता तसेच उत्पादनाचा दर्जा सुधारण्यास नियमितपणे मदत होते.

 

फवारणी करताना घ्यावयाची खबरदारी:

  • फवारणीसाठी लागणारे पाणी झाडाच्या आकारमानावर अवलंबून असते. तथापी मध्यम आकाराच्या झाडावर सुमारे 15 ते 20 लिटर पाणी पुरेसे आहे.
  • फवारणी करताना पंपाचे नोझल फवारणीसाठीचे वापरावे.
  • औषधे फवारणी बागेतील सर्व आंब्याच्या झाडावर करावी. वेळापत्रकात दिल्याप्रमाणे औषधाचे योग्य प्रमाण घेऊन द्रावण चांगले ढवळून फवारणी करावी.
  • शिफरस न केलेली किटकनाशके अथवा इतर रासायनिक पदार्थ द्रावणात मिसळून फवारणी करू नये.


लेखक:
प्रा. महेश कुलकर्णी (सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग) ९४२२६३३०३०
डॉ. शेखर मेहंदळे (सहयोगी प्राध्यापक, कृषी किटकशास्त्र विभाग)
डॉ. चंद्रकांत पवार (सहयोगी सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग)
डॉ. मुराद बुरोंडकर (प्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग)
कृषी महाविद्यालय, दापोली  

English Summary: Pest & Disease Management in Mango Blossom
Published on: 07 July 2019, 04:03 IST