महाराष्ट्रात पेरू या फळपिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. जर भारतातील पेरू बागेचे एकूण क्षेत्राचा विचार केला तर ते 2.68 लाख हेक्टर इतके आहे. प्रामुख्याने बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यात पेरू या फळपिकाच्या लागवड केली जाते.
महाराष्ट्राचा विचार केला तर एकट्या महाराष्ट्रात 40 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरू लागवड केली जाते. लागवडीखालील क्षेत्राचा विचार केला तर उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. पेरू फळ आरोग्यदायी आहे. पेरू फळाच्या साल व गरामध्ये क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. मलावरोध, रक्तविकार व रक्तपित्त इत्यादी विकारांत पेरू अत्यंत गुणकारी आहे. या लेखात आपण पावसाळ्यातील पेरू बागेचे खत व्यवस्थापन कसे करावे त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
पावसाळ्यातील पेरू बागेचे खत व्यवस्थापन
पेरू हे फळ पीक बहुवार्षिक असून त्याला वर्षभर फुले येत असतात. परंतु, फळांच्या योग्य आकारा साठी, गुणवत्तेसाठी बहार धरणे आवश्यक असते. अशा प्रकारे एकाच वेळी फळे काढणीला आल्याने त्याचे नियोजन सोपे होते.
- पेरूची अभिवृद्धी बियांपासून केलेल्या रोपांची लागवड केल्यास उत्तम दर्जाची फळे मिळण्यासाठी साधारणता चार पाच वर्षे लागतात. मात्र शाखीय पद्धतीने कलमा पासून तयार केलेल्या रोपांची लागवड केल्यास दोन ते तीन वर्षातच फळधारणा होते.
- पेरू मध्ये फळे येण्यासाठी एकच बहर धरणे गरजेचे असते. त्यासाठी पाण्याचे व खताचे व्यवस्थापन योग्य रीतीने करावे.
- पूर्ण वाढ झालेल्या पेरूच्या प्रति झाडासाठी 20 ते 25 किलो शेणखत, 450 ग्रॅम नत्र, 300 ग्राम स्फूरद ( 652 ग्रॅम डीएपी ) आणि सहाशे ग्रॅम पालाश ( 500 ग्राम एम ओ पी ) बहराच्या वेळी म्हणजे मृग नक्षत्रात म्हणजेच पावसाळ्यात द्यावे. तसेच 450 ग्रॅम नत्र प्रति झाडास फळधारणेनंतर दुसरा हप्त्यात द्यावे.
- खतांची मात्रा देताना मुख्य खोडाभोवती तीस सेंटीमीटर त्रिज्येचे अंतरावर 15 ते 20 सेंटिमीटर खोलीवर बांगडी पद्धतीने माती खोदावी. त्यात खतांची मात्रा देऊन खत दोन ते तीन सेंटीमीटर माती च्या साह्याने माती आड करावे.खताची मात्रा दिल्या नंतर त्वरित हलक्या स्वरूपात पाणी द्यावे. दर्जेदार पेरू उत्पादनासाठी विद्राव्य खतांची फवारणी ही फायदेशीर ठरते.
- पेरू फळ पिकासाठी 1% युरियाची फवारणी केल्यास किफायतशीर ठरते. ( दहा ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी) वर्षातून दोन वेळा ही फवारणी करावी. पहिली फवारणी मार्च महिन्यात, दुसरी फवारणी ऑक्टोबर महिन्यात केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते. सोबतच माती परीक्षणामध्ये कमतरता आढळल्यास 0.5 टक्के झिंक फवारणी करावी. ( पाच ग्रॅम झिंक सल्फेट प्रति लिटर पाणी )
पेरू झाडा मध्ये वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसतात. त्यावर लक्ष ठेऊन खतांचे नियोजन करावे. नवीन पालवी येणे फुले येण्याची वेळ, तसेच फळ धारणेचा कालावधी या वेळी प्रति लिटर पाण्यामध्ये प्रत्येकी पाच ग्रॅम प्रमाणात झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नीज सल्फेट किंवा कॉपर सल्फेट यांचे आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
Published on: 04 July 2021, 01:11 IST