महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष जरा धोक्याचेच आहे. आधी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे वाटोळं केल नंतर शेतमालाला भाव मिळाला नाही त्यामुळे नुकसान झाले, सरकारचे धोरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजूनच वाढ घडून आली. इंधन दरवाढीचा फटका देखील शेतकऱ्यांना चांगलाच बसत आहे हे एवढे असतांना दुष्काळात तेरावा महिना म्हणुन आता फळबाग पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव प्रकर्षाने दिसून येत आहे आणि ह्यामुळे शेतकऱ्यांचे खुप नुकसान होत आहे. शेतकरी ह्या समस्यामुळे पार हतबल झाला आहे आणि शेतकऱ्याला काय करावे हे सुचत नाही आहे.
आता अतिवृष्टी आणि त्यामुळे येणाऱ्या रोगामुळे संत्रा उत्पादक शेतकरी बांधव चिंतेत सापडला आहे. महाराष्ट्रात विशेषता विदर्भात संत्रा लागवड ही मोठया प्रमाणात केली जाते. नागपूर तर संत्रासाठी जगात ख्यातीप्राप्त आहे आणि अशाच विदर्भातील संत्राला पावसाचे ग्रहण लागल्याचे चित्र दिसत आहे. विदर्भातील मोठ्या संत्रा उत्पादक जिल्यापैकी एक अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात संत्र्यावर गेल्या काही दिवसापासून किडीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
काही दिवसांपूर्वी खांदेशातील नंदुरबार जिल्ह्यातही पावसामुळे पपईच्या बागांना बुरशीजन्य रोगांनी ग्रासले होते आणि त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट घडून येण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ह्या रोगावर उपचारसाठी मदतीची विनंती देखील केली होती.
अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र संत्रा बागांनी व्यापले असून येथे शेतकरी ह्या पिकातून लाखोंची कमाई करतात. ह्या तालुक्यातील संत्रा पिक हे महत्वाचे आहे आणि शेतकऱ्यांची कमाई ह्यावर अवलंबून आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चांगल्या भावाची अपेक्षा होती. कारण ज्या संत्रा पिकाची काढणी चालू होती तिथे चांगले दर संत्र्याला मिळत होते. मात्र अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पार खेळ-खंडोबा करून टाकला. अतिवृष्टीमुळे संत्रा बागांवर किडीचा प्रकोप वाढायला लागला आणि फळे गळायला सुरवात झाली.
त्यामुळे बहुतांश संत्रा बागायतदारांचे व्यापाऱ्यांनी माल घेण्यास मनाई केली त्यामुळे साहजिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना ज्या बागेतून 20 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती तिथे कसेबसे 5 लाख रुपयांची कमाई होईल, त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च निघणं सुद्धा मुश्किलीचे आहे. त्यामुळे ह्या वर्षी संत्रा उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसणार आहे.
Published on: 24 October 2021, 02:47 IST