संत्रा बागांवर काही दिवासांपूर्वी बुरशीचा प्रादुर्भाव झालेला दिसला होता आता संत्रा बागांवर कोळशी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तालुक्यातील चार ते पाच गावांमध्ये हा रोग आढळून आला असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात ३० वर्षापूर्वी कोळशीचा प्रादुर्भाव झाला होता यात अंजनगाव सुर्जी , अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड या तालुक्यातील संत्रा तालुक्यातील निम्म्याहून अधिक बागा शेतकऱ्यांना तोडल्या होत्या. राज्याच्या तुलनेत ७५ टक्के संत्रा उत्पादन एकट्या अमरावती जिल्ह्यात होते. त्यातील सर्वाधिक उत्पादन या पाच तालुक्यात घेण्यात येते.
दरम्यान ३० वर्षानंतर या बुरशीजन्य रोगाने डोके वर काढले असून वरुड, तिवसाघाट, रावळा आदी गावांमध्ये संत्रापिकांवर बुरशीसोबत कोळशीचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यात कोळशी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा रोग संत्रा उत्पादक पट्ट्यात पसरल्यास बागांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
काय आहे कोळशी रोग - संत्राबागेत काळी माशी पानातील रसशोषण करते. त्यावेळी माशांच्या शरीरातून चिकट द्रव स्रवतो. पानांच्या मागे, फांद्या- फळांचा पृष्ठभागावर ही बुरशी वाढते. ही बुरशी नखाने खरडल्यास ही प्रादुर्भावाची गंभीर अवस्था मानली जाते. या बुरशीमुळे अन्नद्रव्य निर्माण करण्याची क्षमता क्षीण होत जाऊन फुले, फळधारणेसाठी बागा निष्क्रिय ठरतात.
कोळशीसाठी उपाययोजना
प्रथम दुसऱ्या अवस्थेत असलेली ही कीड किटक नाशकांमुळे नियंत्रणात येऊ शकते. परंतु पानाला हात लावल्यानंतर बुरशी पसरण्याची अवस्था निर्माण झाल्यास ती गंभीर मानली जाते. कोळशी नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात १०० मिली निंबोळी तेल, १० ग्रॅम डिटर्जंट पावडर दर्जानुसार १० ते ३० ग्रॅम कार्बेडेन्झिम, कॉपर ऑक्झिक्लोराईड बुरशीनाशकाची फवारणी केल्यास हा रोग नियंत्रणात येत असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली.
बागेत भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा राहत नसेल तर बागेत आर्द्रता निर्माण होऊन काळी माशीला पोषक वातावरण निर्माण होते. या वर्षी सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस नसल्याने या माशा बुरशीला पोषक वातावरण निर्माण झाले. एप्रिल, मे, जून महिन्यात बुरशी नाशक, कीडनाशकांच्या तीन फवारण्या केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण होते.
Published on: 24 August 2020, 11:30 IST