संत्रा कलमांची लागवड पावसाळा सुरू होताना करणे उत्तम असते. एक पाऊस पडून गेल्यानंतर आणि पुढे ढगाळ हवामानाचा काळ सुरू झाल्यानंतर संत्रा कलमांची लागवड करावी. पावसाळा संपताना किंवा संपून गेल्यानंतर लागवड करणे टाळावे. संत्रा लागवड करण्याआधी संत्राच्या कलमांची निवड करणं आवश्यक असते. निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे ते जाणून घेणार आहोत..
कलमांची निवड
- कलमे कृषी विद्यापीठ, शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतूनच घ्याव्यात. योग्य खुंट व योग्य प्रकारचा डोळा यांच्या खात्री येत असते.
- कलमे निरोगी, जास्त उत्पादन व दर्जेदार फळे देणाऱ्या मातृ वृक्षाचे डोळे वापरूनच तयार केलेली असली पाहिजेत.
- संत्र्याच्या कलमा किकरपानी, वेलिया किंवा पानसोट असलेल्या मातृ वृक्षापासून तयार केलेली नसावीत.
- कलमांची निवड करताना संत्र्याचा डोळा कोणत्या खुंटावर बांधलेला आहे हे पाहावे. कारण खुंटाचा, झाडाची शारीरिक वाढ, फळधारणाशक्ती, फळांचे गुणधर्म आणि झाडाचे आयुष्य यावर परिणाम पडत असतो.
- हलक्या व मध्यम जमिनीसाठी जबेरी तर भारी जमिनीसाठी रंगपूर लिंबू या खुंटावरील कलमांची निवड करावी.
- जबेरी किंवा रंगपूर लिंबू या खुंटावर २५ ते ३० सेंमी उंचीवर बांधलेल्या कलमा निवडाव्यात. कमी उंचीवर बांधणी केलेल्या कलमा मातीच्या आणि पाण्याच्या संपर्कात येऊन बुरशीजन्य रोगास बळी पडत असतात.
- कलमांचे फाटे परिपक्व झालेले असणे आवश्यक आहे. फाट्यावर पांढऱ्या बारीक रेषा असल्या तर फाटे परिपक्व झाले असे समजावे.
- साधारण ४५ ते ६० सेंमीपर्यंत सरळ वाढलेल्या कलम चांगल्या असतात. अति उंच कलम लागवडीसाठी वापरू नयेत. त्या कलम वेलीया प्रकारच्या असण्याची शक्यता असते.
हेही वाचा : बिझनेस आयडिया: वर्षातील 12 महिने ही करा 'या' फळाची लागवड, कमवाल बक्कळ नफा
लागवड करताना घ्यावयाची काळजी
- जमिनीतून कलमे काढताना आदल्या दिवशी त्यास भरपूर पाणी द्यावे. ढगाळ वातावरण असताना कलमा रोपवाटिकेतून काढणे फायदेशीर असते.
- कलमे काढताना तंतुमय मुळांना कमीत कमी इजा होईल याची काळजी घ्यावी. शक्यतो कलमे ‘डिगिंग फॉर्क’ने काढाव्यात. कलमा सबलीने काढू नयेत. सबलीने कलमा काढल्यामुळे सोटमूळ आणि तंतुमय मुळे तुटण्याची शक्यता असते.
- कलमा काढल्यानंतर सोट मुळाचा शेवटचा भाग आणि इजा झालेली मुळे सिकेटरने काळजीपूर्वक छाटून टाकावीत.
- कलमांची शेंड्याकडील कोवळी पानेसुद्धा काढून टाकावीत. फक्त परिपक्व पाने ठेवावीत. मुळांची संख्या आणि पानांच्या संख्येचे योग्य प्रमाण असावे. कारण काढणीच्या वेळी काही मुळ्या तुटतात. सर्व पाने ठेवली गेल्यास त्यांचे पोषण व्यवस्थित होत नाही. परिणामी रोपे दगाविण्याचा धोका जास्त असतो.
- पॅकिंग करताना कलमांच्या मुळांना इजा होऊ न देता ओल्या मातीत गुंडाळून सभोवती तरटाने घट्ट बांधून तो भाग पाण्याने ओला करावा. त्यानंतर लागवडीच्या जागी लवकरात लवकर कलम आणावीत.
- कलमा लागवडीपूर्वी सावलीत ठेवाव्यात. पॅकिंगच्या मुळाचा भाग थोडा वेळ पाण्यात बुडवून काढावा किंवा त्यावर पाणी शिंपडावे.
कलम जमिनीत लावण्यापूर्वी त्यांची मुळे ३ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लावावीत. - कलमा लागवडीपूर्वी खड्डे शेणखत अधिक माती (२:१) आणि २ किलो सिंगल सुपर फॉस्फेटने भरून ठेवलेले असावेत. कलमे खड्ड्याच्या मध्यभागी जमिनीत लावावीत.
- कलम लावताना मुळे स्वाभाविक अवस्थेमध्ये ठेवावीत. नंतर मुळांचा मातीबरोबर घनिष्ठ संबंध यावा, यासाठी माती घट्ट दाबावी.
लागवडीच्या वेळी कलमे एका ओळीत येण्यासाठी झाडे लावण्याचा तक्त्याचा वापर करावा.
लागवड शक्यतो रिमझिम पाऊस सुरू असताना करावी. - लागवड पूर्ण झाल्यानंतर पाऊस न आल्यास लगेच पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी वाफसा आल्यावर प्रत्येक कलमाच्या चहूबाजूंनी माती घट्ट दाबून घ्यावी.
कलमांचे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा. - पाऊस नसल्यास दर तीन दिवसांनी कलमांना पाणी द्यावे.
- कलमांना नवीन जोमदार फुटवे आल्यावरच रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
Published on: 08 July 2022, 03:16 IST