Horticulture

संत्रा/ मोसंबीची झाडे निसर्गतः थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी-जास्त तापमानामुळे दोनदा विश्रांती घेत असतात. साधारणतः या काळात वातावरण पोषक नसते. झाडांवर नवीन वाढ होत नाही. त्यामुळे या विश्रांतीच्या काळात अतिरिक्त शर्करेचा संचय झाडाच्या 6 ते 9 महिन्यांच्या फांद्यांमध्ये होतो. हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यास याचा उपयोग होतो.

Updated on 22 December, 2023 4:37 PM IST

प्रा. अशोक म्हस्के

थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी बागेची खालीलप्रकारे निगा राखावी. शास्त्रीय दृष्टीने निगा राखल्यास संत्रा/मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळवता येते.

संत्रा/मोसंबीचे बहार
निसर्गतः संत्रा/मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो. त्यापैकी पावसाळ्यात (जून-जुलै) येणाऱ्या बहारास "मृग बहार' (मृग नक्षत्रात येणारा) आणि पावसाळा संपल्यानंतर (ऑक्‍टोबरमध्ये) येणाऱ्या बहारास "हस्त बहार' (हस्त नक्षत्रात येणारा) तर थंडी संपतेवेळी (जानेवारी-फेब्रुवारी) म्हणजे आंब्याला ज्या वेळी बहार येतो तो "आंबिया बहार' असे तीन बहार वेगवेगळ्या ऋतूंमध्ये येतात.

संत्रा/मोसंबीचा आंबिया बहार
संत्रा/ मोसंबीची झाडे निसर्गतः थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी-जास्त तापमानामुळे दोनदा विश्रांती घेत असतात. साधारणतः या काळात वातावरण पोषक नसते. झाडांवर नवीन वाढ होत नाही. त्यामुळे या विश्रांतीच्या काळात अतिरिक्त शर्करेचा संचय झाडाच्या 6 ते 9 महिन्यांच्या फांद्यांमध्ये होतो. हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यास याचा उपयोग होतो. संत्रा-मोसंबीच्या आंबिया बहाराला नैसर्गिक बहार म्हणतात. या बहारामध्ये संत्रा-मोसंबी झाडाची वाढ कडाक्‍याच्या थंडीत थांबते. डिसेंबरचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या एका महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः 10 अंश सें. खाली राहते. एवढ्या तापमानावर झाडांना ताण बसतो. या ताणामुळे झाडे खराब होत नाही.

आंबिया बहार घेण्याकरिता संत्रा-मोसंबी झाडाला ताण देणे
झाडांची सतत होणारी वाढ थांबविण्याकरिता संत्रा-मोसंबी झाडाला पाण्याचा पुरवठा बंद करणे, म्हणजे झाडांना ताण देणे. संत्रा-मोसंबी झाडाला पाण्याचा ताण दिल्यामुळे झाडांची वाढ थांबते. झाडे विश्रांती घेतात. त्यामुळे झाडाच्या फांद्यांत पानात अन्नद्रव्यांचा संचय होतो. आंबिया बहार घेण्याकरिता डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्रा-मोसंबी बागेचे ओलित बंद केले जाते. या ताणाचा कालावधी जमिनीचा पोत, झाडाचे वय आणि जमिनीमध्ये उपलब्ध असलेला ओलावा यावर अवलंबून आहे. आंबिया बहारासाठी हलक्‍या जमिनीत 35 ते 45 दिवस, मध्यम जमिनीत 45-60 दिवस आणि भारी जमिनीत 55 ते 75 दिवस ताण द्यावा.

झाडास ताण बसला हे कसे ओळखावे?
ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत, बागेचे पाणी हळूहळू कमी करीत नंतर बंद करावे. ताण सुरू केल्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन ती फिक्कट व नंतर पिवळी पडतात. असे होत असतांना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात. साधारणपणे 25 टक्के पानगळ झाल्यास ताण बसला असे समजावे. अशा प्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि व्यापारीदृष्ट्या हे फायद्याचे ठरते.

भारी जमिनीत आंबिया बहार घेण्यासाठी काय करावे?
काळ्या जमिनीचा थर किमान 1.20 मी पासून 15 मीटरपर्यंत असतो. या जमिनीत ताणावर झाडे सोडताच झाडाच्या मुळ्या पाण्याच्या शोधात खोलवर जातात. मुळात काळी जमीन उत्तम ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे झाडांना ओलावा मिळत राहतो व झाडाला ताण बसत नाही. अशा जमिनीत बगिचा संपूर्ण ऑक्‍टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात, वखरून साफ ठेवावा. डिसेंबरच्या 15 तारखेच्या आसपास झाडांच्या ओळींमधून लाकडी नांगराने नांगरून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात. टोकावरची तंतूमुळे तुटून त्या ओलावा घेऊ शकणार नाहीत. परिणामी झाडे ताण घेतील. तसेच 2 मि.लि. क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. हे कायिक वाढ रोखणारे संजीवक आहे.

आंबिया बहार घेण्याकरिता खताचे नियोजन
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ताणावर सोडल्यानंतर त्वरीत प्रत्येक झाडाला 40 ते 50 किलो शेणखत टाकून आडवी आणि उभी वखरण करावी. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तापमान वाढताच हलके ओलित करावे. ताण तोडतांना हलक्‍या ओलिताअगोदर प्रत्येक झाडाला 600 ग्रॅम नत्र + 400 ग्रॅम स्फुरद + 400 पालाश आणि भरखते द्यावीत, त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी (चिंबवणी) द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ताण सोडल्यावर 20 ते 25 दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (अर्धा) हप्ता एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावा. हलक्‍या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.

ओलित व्यवस्थापन
आंबिया बहाराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात त्यामुळे पाण्याचा साठा उन्हाळ्यात उपलब्ध असणे जरुरी आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते व फळांची प्रत खालावते म्हणून आंबिया बहार घेतांना ओलिताकडे कटाक्षाने लक्ष देणे जरुरीचे आहे. ओलितासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते. जमिनीच्या पोताप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

संत्रा-मोसंबी झाडाचा वाफा गवताने आच्छादित करणे
वाफ्यतील ओलावा टिकविण्यासाठी 6 सें.मी. जाडी गवताचा थर देऊन आच्छादित करावा. त्यामुळे ओलावा टिकतोच; पण फळांची गळसुद्धा कमी होते. जमिनीतील जिवाणू सक्रिय होऊन अन्नद्रव्ये मुळांना सहज उपलब्ध होतात.

लेखक - प्रा. अशोक म्हस्के, सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय आष्टी, मो. नं. 9960130368

English Summary: Mosambi Bagh Update Orange, how to manage amphibia in Mosambi Bagh Orchard
Published on: 22 December 2023, 04:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)