आपल्याला माहिती आहे की पिकाच्या वाढीसाठी मुख्यता पाण्याची नितांत गरज असते. तरीही पिकांना आधारासाठी मातीही लागते. पिकांची ही गरज कोकोपीट, वाळूसारखे उदासीन माध्यमांद्वारे पुर्ण केली जाते. या प्रकारे पिकांची वाढ करण्याच्या तंत्राला हायड्रोपोनिक्स असे म्हणतात. या तंत्रामध्ये वनस्पती हे अन्नद्रव्याने परिपूर्ण असलेल्या द्रावणामध्ये नैसर्गिक रित्या वाढवतात. या लेखात आपण हायड्रोपोनिक्स तंत्राने घेतली जाणारी पिके आणि या तंत्राच्या पद्धती जाणून घेणार आहोत.
हायड्रोपोनिक तंत्राच्या पद्धती
हायड्रोपोनिक तंत्राच्या मुख्यतः पाच पद्धती आहेत.
- एबअँडफ्लो- गेल्या काही वर्षांपासून ही पद्धत लोकप्रिय होत आहे. त्या पद्धतीत पोषक अन्नद्रव्ययुक्त द्रावणाचा टाकीवर ट्रे किंवा वाढ कक्षाची रचना केलेली असते. त्यामध्ये पोषक अन्नद्रव्ययुक्त द्रावण उदासीन माध्यमांमध्ये सोडले जाते. त्यातून पिके त्यांच्या आवश्यकतेनुसार पोषक द्रव्यांचीउचल करतात. ठराविक काळानंतर त्याचा निचरा केला जातो.
- पोषक घटकांचा पातळथर-हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये ही पद्धत व्यावसायिक शेतीसाठी लोकप्रिय आहे. सातत्याने प्रवाहित होणाऱ्या पोषक द्रावणामध्ये मुळांची टोके बुडतील अशा प्रकारे रोपे लावली जातात.
- आद्रता युक्त वातावरणामध्ये मुळाची वाढ – या पद्धतीत माती किंवा अन्य कोणत्याही माध्यमा शिवाय रोपांच्या मुळांची वाढ आद्रता युक्त हवेमध्ये केली जाते. एखाद्या बॉक्स किंवा कक्षामध्ये पिकांच्या तरंगत्या मुळांवर दर काही ठराविक वेळानंतर पोषक अन्नद्रव्ये युक्त पाण्याची फवारणी करण्याची योजना केलेली असते.
- ठिबक पद्धत- उदासीन माध्यमांमध्ये रोपांची वाढ करताना ठिबकद्वारे पाण्यासोबत पोषक घटकांचा पुरवठा केला जातो. याला ट्रिकल किंवा सूक्ष्म सिंचन पद्धती असे म्हणतात. या पद्धतीत पंपाने योग्य दाबावर एमीटर द्वारे पिकांच्या प्रत्येक रोपाच्या मुळाच्या परिसरामध्ये पोषक अन्नद्रव्य पुरवली जातात..
- खोल पाण्यामध्ये मुळांची वाढ करणे- पोषक अन्नद्रव्ये आणि ऑक्सिजनने परिपूर्ण असलेल्या पाण्यामध्ये पिकांची मुळे बुडवलेली असतात. ही मुळे सतत पाण्यामध्ये राहून अन्नद्रव्यांचे शोषण करतात.
हायड्रोपोनिक्स तंत्राने घेतली जाणारी पिके
या तंत्राने कोणताही पिकाची वाढ करणे शक्य असले तरी जागेचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पिकांची लागवड केली जाते. उदा. ढोबळी मिरची,तिखट मिरची,पालक,काकडी, ब्रोकोली,शेंगा,वाटाणा, लांब दांड्याचे फुले, औषधी वनस्पती आणि सुशोभीकरणाचे रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात. सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन केंद्रामध्ये 2011 पासून बटाटा बीजोत्पादनासाठी एरोपोनिक तंत्राचा वापर केला जात आहे.
Published on: 29 October 2021, 08:33 IST